आर्थिक प्रगतीसाठी युवकाने निवडला फूलशेतीचा मार्ग  

आर्थिक प्रगतीसाठी युवकाने निवडला फूलशेतीचा मार्ग  

बी.कॉम, एमबीए पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या पाठी न लागता औरंगाबाद जिल्ह्यातील कुंभेफळ येथील तुकाराम बाबासाहेब गोजे या तरुणाने शेतीलाच आपलेसे केले. पारंपरिक शेतीत बदल करताना तीन एकरांत फूलशेती विकसित केली. विक्रीव्यवस्था चोख केली. पाण्याचे स्रोत तयार करून सिंचनाच्या सुविधा तयार केल्या. स्वतःची अर्धा गुंठेही शेती नसलेल्या या कुटुंबाने साडेआठ एकर क्षेत्र घेऊन ते विकसित करण्यापर्यंत मजल मारली आहे.  

कुंभेफळ (जि. ता. औरंगाबाद) येथील तुकाराम बाबासाहेब गोजे यांनी बीकॉम, एमबीएपर्यंत शिक्षण घेतले आहे. कुटुंबात सुमारे आठ सदस्य आहेत. भाऊ उमेश, वहिनी वंदना यांच्यासह तुकाराम ही आजची पिढी शेतीची जबाबदारी सांभाळते आहे. तुकाराम यांचे आजोबा सखाराम यांच्याकडे वडिलोपार्जित शेती नव्हती. मोलमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होते. कष्टाने जमविलेल्या पै-पै मधून जवळपास साडेआठ एकर शेती त्यांनी कुंभेफळ शिवारात विकत घेतली. तेव्हापासून ते आपल्याच शेतात राबू लागले.

प्रगतीकडे वाटचाल
एका विहिरीच्या आधारे शेत हंगामी बागायती व्हायचं. चार-दोन दुभती जनावरं व शेळ्या होत्या. तुकाराम यांचे वडील बाबासाहेब यांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत शेतीत कष्ट करण्यास सुरवात केली. दोन्ही मुलांना शिकविले. मोठा दहावी झालेला उमेश शेती पाहू लागला. तर तुकारामने वाणिज्य शाखेतील पदवी व त्यानंतर एमबीएचे शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण सुरू असताना शेतीतही तो काम करायचाच. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या पाठी न लागता शेतीतच प्रगती करायची असे त्याने ठरवले.  मात्र, अर्थार्जनाची जोड हवी म्हणून चुलतभाऊ शरद यांच्या मदतीने गावात शिकवणी वर्ग घेण्यासह सुरवात केली. आज पहिली ते दहावीपर्यंत मिळून सुमारे ८० विद्यार्थी वर्गात शिकवणीला येतात.

शेतीतील शिकवणी 
दुसरीकडे तुकाराम यांनी शेतीतही  लक्ष घातले. कुटुंबाच्या पारंपरिक शेतीत कपाशी, बाजरी, ज्वारी, तूर अशी पिके होती. मात्र, मिळणारं उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ बसत नव्हता. तुकाराम यांनी या पध्दतीत बदल करण्याचं ठरवलं. इंटरनेटचा वापर व ‘ॲग्रोवन’ च्या ॲपद्वारे ज्ञानवृध्दी सुरू केली. ॲग्रोवनमधील फूलशेतीच्या यशकथा व लेख वाचून नव्या बदलाची प्रेरणा मिळाली.विविध फुलपिकांचे अर्थकारण, बाजारपेठ अभ्यासली. औरंगाबाद जिल्ह्यासह लगतच्या नगर जिल्ह्यातील फूलशेतीविषयी जाणून घेतले.  

पहिल्या अपयशानंतरही  हिंमत ठेवली  
सन २०१६-१७ मध्ये एक एकर गॅलार्डिया पिकातून फुलशेतीला सुरवात झाली. परंतु, पहिल्याच वर्षी दुष्काळाच्या संकटानं दगा दिला. काहीच उत्पन्न हाती लागलं नाही. पण हिंम्मत सोडली नाही. उलट जिद्दीने पाण्याची सोय करण्याला प्राधान्य दिले. शेतात स्वखर्चाने विहीर खोदली. दोन विहिरी झाल्या. जोड म्हणून २०१७ मध्ये शासनाच्या योजनेतून एक लाख लिटर क्षमतेचे शेततळे घेतले. पाण्याची साथ मिळाल्याने फूलशेतीला चालना मिळाली.  

