अमेरिकेतील ॲमिश फार्म

आधुनिक यंत्राने गहू कापणी आणि मळणी
आधुनिक यंत्राने गहू कापणी आणि मळणी

ॲमिश फार्म ही केवळ सेंद्रिय शेती पद्धती नसून, ती राहणीमानाची पद्धती आहे. ॲमिश लोक श्रमाला फार महत्त्व देतात. शेतीच्या बरोबरीने पशुपालनही करतात. आता काही लोकांनी शेती, पशुपालनाच्या बरोबरीने पारंपरिक ॲमिश पारंपरिक खाद्यपदार्थांचे हॉटेल सुरू केले आहेत. त्याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. 

यंदाच्या मे महिन्यामध्ये मला अमेरिकेतील वैशिष्ट्यपूर्ण शेती पद्धती  पाहावयास मिळाली. आपल्याकडील शेती आणि अमेरिकेतील शेती व्यवस्थापन पद्धतीमध्ये खूप फरक आहे. अमेरिकेचा इतिहास पाहता १८७० च्या काळात ५० टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर अवलंबून होते.

सध्याच्या परिस्थितीत केवळ दोन टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर अवलंबून आहे. अमेरिकेत सध्या सुमारे २२ लाख शेतकरी कुटुंबे आहेत. त्यांची सरासरी जमीन धारणा ४०० ते ४५० एकरांच्या दरम्यान आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने मका, सोयाबीन, गहू, भात, कापूस, बटाटा, संत्रा, द्राक्ष, सफरचंद, ज्वारी, टोमॅटो, लेट्यूस, शुगरबीट तसेच विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड करतात. या पिकांची व्यावसायिक तत्त्वावर मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. येथील पीक उत्पादकतेचा विचार करता मका ८६ क्विंटल प्रतिहेक्टरी, भात ७८ क्विंटल प्रतिहेक्टरी, ज्वारी २८ क्विंटल प्रतिहेक्टरी, सोयाबीन २८ क्विंटल प्रतिहेक्टरी, तर कापूस ६५० किलो लिंट प्रतिहेक्टरी आहे. 

अमेरिकेतील शेती व्यवस्थापन पाहता यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. लागवडीपासून ते प्रतवारीपर्यंतच्या विविध टप्प्यात यंत्राचा वापर केला जात असल्याने मनुष्यबळ कमी लागते. शेतमालाची गुणवत्ता चांगली राखली जाते. यांत्रिकीकरणामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जमिनी लागवडीखाली आणता आल्या आहेत. काटेकोर शेती पद्धतीवर येथील शेतकऱ्यांचा भर आहे. याचबरोबरीने उत्पादनवाढीसाठी रासायनिक खते, कीडनाशकांचाही योग्य प्रमाणात वापर येथील शेतकरी करतात. काटेकोर पाणी व्यवस्थापनावर येथील शेतकऱ्यांचा भर आहे.  

सेंद्रिय फार्म 
सेंद्रिय उत्पादनांचा आज जगात बोलबाला आहे. जर्मनी, अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड इत्यादी अनेक विकसित देशांत सेंद्रिय शेतमालास मोठी मागणी आहे. भारतातही आता सेंद्रिय बाजारपेठ विकसित होत आहे.  जागतिक बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन अमेरिकेतील शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. सध्या सुमारे १३,००० शेतकऱ्यांचे फार्म हे सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे फार्म म्हणून ओळखले जातात. सर्व फार्म हे प्रमाणित आहेत. त्यामुळे उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत शाश्वती आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने मका, गहू, सोयाबीन, भात, लेट्यूस, पालक, ब्रोकोली, जागर, सफरचंदाची लागवड सेंद्रिय पद्धतीने करतात. याचबरोबरीने दूध, अंड्यांचेदेखील सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

वैशिष्ट्यपूर्ण अॅमिश फार्म
अमेरिकेत विविध ठिकाणांना भेटी देत असताना मला फिलाल्डेफियामधील अॅमिश फार्मला भेट देण्याची मला संधी मिळाली. वास्तविक आपल्याकडील कृषी पर्यटन केंद्राप्रमाणेच ॲमिश फार्म असावा अशी संकल्पना मनात होती; परंतु प्रत्यक्ष भेटीमुळे तेथील ग्रामीण जीवन आणि शेती पद्धतीची माहिती मिळाली. ॲमिश फार्म ही केवळ सेंद्रिय शेतीपद्धती नसून, ती राहणीमानाची पद्धती आहे. स्वित्झर्लंडमधील जकोब अम्मान यांनी १६९३ मध्ये ॲमिश जीवनपद्धतीची सुरवात केली, असे सांगितले जाते. ॲमिश संप्रदाय एका विशिष्ट पद्धतीने जीवन जगतो. अम्मान यांच्या पंथाचे ज्यांनी अनुकरण केले त्यांना ॲमिश म्हटले जाते. अमेरिकेत विविध ठिकाणी ते समूहाने राहतात. आजमितीस सुमारे तीन लाखांच्या आसपास त्यांची लोकसंख्या आहे. शेती हा त्यांचा चरितार्थाचा प्रमुख व्यवसाय आहे. अत्यंत साध्या पद्धतीने जीवन जगणे, कोणत्याही आधुनिक यंत्र, अवजारे सुविधांचा वापर न करणे, नैसर्गिक जीवनक्रम अंगीकारणे हा त्यांच्या संस्कृती आणि राहणीमानाचा भाग आहे. 

