शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील बीजोत्पादन 

farm-lake-shadenet
farm-lake-shadenet

पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला आलेल्या मर्यादा. यावर ठोस उपाय शोधण्यासाठी मौजे लाठ खु. (जि. नांदेड) येथील घोरबांड कुटुंबाने दोन शेततळी व त्याआधारे पाण्याचे काटेकोर नियोजन केले. त्यामुळेच आज ५० गुंठ्यांत शेडनेटमध्ये विविध संकरित भाजीपाला पिकांचे बिजोत्पादन घेऊन अर्थकारण उंचावण्यास सुरवात केली आहे. जनावरांचाही चारा-पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. 

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात लाठ (खु.), कलंबर, उस्माननगर ही एकमेकांच्या शेजारी असलेली गावे पिण्याच्या पाण्यासाठी पूर्वी टँकरवर अवलंबून असायची. उस्माननगर तर सतत १२ वर्षे टँकरवर तहान भागवत होते. गावात जलयुक्त शिवार अभियानाची कामे झाल्यानंतर तेथील टँकर २०१६ मध्ये बंद झाले. लाठ येथेही एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातून जल व मृद संधारणाची कामे झाली. हे गाव कलंबर व उस्माननगरच्या मध्ये असल्याने अन्य गावांतील कामांचा लाभही या गावाला मिळाला. यामुळे गावशिवारात पाणीपातळी वाढली. त्यामुळे बरेच शेतकरी आता नगदी पिकांकडे वळले आहेत.

संकरित भाजीपाला बीजोत्पादन
नांदेड जिल्ह्यात बीटी कापसाचे बिजोत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. बदलत्या काळानुसार भाजीपाला बिजोत्पादनाकडे येथील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. लाठ येथील दत्तात्रय संभाजी घोरबांड हे त्यापैकीच एक शेतकरी. त्यांनी सर्वप्रथम पाण्याची सुविधा मजबूत केली. सन २०१७ मध्ये मागेल त्याला शेततळे योजनेतून २५ बाय २० बाय तीन मीटर आकारमानाचे शेततळे उभारले. फलोत्पादन अभियातून अनुदानावर त्याचे अस्तरीकरण केले. याच शेततळ्यातील पाण्यावर दहा गुंठ्यांचे शेडनेट उभारले. त्यात बियाणे क्षेत्रातील कंपनीसाठी संकरित टोमॅटोचे बिजोत्पादन घेण्यास सुरवात केली. त्यानंतर मागील वर्षी फलोत्पादन अभियानातून सामूहिक शेततळे घेतले. दोन्ही शेततळ्यांमध्ये मिळून सुमारे ४१ लाख २८ हजार लिटर पाणीसाठा होतो. पावसाळ्यात दोन्ही शेततळी पाण्याने भरून घेतली जातात. आजमितीला ५० गुंठे क्षेत्रावर शेडनेटचा विस्तार केला आहे. त्यात काकडी, कारले, टोमॅटो, ढोबळी मिरची आदींचे बिजोत्पादन घेण्यात येत आहे. घोरबांड यांची वडिलोपार्जित सुमारे चार एकर शेती होती. सुमारे सहा ते आठ एकर शेती त्यांनी खरेदी केली आहे.  

विना ऊर्जेचे सिंचन 
शेततळे घेण्याच्या आधी घोरबांड बोअरवेलद्वारे सिंचन करायचे. मात्र उन्हाळ्यात पाणी आटून जायचे. आता शेततळ्यामुळे ही समस्या दूर झाली आहे. शेतात उंच भागावर असलेल्या टेकडीवर शेततळे घेतले आहे. त्याच्या तळापासून पाइपलाइन केली आहे. त्यावर जागोजागी व्हॉल्व्हस बसवले आहेत. त्यांच्या आधारे विना ऊर्जेचे सिंचन सुरू होते. शेततळ्यामधील पाणी सर्वच पिकांना ठिबकद्वारे देण्यात येते. 

