साठवण क्षमता वाढवण्यासह संत्र्यांचे करा मूल्यवर्धन

साठवण क्षमता वाढवण्यासह संत्र्यांचे करा मूल्यवर्धन

प्रतवारीनंतर मोठ्या आकाराच्या संत्रा फळांना देशांतर्गत आणि निर्यातीसाठी बाजारात चांगला दर मिळतो. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रतीच्या फळांना कमी दर मिळतो. काही वेळा ती बाजारात पाठवणेही परवडत नाही. त्यामुळे या फळांच्या प्रक्रियेला मोठा वाव आहे. संत्र्यांच्या फळांच्या घरगुती पातळीवरील प्रक्रियांची माहिती घेऊ.
 

राज्यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील अमरावती, अकोला, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये संत्र्यांची लागवड सुमारे ८० हजार हेक्टर क्षेत्रावर आहे. त्यातून सुमारे ५ लाख टन उत्पादन प्रति वर्ष मिळते. त्यातही अमरावती या एकाच जिल्ह्यातील लागवड ५६,७४७ हेक्टर ( ४५ टक्के) आहे.

या जिल्ह्यामध्ये देशातील संत्रा उत्पादनाच्या ४५.५ टक्के उत्पादन होते. नागपूर- अमरावतीच्या संत्र्यांना दर्जा आणि चांगली टिकवणक्षमता यामुळे देशामध्ये सर्वत्र प्राधान्याने केरळमध्ये मोठी मागणी असते. त्याच प्रमाण रशिया आणि युरोपमध्येही त्यांची निर्यात होते. अर्थात, हंगामात बाजारातील आवक वाढल्यानंतर फळांच्या किंमती ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचे दिसून आले.  

संत्रा सामान्यतः ताज्या स्वरुपामध्ये किंवा रस, स्क्वॅश, जिलेटीन, सिरप या स्वरुपामध्ये वापरली जातात. त्याप्रमाणे विविध पदार्थांमध्ये संत्र्यांचा स्वादासाठी वापर केला जातो. तसेच प्रामुख्याने संत्र्याच्या सालीचे तेल, सायट्रिक अॅसिड, सौंदर्य प्रसाधनासाठी उपयुक्त ठरतात. अर्थात, साठवण आणि वाहतुकीच्या अल्प सुविधा, काढणीपश्चात नुकसान, खर्चिक पॅकेजिंग, पॅकिंगसाठी मजुरांची अनुलब्धता या सोबत व्यापाऱ्याकडून घेतली जाणारी अनियमित दलाली आणि पट्टी हातामध्ये मिळण्यास होणारा उशीर अशा अनेक समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.   

संत्र्यांचे आरोग्यासाठी फायदे -
संत्र्यामध्ये ऊर्जेचे प्रमाण कमी असून, पोषक घटक भरपूर प्रमाणात आहेत. नितळ त्वचेसाठी उपयुक्त असून, आहारामध्ये नियमित वापर असल्यास विविध रोगांचा धोका कमी होतो. 

आरोग्यासाठी उपयुक्त १७० रसायने असून, ६० पेक्षा अधिक फ्लॅव्होनॉईड घटक असतात. त्यामुळे दाह कमी होऊन पोषकतेमध्ये संत्रा फळे परिपूर्ण ठरतात. 

खाण्यापूर्वी संत्रे वाहत्या पाण्यामध्ये धुवून घ्यावेत. त्याच प्रमाणे अन्नातून पसरणाऱ्या आजारासाठी संवेदनशील असणाऱ्या व्यक्तींनी संत्र्याचा ताजा रस पिण्याऐवजी पाश्चरायझेशन केलेल्या रसाला प्राधान्य द्यावे.   
उत्पादन, प्रक्रिया आणि विपननासंदर्भात योग्य ती पावले उचलण्याची आवश्यकता असून, त्यातूनच अचानक प्रचंड वाढणाऱ्या हंगामी उत्पादन आणि घसरणाऱ्या दरावर नियंत्रण आणणे शक्य होईल. 

