पालघर जिल्ह्यात होणार १४१४ हेक्टरवर फळबाग लागवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पालघर - जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या वनपट्ट्यांमधून उत्पन्न मिळावे, या उद्देशाने सुमारे तीन कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी फलोत्पादन योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत १०३ आदिवासी क्‍लस्टरअंतर्गत १४१४ हेक्‍टरवर लागवड होणार आहे.

पालघर - जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या वनपट्ट्यांमधून उत्पन्न मिळावे, या उद्देशाने सुमारे तीन कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी फलोत्पादन योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत १०३ आदिवासी क्‍लस्टरअंतर्गत १४१४ हेक्‍टरवर लागवड होणार आहे.

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री विष्णू सवरा, आमदार अमित घोडा, पास्कल धनारे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, कृषी सभापती अशोक वडे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप नेरकर व इतर अधिकारी उपस्थित होते. 

फलोत्पादन योजनेंतर्गत आदिवासी विकास उपयोजनेतील नावीन्यपूर्ण योजनेतून आता एका वर्षाऐवजी दोन वर्षांनी रोपे देण्यात येतील. पालघरमध्ये १५, वसईत १७, डहाणूमध्ये १६, वाड्यात १२, विक्रमगडमध्ये ११, जव्हारमध्ये १८, मोखाड्यात आठ आणि तलासरीत सहा क्‍लस्टरमध्ये लागवड केली जाईल. त्यात ६३८ हेक्‍टरवर आंबा, ४३० हेक्‍टरवर काजू, १९० हेक्‍टरवर शेवगा, ५० हेक्‍टरवर शिंदी आणि जांभूळ, नारळ व चिकू आदी फळझाडांची लागवड होणार आहे. त्यामुळे लाभार्थींना दोन ते पाच वर्षांत उत्पन्न मिळू शकेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला. 

जिल्ह्यात सुमारे १,०८,८६७ हेक्‍टर इतके खरिपाचे क्षेत्र असून प्रामुख्याने भात, नागली व वरई ही पिके घेतली जातात. या पिकांसाठी बियाणे, खत व कीटकनाशकांचा पुरवठा योग्य प्रकारे व्हावा म्हणून आढावा घेण्यात आला. खरीप हंगामामध्ये १५० कोटी रुपयांचा पतपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सवरा यांनी दिली. खत, कीटकनाशके, पीक विमा योजना, पिकासाठी कर्ज आदी बाबींसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत समाविष्ट केले जाणार असून इतर शेतकऱ्यांनी केंद्राच्या पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. खरीप हंगामात काजू, आंबा व चिकू लागवडीच्या पूर्ण क्षेत्रावर हवामान आधारित विमा काढण्यात येईल, असे सांगण्यात आले.

पालघर जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये ७६,४३० हेक्‍टर क्षेत्रावर भाताची लागवड होणार असून महाबीजच्या ९१७५ व खासगी कंपन्यांच्या १६,९६४ क्विंटल बियाण्यांची मागणी आहे. भाताच्या बियाण्यात ८५ टक्के बदल अपेक्षित आहे. उत्पन्न आणि उत्पादकतेमधील वाढीसाठी कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचे प्रमाण वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. २०१८-१९ मध्ये आदिवासी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्‍टर पॉवर टिलरचे वाटप करणारा पालघर हा कोकण विभागातील एकमेव जिल्हा ठरला, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी या वेळी दिली. 

जिल्ह्यातील डहाणू-घोलवड येथील चिकूला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. या यशाबद्दल प्रगतशील शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पालकमंत्री सवरा यांनी ‘मृद्‌ आरोग्यपत्रिका वितरण कार्यक्रम’ या पुस्तिकेचे प्रकाशन केले. 

गटशेतीला प्रोत्साहन
गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी घोलवड येथे चिकू गट, केळवे येथे नारळ गट, जव्हार येथे मोगरा गट, वाड्यामध्ये यांत्रिकीकरण, दुग्ध व्यवसाय, कृषी पर्यटन, सेंद्रिय शेतीसाठी गट तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक गटाला एक कोटी रुपयांपर्यंत अर्थसाह्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ९८३ गावांमधील एक लाख ४६ हजार ८५२ खातेदार शेतकऱ्यांचे ५९८३ गट तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ‘आत्मा’अंतर्गत ४२९० गटांची नोंदणी झाली आहे. २०१७-१८ मध्ये ३४६५ गटांची नोंदणी झाली असून, उर्वरित १६९३ गटांची नोंदणी या वर्षात करण्याचा मानस आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news 1414 hector Horticulture plantation