संघर्षातून उजळल्या प्रगतीच्या वाटा

संघर्षातून उजळल्या प्रगतीच्या वाटा

एकेकाळी ऊसतोडणी कामगार असलेले रवींद्र धनसिंग पवार यांनी आज प्रगतिशील, अभ्यासू व यशस्वी फळ बागायतदार म्हणून पंचक्रोशीत नाव कमावले आहे. कष्ट, जिद्द, चिकाटी, ज्ञानी वृत्ती, प्रयोगशील शेतकऱ्यांचा सहवास आदी गुणांच्या जोरावर त्यांनी चार एकरांवरून आपली शेती ७० एकरांवर नेली आहे. त्यांच्या बागेतील उत्कृष्ट, निर्यातक्षम डाळिंब, द्राक्षांना चढ्या दराने मागणी येत आहे. 

प्रगतीचा पहिला टप्पा 
नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यापासून अवघ्या १८ किलोमीटरवरील सातमाणे येथील रवींद्र धनसिंग पवार यांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झालेले. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे चार किलोमीटरवरील रावळगाव साखर कारखान्यात ते ऊस तोडणीसाठी जायचे. त्यावेळी कारखान्यातील व्यवस्थापक संपतराव मोरे फावल्या वेळेत शेतीविषयक कीर्तन करीत. त्यांना पवार हार्मोनियमवर साथ करीत. त्यातूनच मोरे यांच्यासोबत त्यांचे नाते दृढ झाले. मोरे यांनी डाळिंबाच्या लागवडीची प्रेरणा दिली. 

दुसरा टप्पा- उभारलेले भांडवल  
आपल्या वडिलोपार्जित तीन एकरांत डाळिंबाचे नियोजन केले. सासऱ्यांनी जावयाची जिद्द पाहून पाच एचपी क्षमतेची विद्युत मोटर बसवून देण्यासाठी मदत केली. पवार यांनीही आपल्या मुलाच्या कानातील बाळ्या विकून त्यातील पैशांतून तीस गुंठ्यात डाळिंब लागवडीसाठी खड्डे खोदले. 

तिसरा टप्पा 
त्याच वर्षी दुष्काळ पडला. अशा परिस्थितीत पवार यांनी परिसरात सुमारे २८ विहिरींचे खोदकाम करून पै पै जमविले. त्यातून घरगाडा आणि डाळिंब शेतीकडे लक्ष दिले. पण खचले नाहीत. दोन वर्षांनी चांगला पाऊस झाला. मेहनतीला फळ मिळाले. त्या काळात मिळालेले अकरा हजार रुपयांचे उत्पन्न आत्मविश्वास वाढवणारे ठरले. सन १९९६ मध्ये तीन एकरांत डाळिंब लावले. 

चौथा टप्पा 
सन २००४ मधे डाळिंबावर तेलकट डाग रोगाने थैमान घातले होते. पवार यांनी त्यावेळी राज्यातील विविध भागांतील डाळिंब उत्पादकांकडे प्रत्यक्ष भेटी देत रोगासंबंधी बारकावे समजावून घेतले. बाग तेलकट डाग रोगमुक्त होण्यासाठी डाळिंबाचा बहार बदलला. रासायनिक खतांच्या मात्रा कमी केल्या. सेंद्रिय व रासायनिक अशा एकात्मिक पद्धतीचा वापर सुरू केला.  

पाचवा टप्पा 
दरम्यान, मुलेही जाणती झाल्याने त्यांनीही शेतीत लक्ष घालायला सुरवात केली. शेतीला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी परिसरातील बंधाऱ्यातून पाइपलाइनद्वारे पाणी आणले.