टिकवण क्षमता वाढवण्यासाठी खाद्ययोग्य आवरण -
मेणामध्ये ०.१ टक्के थायोबेन्डाझोल मिसळून त्याची अत्यंत पातळ फवारणी फळांवर करावी. त्यानंतर हवेच्या साह्याने फळे वाळवून, पॅकेजिंग करावी. एका सीएफबी बॉक्समध्ये सुमारे ३० फळे बसतात. या मेणाच्या प्रक्रियेमध्ये फळातील रसाचे प्रमाण, टीएसएस, आम्लता आणि अॅस्कॉर्बिक आम्ल यावर कोणताही परीणाम होत नाही. मात्र, मेणाच्या प्रक्रियेमुळे संत्र्यांचे नुकसान रोखले गेल्याने फळे साधारणपणे ५० दिवसांपर्यंत चांगली राहतात.

संत्र्याचा गोठवलेला तीव्र रस -
फळे स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यावरील साल माणसांच्या साह्याने किंवा छोट्या साधनाद्वारे काढावे. संत्र्यावरील बाह्य थर हाताने काढून, आतील पूर्ण गर वेगळा करावा. ज्युसर आणि पोमॅस किंवा पल्परच्या साह्याने सुमारे ५० टक्क्यांपर्यंत रस काढावा. रस काढल्यानंतर शिल्लक राहणारा भाग हा मिठाईमध्ये वापरता येतो. रसातील पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रेशर कुकरमध्ये शिट्टी काढून शिजवावा. त्यामुळे रसाचे तीव्र द्रावण वाफ आणि हवारहित वातावरणामध्ये तयार होईल. रसातील विद्राव्य घन पदार्थ (ब्रिक्स) हे अंदाजे १२ टक्के असतात.  बाष्पीभवनाच्या प्रक्रियेमध्ये ब्रिक्स वाढून अंदाजे ६५ अंशापर्यंत पोचतात. हे तीव्र द्रावण गोठवण तापमानाला साठवावे. 
वापरता सामान्य तापमानाला आल्यानंतर ३ पट पाणी मिसळल्यानंतर सामान्य संत्रा रस (१२ ब्रिक्स) तयार होतो. त्याचा चव, स्वाद संत्र्याप्रमाणेच लागते. अधिक चवीसाठी आवश्यकता भासल्यास साखर वाढवावी. 

संत्रा किंवा मोसंबीचे मूल्यवर्धित पदार्थ
गोठवलेला संत्रा गर - वास्तविक संत्रा गर किंवा चोथा हा रस काढल्यानंतर शिल्लक राहणारा उपपदार्थ आहे. त्यामध्ये फायबर किंवा तंतूमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते.  त्यातून संत्र्याचा स्वाद मिळू शकते. हे उत्पादन निर्जंतुक करून गोठवण तापमानामध्ये साठवावे. त्याच प्रमाणे हा गर गोठवण तापमानाला वाळवल्यास त्यातून विविध मूल्यवर्धित पदार्थ बनवता येतात. 

संत्रा प्युरी - उत्तम आणि चांगली फळांचे काप किंवा पिळून त्यापासून प्युरी बनवता येते. प्युपरी हा अर्ध प्रक्रिया पदार्थ असून, त्याचा बेकरी, डेझर्ट आणि पेय उद्योगामध्ये व्यावसायिक वापर होतो. त्याची साठवण गोठवून करावी. एकूण फळांच्या वजनाच्या ५० ते ६० टक्के प्युरी उत्पादन होते. 

संत्रा वाईन (किण्वनयुक्त पेय) - हे अल्कोहोल असलेले पेय असून, संत्र्याच्या किण्वन प्रक्रियेने मिळते. त्यासाठी जवळ जवळ द्राक्षाच्या वाईनप्रमाणेच प्रक्रिया आहे. प्रामुख्याने व्हॅलेन्सिया संत्र्याच्या रसाचा उपयोग वाईन निर्मितीसाठी होते. उत्पादन तयार झाल्यानंतर त्यात अल्कोहोलचे प्रमाणे १४.५ टक्के असते. तसेच ते गोड लागते. डेझर्ट वाईन म्हणून त्याचा वापर होतो. गोठवून वाळवलेल्या संत्रा पाकळ्या - संत्र्याच्या गरातील रसयुक्त भाग गोठवण वाळवले जातात. या प्रक्रियेमध्ये त्यातील संपूर्ण रस, स्वाद, जीवनसत्त्वे आणि खनिजे उपलब्ध होतात. ही प्रक्रिया आणि त्यानंतर उत्तम पॅकिंगमुळे पदार्थाची साठवण क्षमता आणखी सहा महिन्यापर्यंत वाढते. त्यात कोणतीही साखर, प्रिझर्वेटिव्ह आणि वाढीव पदार्थांचा वापर केला जात नाही. त्यामुळे १०० टक्के शुद्ध संत्र्याचे गुणधर्म मिळतात. त्यात सी जीवनसत्त्व, तंतूमय पदार्थ असल्याने सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी उत्तम ठरते. या गोठवून वाळवलेल्या उत्पादनामध्ये आर्द्रतेचे प्रमाण ५ टक्के असून, साठवण कालावधी १८ महिन्यांपर्यंत आहे. 

