जमिनीच्या सुपिकतेसह काटेकोर शेतीचा ध्यास

काटेकोर शेती व्यवस्थापनावर जितेंद्र पाटील यांनी भर दिला आहे.
काटेकोर शेती व्यवस्थापनावर जितेंद्र पाटील यांनी भर दिला आहे.

दरवर्षी किमान एक लाख रुपये उत्पन्न देऊ शकेल अशा प्रकारे पिकाची निवड करायची, त्याचे एकरी उत्पादनही त्याच प्रकारे वाढवायचे, अशा प्रकारे शेतीची रचना नारोद (जि. जळगाव) येथील युवा शेतकरी जितेंद्र रामलाल पाटील यांनी स्थापित केली आहे. जमिनीची सुपिकता वाढविणे व काटेकोर शेतीची सूत्रे अवलंबिणे याच दोन मुख्य बाबींवर त्यांनी शेतीचा पाया भक्कम केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील नारोद (ता. चोपडा) हे गाव चोपडा शहरापासून सुमारे सहा किलोमीटरवर आहे. सातपुडा पर्वतालगत असलेल्या गावाची लोकसंख्या सुमारे दोन हजारांपर्यंत आहे. काळी कसदार जमीन गावाच्या आजूबाजूला आहे. 

माती सुधारण्याला प्राधान्य 
गावातील जितेंद्र पाटील यांची सुमारे २३ एकर शेती आहे. तसेच सुमारे ३३ एकर शेती ते ‘लीज’ पद्धतीने करतात. सुमारे ११ वर्षांपासून शेतीची जबाबदारी ते लहान बंधू अरविंद यांच्या सोबतीने समर्थपणे सांभाळत आहेत. पूर्वी पाटील यांच्या जमिनीचा कस चांगला नव्हता. जेमतेम उत्पादन आणि उत्पन्न हाती यायचे. अशीच शेती कायम राहिली  तर जगाच्या आपण मागे पडू, असे जितेंद्र पाटील यांना वाटले. त्यांनी सुरू केली मातीपासून सुधारणा.

यात काय केले?
मातीचा निचरा चांगला होत नव्हता. तो होण्यासाठी चुनखडीयुक्त मातीचा वापर केला.
शेणखत एकरी सहा ट्रॉली वापर. (आजही तो कायम)
जीवामृत दर महिन्याने.
पिकाला जेवढी गरज तेवढेच पाणी व तेवढेच रासायनिक खत. 
प्रत्येक पिकाचा सूक्ष्म अभ्यास, शास्त्रीय पद्धतीने वा काटेकोर शेतीचा अंगीकार. 
दीर्घ अनुभव हादेखील ठरला गुरू. 

शेतीची ठेवलेली मुख्य सूत्रे  
मातीची सुपिकता वाढवली.
काटेकोर व्यवस्थापनावर भर.
गारपीट वा आपतकालीन संकटात नुकसान कमी होईल अशा पिकांची निवड (उदा. पेरू) 
असे पीक निवडायचे की ते वर्षाला किमान एक लाख रुपये उत्पन्न देईल. त्याच पद्धतीने उत्पादनवाढ व दर्जा वाढवायचा.
मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी शेतकऱ्यांसह गटबांधणी.

पीक पद्धतीची वैशिष्ट्ये  
केळी- दरवर्षी सुमारे १८ एकर, लागवड ते काढणीपर्यंतचे ‘फ्रूट केअर’ तंत्रज्ञान आत्मसात करून निर्यातक्षम उत्पादन- एकरी ३० ते ३२ टन.
सुमारे १२ एकर तैवान पपई- एकरी ४० टन उत्पादन. एका प्रयोगात ते 
६० टनांच्या आसपासही पोचले होते.  
पपई, मिरची, वांगी आदींची नर्सरी- त्यातून वर्षाला अतिरिक्त 
उत्पन्नाची जोड. 
हरभरा- १० ते १२ एकरांवर- पाच बाय एक फुटावर सरीत दोन ओळी लागवड. एकरी सात- आठ क्विंटल उत्पादन. 
ॲपल बोरचाही नवा प्रयोग, शिवाय कांदा व हळद. 
पेरू- आठ बाय पाच फूट अंतरावर सघन पद्धतीने लागवड. एकरात सुमारे १०८९ झाडे. पहिल्या बहाराचे उत्पादन घेतले आहे. सुरवातीला दररोज ५० ते ६० क्रेट मिळणारे उत्पादन आता २० क्रेटपर्यंत मिळते. सरासरी २५० ते ३०० ग्रॅम तर कमाल वजन ७०० ग्रॅम मिळाले आहे. नजीकच चोपडा येथे विक्री केली जाते.

चोख व्यवस्थापनातील बाबी 
खते देण्याचे वेळापत्रक तीन टप्प्यांत तयार केले आहे. विद्राव्य खतांचाही 
वापर होतो. 
नारोद व परिसरात पाण्याची कमतरता होती. त्यामुळे माचले (ता. चोपडा) येथे कूपनलिका तयार केली. सुमारे १२ लाख रुपये खर्चून शेतापर्यंत चार इंची जलवाहिनी करून घेतली. 
'लीज’वरील ३३ एकरसह स्वःमालकीच्या २३ एकरांतही ‘ड्रीप’   

टोमॅटोतील विशेष बाबी 
टोमॅटो- दरवर्षी साडेतीन ते चार एकरांवर लागवड- उत्पादन एकरी ६० टन घेण्याची क्षमता.

मल्चिंग, ड्रीप व गादीवाफ्यावर सप्टेंबरच्या अखेरीस वा ऑक्‍टोबरच्या मध्यात पाच बाय दोन फूट अंतरात लागवड. टोमॅटोच्या प्रति झाडाला १० चौरस फूट जागा मिळेल असे नियोजन.

लागवडीपूर्वीच टोमॅटोसंबंधीचे पहिल्या ते शेवटच्या दिवसापर्यंतचे नियोजन वही किंवा पुस्तिका बनवून करण्यात येते. 

एका झाडानजीक दोन ओळींमध्ये दोन बांबू व चार तार बांधून वेलींना ताण. यातून झाडाच्या प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश मिळेल अशी व्यवस्था. एक तार प्रत्येकी अडीच फुटांवर तर दुसरी चार फुटांवर.

दोन बांबूंचा आधार झाडाला. यात हवा चांगली खेळती राहते. रोग, फूलगळ यांचे प्रमाण कमी राहते. शिवाय दर्जा राखता येतो. त्यांचे हे तंत्रज्ञान अभ्यासण्यासाठी मध्य प्रदेश व खानदेशातील शेतकरी भेट देतात. 

मार्केट 
स्थानिक मार्केट उपलब्ध आहेच. शिवाय टोमॅटोला सुरतचे (गुजरात) मार्केट मिळाले आहे. सुरतचे व्यापारी मालाची आगाऊ नोंदणी करतात. प्रति क्रेट ३८  रुपये भाडेवाहतुकीसाठी तर भाड्यापोटी प्रति क्रेट आठ रुपये द्यावे लागतात. क्रेट व्यापाऱ्यांकडून उपलब्ध होतात. केळी नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीला पुरविली जातात. किलोला साडेसाेळा रुपये दर मागील वेळी मिळाल्याचे पाटील म्हणाले. पेरूला किलोला २० रुपये दर मिळाला आहे. परिसरातील नामवंत कंपनीही प्रक्रियेसाठी काही माल घेत असल्याचे विक्रीची शाश्वती मिळते असे पाटील म्हणाले. 
- जितेंद्र पाटील, ९८२२८५६२३८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com