क्षेत्र विस्तारले 
हळूहळू फुलशेतीचा आवाका येऊ लागला. मग विस्तार करण्याचे ठरवले. आज तीन एकर क्षेत्र झाले आहे. त्यात एक एकर गॅलार्डिया, अर्धा एकर निशिगंध, दहा गुंठे मोगरा, २० गुंठे गुलाब, पाच गुंठे शेवंती असे पीकनिहाय क्षेत्र आहे. गॅलार्डियामधून दिवसाला ८० किलो फुले तर निशिगंधाच्या एक दिवसाआड १२०० काड्या मिळतात. गॅलार्डियाला १० रुपयांपासून कमाल १२० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळतो. निशिगंध काडी दोन रुपयांपासून ते १० रुपयांपर्यंत विकली जाते. गुलाब आता उत्पादनक्षम होईल. 

हारविक्रीतून फुलांना मार्केट 
फूलविक्रीपुरतेच मर्यादित न राहता तुकाराम यांनी औरंगाबाद ते जालना मार्गावर कुंभेफळ ते करमाड दरम्यान हारविक्री व्यवसाय करणारे जवळपास १०० ते १२० ग्राहक शोधले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्धवेळ काम शोधणाऱ्या (पार्ट टाईम) काकासाहेब फूके यांना हार बनवून देण्याचे काम सोपविले. विक्रीदेखील त्यांनाच होऊ लागली. साधारण पाच ते १० रुपयांपर्यंतचे वा आकारानुसार हारांचे दर असतात. फूलशेतीतून वर्षाला साडेतीन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळत असल्याचे तुकाराम  सांगतात. 

उच्चशिक्षण झाले असले तरी नोकरीच्या पाठी न लागता शेतीतच करिअर करायचे नक्की केले होते. एखादी गोष्ट मनात आणली तर ती पूर्ण करायचा निश्‍चय मी पार पाडतो. ॲग्रोवनमुळे फूलशेतीचा मार्ग गवसला. घरची एकही गुंठा शेती नसताना वडिलधाऱ्या मंडळींनी कष्ट करून शेती घेतली आहे. ती आता चांगल्याप्रकारे फुलवायची आहे. 
  तुकाराम गोजे, ९५०३०३६६७१


गोजे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये  
 शेतीला चार शेळ्या व दुभत्या गायींची जोड
  एकूण शेतीपैकी सात एकर क्षेत्र ठिबकवर
  विस्तारणाऱ्या फूलशेतीसाठी रोपे तयार करण्याचं तंत्रही केलं अवगत
  शेतीला लागणारे जीवामृत, निंबोळी अर्क, सेंद्रिय खत स्वत:च तयार करण्यावर भर
  एक एकर भाजीपाला कायम असतो. त्यात कोथिंबीर, मेथी, वांगे, फ्लॉवर ही पिके असतात. त्यातून वर्षाला किमान ६० हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते 
  तीन ते साडेतीन एकर कपाशीतून ३० ते ३५ क्‍विंटल कापूस उत्पादन. त्याची आर्थिक जोड.
  यांत्रिकीकरणात फवारणी यंत्र, छोटा रोटाव्हेटर, कडबा कुट्टी यंत्र 
  रब्बीत एक ते दीड एकर क्षेत्रातून वीस गोण्यापर्यंत उत्पादन
  १५ ते २० गुंठे क्षेत्रांतून कुटुंबाच्या खाण्यापुरते बाजरी उत्पादन
  शेळीपालनात बोकडविक्रीतून वर्षाकाठी सुमारे ३० ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न
  दुष्काळामुळे सहा महिन्यांपूर्वी दोन बैल व दोन गायी विकणे भाग पडले
  ठिबकसोबतच तुषार सिंचनाचे दोन सेट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com