प्रयोगशीलतेला दिली आधुनिक तंत्राची जोड

संतोष मुंढे
बुधवार, 10 जानेवारी 2018

प्रयोगशीलता व आधुनिक साधनांचा कार्यक्षम वापर यांचा संगम औरंगाबाद जिल्ह्यातील काऱ्होळ गावचे शेतकरी संजय भीमराव राऊत यांच्याकडे पाहायला मिळतो. डाळिंबाच्या शेतीला मोसंबी, द्राक्ष या पिकांची जोड देऊन त्यांनी शेतीत शाश्वततेचा मार्ग प्रशस्त केला. पाण्याची शाश्वतता मिळवण्यासाठी दोन शेततळी, ठिबक सिंचन तर सुधारित तंत्राच्या वापरात सहा सीसीटीव्हींची जोड त्यांनी दिली आहे. 

प्रयोगशीलता व आधुनिक साधनांचा कार्यक्षम वापर यांचा संगम औरंगाबाद जिल्ह्यातील काऱ्होळ गावचे शेतकरी संजय भीमराव राऊत यांच्याकडे पाहायला मिळतो. डाळिंबाच्या शेतीला मोसंबी, द्राक्ष या पिकांची जोड देऊन त्यांनी शेतीत शाश्वततेचा मार्ग प्रशस्त केला. पाण्याची शाश्वतता मिळवण्यासाठी दोन शेततळी, ठिबक सिंचन तर सुधारित तंत्राच्या वापरात सहा सीसीटीव्हींची जोड त्यांनी दिली आहे. 

अलीकडील काळात प्रतिकूल हवामानाच्या समस्या वाढल्या आहेत. साहजिकच तंत्रज्ञान, सुयोग्य नियोजन यांद्वारे शेतकरी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पाण्याचे बचत गट निर्माण करणारे गाव म्हणून काऱ्होळाची अोळख आहे. पाण्याचे महत्त्व ओळखून त्याची साठवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेततळे निर्माण करण्याला येथील शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. याच गावच्या दरकवाडी शिवारात असलेल्या साडेचौदा एकर शेतीचे मालक संजय राऊत त्यापैकीच एक. पत्नी, तीन मुली, एक मुलगा असे त्यांचे कुटुंब. दोन शेततळी, जवळपास सात एकरांवर डाळिंब, मोसंबी व द्राक्षाची फळबाग. जोडीला खरिपात कपाशी. अशी संजयरावांची पीकपद्धती आहे.  

संपूर्ण शेतीवर कॅमेऱ्यांची नजर
राऊत यांनी आपल्या संपूर्ण साडेचौदा एकरांवरील शेतीच्या संरक्षणासाठी तसेच त्यामधील प्रत्येक घटकाच्या हालचाली टिपण्यासाठी सहा सीटीटीव्ही बसविले आहेत. त्यातील दोन कॅमेरे शेततळ्यांचे निरीक्षण करतात. तर उर्वरित चार कॅमेरे शेतीत येणारा मुख्य किंवा जवळच्या मार्गावर देखरेख ठेवतात. 

या पद्धतीचे संपूर्ण नियंत्रण घरात बसवलेल्या संगणकाच्या माध्यमाद्वारे केले जाते. त्यामुळे कुटुंबातील कोणत्याही सदस्याला शेतात होणाऱ्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे. 

शेततळ्यांद्वारे पाण्याची शाश्वती
पाण्याचे महत्त्व जाणून असलेल्या राऊत यांनी आपल्या शेतात दोन शेततळी निर्माण केली आहेत. त्यापैकी पहिले शेततळे त्यांनी २०१० मध्ये स्वत:जवळची पुंजी जमा करून उभा केले. त्यासाठी पन्नीसह जवळपास अडीच लाखांवर खर्च आला. दुसरे शेततळे २०१७ मध्ये पन्नी व कंपाउंडसह जवळपास साडेपाच लाख रुपये खर्चून निर्माण केले. त्यामुळे बागेतील विविध पिकांना पाण्याची शाश्वती निर्माण झाली आहे. 

फळबागांचे असे आहे क्षेत्र (सुमारे)
डाळिंब - पावणेतीन एकर 
मोसंबी - पावणेतीन एकर 
द्राक्ष - पावणेदोन एकर  

डाळिंब
सन २०१२ मध्ये डाळिंबाची लागवड केली. सन २०१३ मध्ये सुमारे जवळपास एकूण क्षेत्रातून ४०० क्रेट उत्पादन मिळाले. त्याला जवळपास एक हजार रुपये प्रतिक्रेटचा दर मिळाला. सुमारे चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. सन २०१४ मध्ये ६०० क्रेट उत्पादित डाळिंबाला एक हजार रुपये प्रतिक्रेटप्रमाणे दर मिळाला. तर २०१५ मध्ये हेच उत्पादन ६५० क्रेटपर्यंत मिळाले. सन २०१७ पर्यंत उत्पादनाचा आलेख चढता ठेवण्यास राऊत यांना शक्य झाले आहे. सन २०१७ मध्ये पंधराशे क्रेट उत्पादन, तर पंधराशे रुपये सरासरी दर मिळवण्यात ते यशस्वी झाले.

अन्य फळांचे उत्पादन 
मोसंबीचे गेल्या वर्षीपासून उत्पादन सुरू झाले आहे. मृग बहरात जवळपास दहा टन उत्पादन त्यांना मिळाले आहे. पार्यायी व किमान उत्पन्न मिळवून देण्याची शाश्वती देऊ शकतील, अशा पिकांकडे वळताना राऊत यांनी द्राक्षाची निवड केली. दोन वर्षांपासून ते हे पीक घेत आहेत. मागील वर्षी ३४ रुपये प्रतिकिलो दराने द्राक्षांची विक्री करताना मागील वर्षी सुमारे पाच लाख ३५ हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले. यंदा पुन्हा द्राक्षाची बाग चांगली बहरली आहे. 
 
शेतीतील अन्य वैशिष्ट्ये 
चार ते पाच मजुरांना शेतीत 
कायमचा रोजगार  
दोन कायम स्वरूपी सालदार  
संपूर्ण शेती ठिबकवर 

शाळेलाही करून दिले ठिबक
राऊत सामाजिक बांधिलकी जपण्यातही सतत अग्रेसर असतात. त्यांच्या तीन मुली व एक मुलगा गावच्याच जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी आहेत. आपली मुले ज्या शाळेत शिकतात त्या काऱ्होळ गावच्या शाळेच्या आवारातील झाडांना पाण्याची सोय करून देताना त्यांनी जवळपास साडेतीन हजार खर्चून त्या झाडांना पाणीपुरवठ्यासाठी ठिबक सिंचन करून दिले आहे. 

जमिनीची सुपीकता महत्त्वाची
जमिनीची सुपीकता हा राऊत यांच्यासाठी महत्त्वाचा विषय असतो. सुपीकता टिकवून धरण्यासाठी शेण, गोमूत्र व अन्नधान्यांपासून बनविलेली स्लरी शेतीसाठी वापरतात. प्रत्येक पिकाला साधारणत: २०० लिटर ती ड्रिपरखाली देण्याची सोय ट्रॅक्‍टरच्या साह्याने ते करतात. फळबागेत एका झाडाला किमान एक लिटर स्लरी पडेल असे नियोजन असते. त्यासोबतच पीएसबी आदींचा वापर होतो. एकरी दोन ते अडीच ट्रॉली शेणखत शक्‍य तेवढ्या शेतात ते प्रत्येक वर्षी वापरतात. 

- संजय भीमराव राऊत, ९७६५३५२४६५


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news The combination of modern techniques for experimental