शेतीमाल वाहतूक, विक्रीला फटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

पुणे - जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर जाहीर महाराष्ट्र बंदला बुधवारी काही हिंसक अपवाद वगळता राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बंदमुळे शेतीमाल वाहतुकीला फटका बसला, तर राज्यातील अनेक बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प राहिल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली. 

पुणे - जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर जाहीर महाराष्ट्र बंदला बुधवारी काही हिंसक अपवाद वगळता राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बंदमुळे शेतीमाल वाहतुकीला फटका बसला, तर राज्यातील अनेक बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प राहिल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली. 

कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी राज्यात डाव्या अाणि दलित संघटनांकडून बुधवारी (ता. ३) बंद पुकारण्यात आला होता. यास राज्यातील बहुतांश भागांत प्रतिसाद मिळाला. संसदेतही या घटनेचे पडसाद उमटले. कॉँग्रेसकडून कोरेगाव भीमा येथील दंगलीचा मुद्दा लोकसभेत काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपस्थित केला. दलित संघटनांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको केले, शहरात रॅली काढून बंदचे आवाहन केले. अनेक भागात शैक्षणिक, खासगी संस्था, खासगी आणि सरकारी वाहतूक व्यवस्था बंद होत्या, यामुळे जनजीवन विस्कळित झाले. सायंकाळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बंद मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले.

बंदमुळे असे झाले नुकसान...
 रस्ता रोकोमुळे शेेतमाल वाहतूक करणाऱ्या गाड्या अडकल्या
 बहुतांश बाजार समित्यांत बंद, काही ठिकाणी अत्यल्प व्यवहार
 नाशवंत शेतमालाचे नुकसान वाढले; शेतकऱ्यांची कोंडी
 शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडून शेतमालाची विक्रीच नाही
 राज्यातील बाजार समित्यांत आज आवक वाढण्याची शक्यता 

राज्यभरातील बंदचे पडसाद...
 बंदमुळे मुंबईची नाकाबंदी. मेट्रो, लोकल रेल्वे, रस्ते वाहतूक ठप्प 
 मुंबईला होत असलेल्या भाजीपाला, दूधपुरवठ्यावर फारसा परिणाम नाही 
 औरंगाबाद, जालना येथील बाजार समित्यांमध्ये व्यवहार ठप्प राहिले
 कोल्हापुरात बंदला हिंसक वळण; पण शेतमाल व्यवहार सुरळीत
 सोलापुरात बंदला प्रतिसाद; कांद्याच्या लिलाव मात्र सुरळीत सुरू
 नांदेड, परभणी जिल्ह्यांत बाजार समित्यांतील व्यवहार बंद होते 
 बंदला वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये १०० टक्के प्रतिसाद मिळाला
 सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू असलेले सौदे बंद पाडले
 नाशिक जिल्ह्यात बंदला प्रतिसाद; शेतमाल व्यवहार सुरळीत
 खानदेशातील धुळे, जळगाव जिल्ह्यांत बंदला प्रतिसाद

कोरेगाव भीमा येथील घटनेसंदर्भात राज्य शासन अत्यंत बेजबाबदारपणे वागले आहे. राज्यभरात जी काही परिस्थिती बिघडत आहे, त्याला राज्य सरकारच जबाबदार आहे. 
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री  

महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन आणि आभार. त्यांनी आमच्या भावना समजून घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद. या प्रकरणातील दोषींना सरकारने लवकर अटक करावी. 
- प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, भारिप बहुजन महासंघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news agriculture goods loss sailing loss