जनावरांना झाली चारा-पाण्याची सोय 
शेतीला जोड व्यवसाय म्हणून घोरबांड यांनी मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या जातिवंत लाल कंधारी गायींचे संगोपन तीन वर्षांपासून सुरू केले आहे. सुरवातीला त्यांनी केवळ सात गायी खरेदी केल्या होत्या. आता त्यांच्याकडे लहान मोठी मिळून त्यांची संख्या ३० वर पोचली आहे. गोठ्यातील वळूंची गरजेनुसार विक्रीदेखील केली जाते. आत्तापर्यंत दोन वळूंची विक्री केली असून १० वळू विक्रीसाठी तयार आहेत. याच उत्पन्नाला जोड म्हणून शेणखतही मिळण्याची सोय झाली आहे. शेततळ्यांतील पाण्यामुळे जनावरांना पाण्याची चांगली सोय झालीच. शिवाय एकूण घेतलेल्या ज्वारी क्षेत्रात १८ क्विंटल उत्पादन व कडब्याच्या एक हजार पेंढ्याही मिळाल्या आहेत. 

बीजोत्पादनाचा  आर्थिक आधार 
घोरबांड यांनी यंदा २० गुंठे क्षेत्रावर 
काकडी बिजोत्पादन घेतले आहे. १० 
गुंठ्यात त्यांना सुमारे २० किलो उत्पादन मिळाले आहे. किलोला तीन हजार रुपये दर निश्‍चित झाला आहे. कारल्याचेदेखील १० गुंठ्यात ३० किलो उत्पादन मिळाले. त्याला २२०० रुपये दर कंपनीने देऊ केला आहे. टोमॅटोचे मागील वर्षी २७ किलोपर्यंत बिजोत्पादन तर प्रति किलो साडेसात हजार रुपये दर मिळाला होता. यंदा १० गुंठ्यात १७ किलो उत्पादन तर साडे १४ हजार रुपये दर कंपनीने दिला आहे. ढोबळी मिरचीची अद्याप काढणी झालेली नाही.

संकरीकरण
संकरित टोमॅटो बिजोत्पादनासाठी सुमारे चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागतो. यात परपरागीभवनाचे काम अत्यंत महत्त्वाचे असते. काकडी व कारल्याचे बिजोत्पादन तुलनेने कमी कालवधीत पूर्ण होते. कारले पिकात हे काम १० त १२ दिवस तर काकडीचे ८ ते १० दिवसांत पूर्ण केले जाते. संकरीकरणाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कुशल मजूर लागतात. लागवड, झाडांची बांधणी, परागीकरण, फळांची तोडणी व फळातून बियाणे वेगळे करणे या बाबी कंपनीने दिलेल्या निकषांप्रमाणेच कराव्या लागतात. बिजोत्पादनातून चांगला आर्थिक आधार तयार झाल्याचे घोरबांड यनी सांगितले.

शेततळ्याचा आधार अन्य पिकांना : घोरबांड यांच्याकडे तीन एकर हळद व चार एकर कापूस आहे. त्यासाठीही ठिबक बसवले आहे. गरज भासेल तेव्हा त्यातील पाण्याचा उपयोग दोन्ही पिकांसाठी केला जातो. हळदीच्या शेवटच्या टप्प्यातच हा वापर अधिक होतो. कारण याच काळात बोअरचे पाणी कमी झालेले असते. हळदीचे ३० गुंठ्यात २० क्विंटल उत्पादन मिळाले आहे. पिकांचा विस्तार करण्यासाठी पाण्याची पुरेशी उपलब्धता होणेच महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने कलिंगडाचेही पीक यशस्वी करणे घोरबांड यांना शक्य झाले. मागील उन्हाळ्यात शेततळ्यात पाणी शिल्लक होते. त्याच्या आधारे सुमारे ३० गुंठे क्षेत्रात कलिंगड घेतले. त्यातून २५ टनांच्या पुढे उत्पादन मिळाले. दरही समाधानकारक मिळून सुमारे सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न हाती आले. प्रतिकूल परिस्थितीत होत असलेली ही कमाई घोरबांड यांचा आत्मविश्‍वास उंचावणारी ठरली. 

 शशिकांत घोरबांड,  ७६२०३३२१०१, ७२१८७२०३१४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com