पपईला मिळेनात अपेक्षित दर

प्रतिनिधी
Thursday, 9 January 2020

मागील वर्षीदेखील हळूहळू कमी दर देण्यास व्यापाऱ्यांनी सुरुवात केली होती. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता. यंदाही अशीच स्थिती व्यापारी तयार करीत आहेत. पपईला किमान प्रतिकिलो १५ रुपये दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

नंदुरबार  : पपई काढणीचा हंगाम सुरू होऊन एक महिना झालेला असतानाच आता मागील वर्षाप्रमाणे व्यापारी, एजंट लॉबीने दर कमी देण्यास सुरुवात केली आहे. प्रतिकिलो १० ते आठ रुपये दर जागेवर दिला जात असून, हे दर परवडणारे नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील हंगामात पपईची लागवड दुष्काळामुळे कमी झाली. यातच अतिपावसाने व प्रतिकूल हवामानामुळे जळगाव, चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागात पपईचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे पीक जोमात आहे. सुरुवातीला त्यांना १८ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवरच मिळाला. परंतु मागील १५ ते २० दिवसांपासून दरांचा तिढा वाढला आहे. जागेवरच आता १० ते आठ रुपये प्रतिकिलोचा दर दिला जात आहे. मागील वर्षीदेखील हळूहळू कमी दर देण्यास व्यापाऱ्यांनी सुरुवात केली होती. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता. यंदाही अशीच स्थिती व्यापारी तयार करीत आहेत. पपईला किमान प्रतिकिलो १५ रुपये दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. या प्रश्‍नी प्रशासनाने हस्तक्षेप करून तातडीने व्यापारी, एजंट व शेतकरी यांची बैठक घ्यावी व ही समस्या दूर करावी, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

हेही वाचा : चार एकर शेततळ्यात आधुनिक पद्धतीने मत्स्यपालन

खरेदीदार राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश यासह जळगावमधील रावेर, धुळ्यातील शिंदखेडा भागातील आहेत. परराज्यांतील व्यापाऱ्यांचे एजंट सौदे ठरवितात. ही मंडळी एकत्र येऊन दर पाडण्याचे काम करतात. शेतकऱ्यांचे नुकसान होते; पण प्रशासन दखल देत नाही. 
- हितेश पटेल, शेतकरी, शहादा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agriculture news Papaya did not get the expected rate