कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशी

कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशी

पुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या मधमाशी या मित्रकीटकांची संख्या विविध कारणांमुळे झपाट्याने कमी होत आहे. पीक उत्पादनात मधमाशी हा घटक समाविष्ट करून घेतल्यास उत्पादकतेत वाढ हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे. याकरिता कृषी निविष्ठांमध्ये समावेश आणि मधमाशीला राष्ट्रीय कीटक घोषित करण्याची मागणी पुढे आली आहे. 

संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) २० मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला आहे. मधमाश्या व परागीभवन करणाऱ्या अन्य सर्व मित्रकीटक, पक्षी यांचे महत्त्व त्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे. मधमाशी तसेच परागीभवन करणाऱ्या सर्वच कीटकांमुळे पीक उत्पादनवाढ व जैविक विविधतेचे महत्त्व उंचावण्यास मदत होते. भारतासाठी तर शेतीत मधमाश्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वर्ष २०२२ पर्यंत देशाचे कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्पादन खर्च कमी करून नैसर्गिक साधनसामग्रीचा योग्य वापर करताना मधमाशी हा घटक महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणूनच पीक उत्पादनवाढीत इतर निविष्ठांच्याबरोबर मधमाशी हा घटक समाविष्ट करून घेतल्यास हे उद्दिष्ट लवकर साध्य करता येणार आहे. 

नामशेष होताहेत कीटक 
कृषी उत्पादनवाढीसाठी मधमाशी महत्त्वाचा घटक असल्याचे जगभरातील विविध संशोधनांतून माहीत झाले आहे. मधमाश्यांद्वारे होत असलेल्या परागीभवनाची किंमत मधाच्या किंमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मधमाशीसोबतच परागीभवनाला कारणीभूत कीटक, फुलपाखरू, वटवाघूळ, हमिंग बर्ड हेदेखील विविध मानवी हस्तक्षेपांच्या कारणांमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

या मित्रकीटकांचे संरक्षण कसे करता येईल? 

  •  कमी घातक कीडनाशकांचा प्रमाणित वापर आणि नियोजन करणे
  •  या मित्रकीटकांच्या नैसर्गिक वसाहतींचे संवर्धन करून त्यांची वाढ करणे. 
  •  नागरिकांच्या मनातून मधमाशीविषयीची भीती काढून मधमाशीपालन हा व्यवसाय म्हणून विकसित करणे. 
  •  गायरान, कुरणे व जंगली वनस्पती वाढवणे.
  •  सामाजिक वनीकरणातून वर्षभर फुलोरा असणारी, शक्यतो देशी झाडे लावणे.
  •  मधमाशी हा विषय शालेय शिक्षणात समाविष्ट करून लहानपणापासूनच त्याबद्दल जागरूकता वाढविणे. 
  •  मधमाशीला राष्ट्रीय कीटक घोषित करणे. जेणेकरून तिच्या संवर्धनाचे नियम व दिशा ठरवता येईल. 

मधमाशीपालन व्‍यवसायाची विकासक्षमता 
भारतातील विविध प्रकारची भौगोलिक परिस्थिती तसेच नैसर्गिक झाडेझुडपे व पिके याद्वारे अक्षयपणे मिळत राहणारा फुलोरा, समृद्ध साधनसंपत्ती यांचा आधुनिक शास्त्रीय पद्धतीने योग्य उपयोग करून घेता येईल. त्यातून देशाला सुमारे २० लाख मधमाश्यांच्या वसाहती पोसणे सहज शक्य आहे. मधमाशीपालनातून मध व मेण या बाबीही साध्य करता येतील. 

मधमाशी पालन दिन
२०१७ पर्यंत ऑगस्ट महिन्यातील तिसरा शनिवार हा जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जायचा. मधमाशीपालन हा पारंपरिक उद्योग असलेल्या स्लोवेनिया या देशात २० मे, १७३४ रोजी एका गरीब मधमाशीपालकाच्या कुटुंबात एन्टोन जान्सा या प्रसिद्ध मधमाशीतज्ज्ञाचा जन्म झाला. त्यांनी १७६६ मध्ये युरोपातील पहिले मधमाशी शिक्षण केंद्र सुरू केले. तर १७७१ मध्ये त्यांनीच मधमाशीपालनावरील पहिले पुस्तक प्रसिद्ध केले. १७७३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कार्याची दखल घेत स्लोवेनिया देशाने जागतिक मधमाशीपालक संघटना (एपिमोन्डिया), अन्न व कृषी संघटना (एफएओ) यांच्या मदतीने संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) २० मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला. 

बारामती केव्हीकेचे उल्लेखनीय काम
बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात मधमाशीपालन हा कृषिपूरक व्यवसाय म्हणून सुरू करण्यासाठी प्रशिक्षण, महिला उद्योगासाठी प्रयत्न केले जातात. २०१५ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली व क्रॉप लाईफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मधुसंदेश’ हा आशियातील पहिला प्रकल्प बारामती येथे सुरू झाला. त्याअंतर्गत पीक उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना परागीभवनासाठी मधपेट्या भाडेतत्त्वावर दिल्या जातात. जागतिक मधमाशी दिनावेळी या प्रकल्पातील शेतकऱ्यांना गौरविण्यात येते. संस्थेच्या मधमाशीबाबतच्या कार्याची दखल घेऊन भारतीय कृषी संशोधन परिषद (नवी दिल्ली) यांच्यामार्फत बारामतीच्या केव्हीकेला २०१८ पासून अखिल भारतीय मधमाशी व परागीभवन कीटकांच्या विषयासाठी राष्ट्रीय संशोधन केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी मधमाशीला राष्ट्रीय कीटक म्हणून घोषित करण्याची मागणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे केली आहे.

मधमाशी संवर्धनासाठी कार्यरत संस्था

  •  राष्ट्रीय मधमाशी मंडळ,  खादी व ग्रामोद्योग मंडळ
  •  केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पुणे
  •  मधमाशी प्रशिक्षण केंद्र, महाबळेश्वर
  •  ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), बारामती.
  •  कृषी विद्यापीठे, अन्य कृषी विज्ञान केंद्रे, सामाजिक संस्था 

मधमाशी आणि मित्रकीटकांचे महत्त्व   

  •  जगातील ७५ टक्के पिके फळे, बी व एकूण उत्पादनासाठी परागीभवन करणाऱ्या कीटकांवर अवलंबून असतात.
  •     फुलपाखरू, पक्षी, वटवाघूळ हेदेखील परागीभवनात महत्त्वाचे कार्य करतात. 
  •     मधमाशी यातील सर्वांत महत्त्वाचा घटक असून, पृथ्वीतलावर तिच्या सुमारे २५ हजार ते ३० हजार प्रजाती आढळतात. 
  •     या सर्व मित्र कीटकांमुळे पीक उत्पादनात सुमारे १५ ते ३५ टक्के वाढ होते. असे उत्पादन तुलनेने जास्त पौष्टिकही असते. 
  •     सद्यःस्थितीत या कीटकांची संख्या मोठ्या वेगाने घटत आहे.
  •     रासायनिक कीडनाशकांचा अनिर्बंध वापर, जागतिक तापमानवाढ, कमी होत चाललेली नैसर्गिक साधनसंपत्ती ही त्यामागील कारणे आहेत. 

    संपर्क : डॉ. जोशी ९९७५९३२७१७, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण), कृषी विज्ञान केंद्र, बारामती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com