संत्रा बाग, पूरक व्यवसायांसह व्यावसायिक शेती

rajkumar
rajkumar

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी तालुका संत्रा शेतीसाठी प्रसिद्ध आहे. याच तालुक्यातील ३५ ते ४० एकरांवरील संत्रा बागेचे संगोपन व व्यवस्थापन हिरापूर (जि. अमरावती) येथील डॉ. राजकुमार इश्‍वरकर यांनी चोखपणे केले आहे. त्यास विविध पूरक व्यवसायांची जोड देत व्यावसायिक शेती पद्धती आकारास आणली आहे. 

अमरावती जिल्ह्यात अंजनगावसूर्जी तालुक्यातील हिरापूर येथील डॉ. राजकुमार इश्‍वरकर यांनी संत्रा शेतीत ओळख तयार केली आहे. त्यांनी ‘बीएएमएस’ची पदवी घेतली आहे. त्यांची वडिलोपार्जित ६० एकर शेती आहे. संत्रा हे त्यांचे प्रमुख पीक असून त्याचे ४० एकर क्षेत्र आहे. पैकी ३५ एकर जुनी बाग आहे. गेल्या हंगामात आंतरपीक असलेल्या कपाशीचे एकरी पाच क्विंटल उत्पादन मिळाले. यंदाही आंतरपीक म्हणून त्याची लागवड केली आहे. पूर्वी २० बाय २० फूट असलेले लागवडीचे अंतर नव्या पद्धतीत आता १६ बाय १६ फूट अंतरावर आणले आहे. पूर्वी एकरी साधारण १०० झाडे बसायची. आता १२५ पर्यंत संख्या मिळून उत्पादनात वाढ घेण्याचा त्यांचा विचार आहे. सिंचनासाठी तीन विहिरी व चार बोअरवेल्सचे पर्याय आहेत.

संत्र्याचे व्यवस्थापन
मृग आणि आंबिया असे दोन्ही बहार घेतले जातात. फळधारणा झाल्यानंतर काहीवेळा झाड कलंडण्याची भिती राहते. त्यावर उपाय म्हणून झाडाच्या बुंध्याशी उंडी (मातीचा भरावा) दिली जाते. या माध्यमातून झाडाला नैसर्गिक आच्छादनही तयार होते. रोगांसाठी प्रतिबंधक उपाय म्हणून पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर असे वर्षभरात दोनवेळा बोर्डोपेस्टचे मिश्रण झाडाला लावण्यात येते.

मृग बहार घेतेवेळी पाण्याचा ताण मेमध्ये दिला जातो. महिनाभरानंतर बागेला पाणी देण्यात येते. आंबिया बहारासाठी नोव्हेंबरमध्ये ताण देण्यात येतो. डिसेंबरमध्ये बागेला पाणी दिले जाते. मृग बहारातील फळांची तोडणी उशिरा झाल्यास आंबीया बहर घेण्यासाठी डिसेंबरमध्ये ताण दिला जातो. 

बहार घेण्यापूर्वी बागेची आंतरमशागत केली जाते. रोटाव्हेटर किंवा अन्य अवजारांच्या मदतीने तणनियंत्रण केल्यास जमिनीत खड्डे पडतात. पाणी साचते. त्यामुळे बुरशीजन्य रोग किंवा फायटोप्थोराचा प्रादुर्भाव होण्याची भिती राहते. त्यामुळे यांत्रिक पर्यायाऐवजी तणनाशकासारखा पर्याय तणनियंत्रणासाठी  फायद्याचा ठरतो असा अनुभव आहे.

संत्र्याच्या जोडीला रब्बी हंगामात गहू असतो. पूर्वी पाण्याची उपलब्धता अधिक असल्याने हीच लागवड आठ एकरांपर्यंत असायची.   

