अश्शी शेती 'सुरेख' बाई...

Surekha-Patil
Surekha-Patil

घरचा प्रपंच सांभाळत शेतीही तितक्याच समर्थपणे पेलत आपल्या कुटुंबाला भक्कम आर्थिक पाठबळ देण्यात निमशिरगाव (जि. कोल्हापूर) येथील सौ. सुरेखा अनिल पाटील यशस्वी झाल्या आहेत. अडीच एकरांतील ऊस, गवार शेतीचे नेटके व्यवस्थापन हाताळताना दुचाकी, चारचाकी चालवण्यातदेखील त्या तरबेज आहेत. सोबत तीन महिला बचत गटांचे संघटन बांधून आपल्यातील सामाजिक व नेत्वृत्वाचे गुणही त्यांनी दाखवून दिले आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका ऊस, सोयाबीन, भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. याच तालुक्यातील सौ. सुरेखा अनिल पाटील यांची परिसरात यशस्वी व धडाडीची महिला शेतकरी अशी अोळख आहे. अर्थात या पाटील कुटुंबाने ही अोळख तयार करायला प्रचंड मेहनत घेतली आहे. संघर्ष केला आहे. 
 
शून्यातून केली सुरवात  
लग्नानंतर सुरेखा एकत्र कुटुंब पद्धतीत राहू लागल्या. अडीच एकर शेती कुटुंबाच्या वाट्याला आलेली. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. पती-पत्नी असे दोघांनी मिळून काम करणे गरजेचे झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुरेखा यांनी पतीला हातभार लावण्यास सुरवात केली. उसाची शेती सुरू होतीच; पण तेवढ्यातून वर्षाचा घरखर्च भागणे शक्य नव्हते. उसाचे पैसे हाती येण्यास किमान दीड वर्षे तरी लागायची. 

गवारीची शेती पद्धती 
कुटुंबाने आर्थिक स्रोत वाढवण्यास सुरवात केली. कमी कालावधीतील गवारीचे पीकदरांच्या बाबतीत फायदेशीर वाटू लागले. उसाचा पैसा मोठ्या कामांसाठी आणि गवारीचा पैसा उदरनिर्वाहासाठी वापरायचा, असे पक्के सूत्र जमू लागले. सुरेखा यांचे माहेर शेतकरी कुटुंबातीलच. त्यांच्या बहिणी शिकल्या; पण काही तांत्रिक कारणांमुळे सुरेखा यांना कसबसं दहावीपर्यंतच शिकता आलं. शिक्षण कमी असल्याची खंत होतीच. त्यातच अचानक लग्न झाल्यानं एकदम जबाबदारी अंगावर आली. हीच जबाबदारी आव्हान मानून त्यांनी वाटचाल सुरू केली. 
 
सन १९८८ पासून गवार शेतीत
दोन एकरांत ऊस व उर्वरित २० गुंठ्यात गवारी असे नियोजन 
 गवारीच्या शेतीसाठी शेतीचे टप्पे. जूनच्या हंगामात उसात आंतरपीक तर डिसेंबर-जानेवारीत सलग गवारी. भुईमुगाचेही आंतरपीक.  
 सुरेखा म्हणतात की वर्षभराचा अभ्यास केल्यास गवारीला दर चांगले राहतात. तीन ते चार महिन्यांच्या काळात हे पीक चांगले उत्पन्न देते. दर किलोला ३० ते ४० रुपयांपर्यंत मिळतो. 
 यंदाच्या उन्हाळी हंगामात या पिकाने सुमारे दीड लाख रुपयांचे उत्पन्न दिले. या पिकाला खर्च साधारण ३० हजार रुपयांपर्यंत आला. दररोज १०० ते १२५ किलो गवारीची काढणी व्हायची.
 उसाचे एकरी ६० टनांपर्यंत घेतात उत्पादन 