प्रक्रिया -  बिया आणि पांढरा थर वेगळा करून संत्र्यातील केवळ गर घेतला जातो. तो ड्रायरमध्ये ठेवून, वजा ४० अंश सेल्सिअस किंवा आणखी थंड तापमानाला ठेवला जाते. संपूर्णपणे गोठल्यानंतर त्याभोवती ड्रायरमध्ये तीव्र अशी वातरहित अवस्था निर्माण केली जाते. त्यानंतर हे कण किचिंत गरम केले जातात. त्यामुळे त्यातील बर्फाचे वाफेमध्ये रूपांतर होते. 

संत्रा मिठाई किंवा बर्फी -
पसरट भांड्यामध्ये तूप गरम करून त्याती गव्हाचे पीठ हलके तपकिरी होईपर्यंत परतावे. ही क्रिया अत्यंत सावधानतेने करावी, अन्यथा पीठ चिटकून राहते किंवा लवकर जळते. आचेवरून भांडे उतरून खाली ठेवावे. संत्री सोलून, त्यातील बिया व साल काढून टाकावी. त्यातील केवळ गर घ्यावा. वेगळ्या भांड्यामध्ये दूध गरम करून, त्यात साखर आणि संत्र्याचा गर चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावा. सावकाशपणे हलवत हे मिश्रण अर्ध्यापेक्षा कमी इतके घट्ट करावे. या स्थितीमध्ये तुपात तपकीरी रंगाचा होईतो भाजलेले गहू पीठ मिसळावे. ते चांगले एकजीव होईल व गाठी राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. दोन चमचे मध्यम गरम दूधामध्ये केशर चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. ते मिश्रण वरील मिश्रणात टाकावे. मिश्रणाला तुप सुटेपर्यंत आणखी काही मिनिटे गरम करावे. हे शिजलेले मिश्रण गरम असतानाच तूप लावलेल्या पसरट भांड्यामध्ये किंवा बेकिंग ट्रेमध्ये पसरून थंड करावे. त्यानंतर योग्य आकारामध्ये कापून वड्या पाडाव्यात. झाली संत्रा बर्फी तयार...

ऑस्मोटिक डिहायड्रेटेड संत्रा पाकळ्या
फळे स्वच्छ धुवून, त्यातील गर आणि कण वेगळे करून घ्यावेत. त्यातील बिया काढून टाकाव्यात. पाण्यामध्ये ६० टक्के साखर टाकून साखरेचे द्रावण करून घ्यावे. त्यात वेगळे केलेले संत्रा कण टाकून रात्रभर ठेवावे. हे कण दुसऱ्या दिवशी बाहेर काढून, सौर वाळवण यंत्र किंवा कॅबिनेट ड्रायरच्या साह्याने तापमान ४५ ते ५० अंश सेल्सिअस पर्यंत ठेवून वाळवावेत. साधारणतः ८ ते १२ तासामध्ये कणातील आर्द्रता १२ टक्क्यांपर्यंत आणावी. 

अंतिम उत्पादन हे दिसणे, चव, स्वाद आणि रंग या दृष्टीने उत्तम प्रतिचे होते. 

हे उत्पादन पॉलिइथिलीन पिशव्यांमध्ये पॅक करावे. सामान्य तापमानाला तीन ते पाच महिन्यासाठी आणि त्याही पेक्षा अधिक कालावधीसाठी रेफ्रिजरेटरमध्ये राहू शकतात. 

ते कॅन्डीप्रमाणे सरळ खाता येतात. किंवा त्यात पाणी ज्युसर ग्रायंडरमधून फिरवल्यास संत्रा रस मिळू शकतो.

घनतेच्या तीव्र दाबामुळे आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. अशा प्रकारचे आर्द्रता कमी केलेली उत्पादने नाष्ट्यासाठी किंवा जाता येता खाण्यासाठी उपयोगी ठरतात. मुले, वयस्कर व्यक्ती आणि दुर्गम भागातील लष्करी तळ यासाठी त्यांचा उपयोग होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com