मातीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब वाढविणारा प्रयोग

Soil
Soil

आधी माती सशक्त, सुपीक, करायची आणि मगच पुढचं सारं व्यवस्थापन करायचं हेच सुभाष शर्मा यांचं मुख्य तत्त्व आहे. यवतमाळपासून सुमारे चार किलोमीटरवरील पारवा येथील शंभर एकर जमीन सुभाष शर्मा यांनी अलीकडेच कसायला घेतली. त्या वेळी हे सगळं माळरान होतं. इथली माती सुपीक नव्हती. पहिल्या वर्षापासूनच (२०१८) पासून त्यात सुपीकता घडवायला सुरवात केली.

त्यासाठी पहिले पीक तुरीचे निवडले. हे साधारण १५ एकरांचे क्षेत्र. एकरी चार ट्रॉली शेणखत वापरापासून सुरवात केली. प्रत्येकी अडीच फुटांचे गादीवाफे (बेड) तयार केले. प्रत्येकी आठ फुटांवर ‘लॉकिंग’ (बंदिस्ती) केले. पावसाचे पाणी जेणेकरून तेथेच थांबेल हा त्यामागील उद्देश होता. तुरीबरोबर हिरवळीच्या पिकांसाठी बोरू किंवा धैंचाचा पर्याय निवडला. सोबत बाजरा व चवळीचे पीक घेतले. या पिकांनी सुरवातीचे ४५ ते ५० दिवस सापळा पीक म्हणून काम केलेच. जमिनीला भरपूर ‘बायोमास’ही दिला.

असा तयार केला ‘बायोमास’
  प्रत्येक पिकाला योग्य सूर्यप्रकाश व हवा पाहिजे या दोन बाबी सर्वात महत्त्वाच्या मानल्या.   तुरीच्या दोन ओळींतील अंतर ठेवले साडेबारा फूट.   मध्यभागी हिरवळीच्या पिकाचे संपूर्ण ‘बायोमास’ तयार केले. सुमारे एक फूट त्याचा ‘लेअर’ तयार झाला.   हिरवळीच्या पिकाची पहिली कापणी ४५ ते ५० दिवसांनी केली. फुटवे घेतलेल्या बाजरीसारख्या पिकात पुन्हा दुसरी कापणी ८० ते ८५ दिवसांनी केली. त्यांचे मल्चिंग.   निंदणी केली नाही.   तण किंवा गवत पाच ते सहा फूट उंचीचे झाल्यानंतर कापून त्याचेही मल्चिंग   सुरवातीला मातीचा एक थर होता. आता तो खोल, दाट आणि सुपीक झाला आहे. शर्मा म्हणतात की ही किमया घडवली मातीतील सूक्ष्मजीवांनी. आमच्याकडे पुरेसे शेणखत नव्हते. मग दुसरा मार्ग निवडला. गायीच्या पोटात जीवाणू असतात. ते शेणात येतात. त्यांच्यापासून संजीवक तयार करून ते ‘बायोमास’वर वापरले. ते कुजून चांगल्या खतात त्याचे रूपांतर झाले.

पहिल्याच वर्षी समाधानकारक तूर
शर्मा सांगतात की, महाराष्ट्रात मागील वर्षी अनेक ठिकाणी तुरीला दुष्काळाचा फटका बसला. पण आमच्या शिवारातील तूर शेंगांनी लदबदून गेली होती. पिकाचा प्रत्येक साडेबारा फुटांचा मोकळा पट्टा तुरीने गच्च भरून गेला होता. एकरी ६ क्विंटल उत्पादन पहिल्याच वर्षी घेतले. तिवसा येथील शेतीत एकरी १२ क्विंटल उत्पादन मिळते आहे. टप्प्याटप्प्याने माती सक्षम होत जाईल तसे पारवा येथील शेतीतही हेच उत्पादन मिळू लागेल. तुरीतले सिद्धांत अन्य पिकांत कसे वापरता येतील त्याचेही प्रयोग करतो आहोत.