ॲमिश लोक ग्रामीण भागात समूहाने राहतात. शेतीमध्ये प्रामुख्याने मका, सोयाबीन, भाजीपाला, गव्हाची लागवड करतात. पिकांना रासायनिक खते, कीडनाशकांचा वापर करत नाहीत. अॅमिश लोक शेतीमध्ये ट्रॅक्‍टर, रोटाव्हेटर, पॉवरटिलर इत्यादी यंत्रसामग्री वापरत नाहीत. हे लोक प्रामुख्याने घोड्याच्या साह्याने नांगर, कुळवणी, पेरणी, आंतरमशागत, वाहतूक, मळणी इत्यादी शेतीची कामे करतात. घोड्याच्या साह्याने शेती करण्यासाठी ॲमिश शेतकऱ्यांनी अवजारे विकसित केलेली आहेत. वाहतुकीसाठी मोटारसायकल, कार, इ. वाहतुकीची साधने न वापरता प्रामुख्याने घोडागाडीने प्रवास करतात. त्यामुळे गाडी खरेदी, पेट्रोल, डिझेल इ. अनुषंगिक बाबी त्यांना लागतच नाहीत. 

घरात, शेती व्यवस्थापनात ॲमिश लोक विजेचा वापर करत नाहीत. मात्र, सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जेचा ते चांगल्या प्रकारे वापर करतात. हे लोक घरात टीव्ही, फ्रिज, मिक्‍सर, ओव्हन, फॅन, विद्युत शेगडीदेखील वापरत नाहीत. आजही ॲमिश कुटुंबीय टेलिफोन, मोबाईल, कॉम्प्युटरसेवेपासून लांब आहेत.

ॲमिश लोक श्रमाला फार महत्त्व देतात. शेतीच्या बरोबरीने पशुपालनही करतात. या समुदायांचे गायींचे गोठे आहेत. ॲमिश लोक गायीचे दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर करत नाहीत. कॅनमध्ये दूध साठवत नाहीत. शेतमाल विक्री तसेच प्रक्रिया पदार्थांची विक्री, हस्तकलेच्या वस्तू, दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतून कुटुंबाचा आर्थिक उदरनिर्वाह होतो. आता काही लोकांनी पारंपरिक ॲमिश  पारंपरिक खाद्यपदार्थांचे हॉटेल सुरू केले आहेत. त्याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. 

ॲमिश लोकांचा पोषाखही वैशिष्ट्यपूर्ण आहे. अंगभर कपडे, काळे पायमोजे, बूट घालतात. डोक्‍यावर विशिष्ट प्रकारची टोपी ॲमिश लोक घालतात. ॲमिश समुदायामध्ये लग्न फक्त त्यांच्या समुदायातील व्यक्तीशीच होते. मुलांना फक्त आठवीपर्यंतच शाळा असते. या समुदायातर्फे मुलांच्या शिक्षणासाठी स्वतंत्रपणे शाळा चालविली जाते. मुलांना फारसे उच्च शिक्षण दिले जात नाही, कारण त्यामुळे विभक्त कुटुंबाचा धोका संभावतो.

मुलामुलींचे आठवीपर्यंत शिक्षण झाल्यावर २-३ वर्षे त्यांना विविध विषयांतील प्रशिक्षण दिले जाते. वयाच्या १६ किंवा २५ व्या वर्षी मुलांना दीक्षा दिली जाते. ज्यांना दीक्षा घ्यायची नाही, ते स्वतंत्र जीवनपद्धतीचा अंगीकार करतात. मात्र आजच्या युगातही सुमारे ८० टक्के मुले दीक्षा घेऊन ॲमिश जीवन पद्धतीची निवड करतात. 

ॲमिश लोक आपल्या समुदायाशिवाय बाहेरच्या लोकांमध्ये मिसळत नाहीत. ॲमिश समुदाय प्रामुख्याने धार्मिक वृत्तीचा आहे. रविवारी एखाद्याच्या घरी सर्वजण एकत्र येऊन मार्गदर्शन घेतात. या समुदायामध्ये लग्न फक्त मंगळवार किंवा गुरुवारी सकाळी ४ वाजता होते. या समुदायातील महिला कोणत्याही प्रकारचे दागिने घालत नाहीत. हे लोक सैन्यामध्ये सहभागी होत नाहीत. कोणत्याही प्रकारचा व्यक्तिगत किंवा पीकविमा, सामाजिक सुरक्षा घेत नाहीत. उपचारासाठी पारंपरिक औषधोपचारावर त्यांचा भर असतो. त्यांचे जेवण वैशिष्ट्यपूर्ण आणि पारंपरिक पद्धतीचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com