किचकट गवारीची शेती मनुष्यबळावर पेलली 
सुरेखा सांगतात की गवारीच्या शेतीत मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात लागते. त्यामुळेच अनेक शेतकरी त्याकडे वळण्याचे टाळतात. सुरेखा यांनी मात्र मजुरबळाचे हे आव्हान लिलया पेलले. स्वत:सह दररोज पाच ते सहा मजूर त्यांच्या शेतात दररोज कामाला असतात. त्यांच्याशी त्यांनी कौटुंबिक नाते तयार केले आहे. यामुळे प्लॉट संपेपर्यंत मजुरांची चिंता नसते. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत तोडणी होते. त्यानंतर ती घरी आणून पसरून ठेवली जाते. सायंकाळी पोत्यात भरून ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी पहाटे  इचलकरंजी किंवा सांगली शहरातील बाजारपेठेत पाठवली जाते. गेल्या तीस वर्षांपासून गवारी पिकाने नुकसान दिले नसल्याचे सुरेखा सांगतात. व्यापाऱ्यांना सौद्यात गवारी दिली जाते. 

जबाबदारी समर्थपणे पेलली 
कमी वयात घरची व शेतीची जबाबदारी पडल्याने सुरेखा कणखर झाल्या आहेत. त्यांचा दिवस पहाटे पाचला सुरू होतो तो संपतो रात्री साडेदहा ते अकरा वाजता. वाकुरी तोडणे, पाणी देणे, मशागत करणे, काढणी अशी सारी कामे नित्यनेमाने सुरू असतात. दुग्ध व्यवसायही त्या पाहतात. शेतातील काम संपवून घरी येताना दररोज दुचाकीवरून वैरण आणण्याचे कामही त्यांच्याकडेच असते. घरापासून पाच किलोमीटर अंतरावर त्यांचे शेत आहे. त्यामुळे पती अनिल यांना दुचाकीची गरज त्यांनी बोलून दाखविली. सुरेखा यांनी साठविलेल्या पैशातून मग दुचाकी घरी आली. बी.ई. मेकॅनिकलची पदवी घेतलेला मुलगा अभिजित याने दुचाकी शिकण्यासाठी मदत केली. 

सुनेला ‘एमए’ करणार  
आपले कुटुंब शून्यातून उभे राहिले, सक्षम झाले याचा सुरेखा यांना अभिमान आहे. त्यांच्या मुलाचे नुकतेच लग्न झाले आहे. सून भाग्यश्री बीए-डीएड झाली आहे. आपल्याला शिकता आले नाही; पण सुनेला मात्र चांगले शिकवायचे या ध्येयाने तिला एमएला प्रवेश घेऊन देण्यासाठी त्या पुढे आल्या आहेत.  

हिमतीच्या, सामाजिक वृत्तीच्या सुरेखा
सुरेखा यांना पती व मुलगा यांचे मोठे पाठबळ आहे. आज या कुटुंबाकडे तीन ट्रॅक्‍टर्स आहेत. ते भाडेतत्त्वावर दिले जातात. पती व मुलगा या व्यवसायाची जबाबदारी सांभाळतात. 

सुरेखादेखील आपली ‘फोर व्हीलर’ चांगल्या प्रकारे चालवतात. ट्रॅक्‍टर चालवण्यात त्या कुशल होत  आहेत. वाहन चालवण्यामध्ये स्वयंपूर्णतः मिळवल्याने दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत नाही. 

शेती, घर सांभाळून सामाजिक बांधिलकी बाळगण्यातही सुरेखा मागे राहिलेल्या नाहीत. त्यांचा मनमिळाऊपणा, हाकेला धावून जाण्याची वृत्ती पाहून ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहावे अशी गळ नागरिकांनी घातली. ग्रामस्थांच्या विश्‍वासाच्या मोठ्या मताधिक्‍याने त्या निवडूनही आल्या. 
गेल्या पंधरा वर्षांत सोसलेले कष्ट त्यांना प्रेरणा देतात. घरची साथ, उसासोबत गवारीचे आश्वासक पीक, लोकांचे पाठबळ या साऱ्या गोष्टी त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीत खूप महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

- सौ. सुरेखा पाटील, ९०९६४४२७२४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com