फवारणी न करणे म्हणजेच शेती
शर्मा सांगतात की फवारणी म्हणजे शेती नव्हे. तर फवारणी न करणे म्हणजे शेती हे लक्षात आले. मग सारे फवारणी पंप शेतातून हद्दपार केले. गोमूत्राचीही फवारणी करायची नाही असे ठरवले. कारण किडींचे नियंत्रण करण्याची व्यवस्था निसर्गाने केली आहे. आमचे तुरीचे प्लॉट पाहा. कोणतीही फवारणी न करता त्याला भरपूर शेंगा लगडलेल्या दिसतात. किरकोळ शेंगाच कीडग्रस्त दिसतील. तेवढ्यासाठी फवारण्यांचा उपद्व्याप का करावा? पिकावर अळी आली तर आनंदच होतो. कारण तेव्हाच निसर्गचक्र तयार होण्यास चालना मिळते. ते कसे? तर जमिनीतील अन्न झाडात, तेथून शेंगात येते. ते अळी खाते. त्या अळीला पाखरे खातात. त्यांची विष्ठा शेतात पडते. या जीवनचक्रात अन्नाचे पोषणमूल्य असे वाढत जाते. पाखरांना, मित्रकीटकांना जगू द्या. निसर्गातील प्रत्येक घटकाला त्याचा आनंद कसा मिळेल याचा विचार करणे याचेच नाव शेती आहे.

कर्बाचे संतुलनही करा  
आपल्याला एकरी उत्पादन भरघोस पाहिजे. पण त्यासोबत जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्याच्या क्रियाही सुरू राहिल्या पाहिजेत. सुपीकता वाढवली तर पीक उत्पादन स्थिर ठेवता येते. पिकाबरोबर पाणी, पर्यावरण (इकॉलॉजी) घडवणं, जीवजंतूंची निर्मिती, भूगर्भात पाणी जिरवणं यासाठी कोणताच मोठा खर्च येत नाही.

एक ज्ञान अनेक ज्ञानांची गुरूकिल्ली असते. निसर्गात खूप ज्ञान, रहस्य दडले आहे. एक दालन उघडले की बाकीच्या दालनांत प्रवेश करणे सुकर होते.
 -  सुभाष शर्मा

नैसर्गिक पद्धतीने ऊस
शर्मा सांगतात की, विदर्भात नैसर्गिक पद्धतीने व कमी खर्चात उसाच्या यशस्वी शेतीचा म्हणजेच विक्रमी उत्पादन घेण्याचा मानस आहे. तुरीनंतर ऊस घ्यायचा असे भावी नियोजन आहे. तुरीतील मधला पट्टा सुपीक होत आहे. त्याचा फायदा उसाला होईल. भूजलाचा अत्यंत कमी वापर करून किंवा केवळ पावसाच्या पाण्यावर ऊस वाढवण्याचे ध्येय आहे. पावसाचा एक थेंबही शेताच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घेत आहोत. तशी बंदिस्ती करू. हे पाणी थांबवले तर ते जिरवण्यासाठी मातीत छिद्रे करणारी गांडुळे, मुंग्या असे जीव उपस्थित आहेत. उसातही अलौकिक खताचा एकरी दोन ट्रॉली वापर होईल. उसात मधल्या पट्ट्यातही हिरवळीचे खत घेण्यात येईल.

पाणी देण्याचे शास्त्र
पिकाला सूर्यप्रकाश, हवा यांच्याबरोबरीने पाण्याचीही गरज आहे. पाणी झाडाच्या बुडाला नाही तर बुडापासून दोन अडीच फूट परिघात म्हणजे जिथे कॅनोपी आहे त्याच्या बाहेर पाणी दिले. पाणी घेणाऱ्या मुळ्या कुठे आहेत व पाणी द्यायचे नेमके कुठे हेच महत्त्वाचे शास्त्र आहे. त्यामुळेच तुरीची वाढ भरभरून झाल्याचे दिसले.

- सुभाष शर्मा, ८८३०१७४६६१, ९४२२८६९६२०   
(सकाळी व संध्याकाळी ८ ते १० या वेळेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com