पूरक व्यवसायांना चालना 
गावरान व संकरीत अशा एकूण ५० पर्यंत गायी आहे. सोबतच मुऱ्हा २, पंढरपुरी ५ असे म्हशींचेही संगोपन होते. एकूण दररोज ८० लीटर पर्यंत दुधाचे संकलन होते. मध्यंतरी संग स्थापून  दूध संकलनाचेही प्रयत्नही इश्‍वरकर यांनी केले. सन २००० पासून शेळीपालन सुरू केले आहे. गावरान जातीच्या ५० शेळ्या व उस्मानाबादी बोकड आहे. सहा महिन्याची शेळी झाल्यानंतर विक्री होते. प्रति शेळीच्या विक्रीतून सरासरी पाचहजार रुपये मिळतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुरस्काराने गौरव 
संत्रा बागेसोबतच शेतीपूरक व्यवसायात प्रयत्नशील असलेल्या इश्‍वरकर यांच्या शिवाराला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, डॉ. व्यंकट मायंदे यांनी भेट दिली आहे. राज्य शासनाचा उद्यान पंडित, चेन्नई येथील स्वामीनाथन फाउंडेशन, त्यासोबतच स्थानिकस्तरावरील विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

विक्री व्यवस्था 
प्रति झाड सुमारे १५०० पर्यंत फळे मिळतात. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या हिरापूर व परिसरातील गावांमध्ये संत्रा लागवड मोठ्या क्षेत्रावर आहे. या परिसरात हुंडी पद्धतीने संत्र्याची विक्री व्हायची. सरसकट बागेचा व्यवहार यात केला जातो. आता एक हजार फळांप्रमाणे सौदा होतो. आंबे बहारासाठी सरासरी पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति हजार फळे तर मृग बहारासाठी अडीचहजार ते तीन हजार रुपये दर मिळतो. यावेळी मृग बहारातील फळांची उत्पादकता कमी राहण्याची शक्यता असून दर तेजीत राहतील असा अंदाज आहे.

 शेततळ्यात मत्स्यपालन
सन २००७ मध्ये सामूहिक शेततळे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून खोदले. पाण्याचा संचय राहावा यासाठी प्लॅस्टिक अस्तरीकरण केले. साडेसहा लाख रुपयांचा खर्च झाला. कृषी विभागाकडून पाच लाख रुपयांचे अनुदान मिळाले. पावसाळ्यात नदीच्या पाण्यातून उपसा करून शेततळे भरले जायचे. सोबतच शेतातील विहीर व बोअरवेल या स्रोतांचा वापरही शेततळे भरण्यासाठी व्हायचा. परंतु गेल्या वर्षी प्लॅस्टिक शीट फाटल्याने शेततळ्याचा वापर तात्पुरता थांबवला आहे. शेततळ्यातील पाणी सायफन पद्धतीने वापरण्यात येते. शेततळ्यातून अतिरिक्‍त उत्पन्न मिळविण्यासाठी मत्स्यपालन केले आहे. राहू, कटला, मृगल, मरळ आदी जातींचे मत्स्यबीज वापरले आहे. मत्स्यपालन करण्यापूर्वी व्यवसायातील बारकावे मत्स्यव्यवसाय विभागाकडून जाणून घेतले. सुमारे १२०० रुपयांचे अनुदान मत्सखाद्यापोटी या विभागाकडून मिळाले. गावात दर शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात मध्यस्थांमार्फत १२० ते १५० रुपये प्रति किलो दराने माशांची विक्री केली. त्यासोबतच गावातील काही व्यावसायिकांनाही ८० रुपये प्रति किलो दराने घाऊक मासोळी देण्यात आली. शेततळ्यातील पाण्याची पातळी किमान सहा ते सात फूट कायम ठेवली जाते. जास्त पाणी संचय झाल्यास मासे तलावाबाहेर येण्याची भिती राहते. 
  डॉ. राजकुमार इश्‍वरकर, ९८५०३४५३३५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com