नेट व नायलॉन वस्त्राचा वापर 
प्रखर उन्हापासून वाचविण्यासाठी थोडक्यात सनबर्निंगची समस्या टाळण्यासाठी संपूर्ण ४० एकर डाळिंबात व २० एकर द्राक्षात मागील वर्षी बागेवरून नेट आच्छादनाचा यशस्वी प्रयोग केला. मात्र खर्च काही लाख रुपयांवर गेला. मात्र तो कमी करण्यासाठी मुलींच्या ड्रेसवर परिधान केल्या जाणाऱ्या नायलाॅनच्या अोढणी वस्त्राचा वापर केला. त्यासाठी गुजरात राज्यातील वापी येथील कंपनीच्या प्रकल्पाला भेट देऊन तेथून मटेरियल आणले. यंदा संपूर्ण डाळिंब व द्राक्षबागेत आच्छादन केले आहे. एकरी केवळ साडे १६ हजार रुपयांमध्ये हे काम झाले. या वस्त्राचा वापर पुढील हंगामातही करणे शक्य असल्याचे पवार म्हणाले. या आच्छादनामुळे सनबर्निंगची समस्या दूर होते. फळांना चांगले शायनिंग येते, थ्रिप्स नियंत्रणात येतो, दोन फवारण्यांमधील अंतर वाढते, फळाची गुणवत्ता सुधारते असे पवार यांनी सांगितले. 

झोपडीतून बंगल्यात 
एका ऊसतोड मजुराचा प्रवास प्रगतिशील शेतकरी होण्यापर्यंत झाला. सुमारे बारा वर्षे या कुटुंबाने आपले आयुष्य झोपडीत काढले. आज बंगला बांधण्यापर्यंत यशस्वी मजल मारली. पवार यांना शेतीत सदाभाऊ शेळके यांचे मोठे मार्गदर्शन तर द्राक्षशेतीतील भागीदार प्रमोद मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभते. नीलेश व ज्ञानेश्वर ही मुलेही शेतीत वडिलांचा वारसा चालवतात. महाराष्ट्रातून अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेटी देतात. 

सर्वोच्च भाव खाणारी फळे 
पवार यांनी पिकवलेल्या डाळिंब, द्राक्षांची विक्री स्थानिक भागातीलच निर्यातदार कंपनीला केली जाते. डाळिंबाचे दर सध्या पडलेले आहेत. तरीही यंदा पवार त्यांच्या डाळिंबाला एका व्यापाऱ्याकडून किलोला १०५ रुपये तर दुसऱ्या व्यापाऱ्याकडून ८५ रुपये दर मिळाला. अर्ली छाटणीच्या जंबो सीडलेस या कलर द्राक्षांना किलोला १५५ रुपये व ९५ रुपये असा दर मिळाला. द्राक्षाला दरवर्षी साधारण हेच दर मिळतात. यावरूनच त्यांच्या मालाची गुणवत्ता लक्षात यायला वेळ लागत नाही. परदेशात हा माल निर्यात होतो. 

पवार यांची शेती 
शेती- सुरवातीच्या चार एकरांवरून आज ७० एकर
डाळिंब- ४० एकर, द्राक्षे- २० एकर,  सीताफळ व पेरू- प्रत्येकी पाच एकर     कीडनाशकांचे पीएचआय पाहून अवशेषमुक्त शेती करतात.
उत्पादन- एकरी- डाळिंब- ८ ते १० टन, द्राक्षे- १० ते १२ टन
प्रत्येकी तीन कोटी लिटरची दोन शेततळी. विहिरी, ठिबक सिंचनाचा वापर. दोन अत्याधुनिक फवारणी यंत्रे.
वरंब्यावरील निंदणीसाठी तसेच तणनाशक फवारणीसाठी गरजेनुसार यंत्र तयार करून घेतले.
आठ गीर गायी. शेणस्लरीचा वापर. ती झाडांना देण्यासाठीही गरजेनुसार यंत्र तयार करून घेतले.
कायम शेतातच काम करण्याची, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सातत्याने सानिध्यात राहात नवे शिकण्याची वृत्ती.
राज्य डाळिंब बागायतदार संघाच्या वैज्ञानिक समितीचे पवार सदस्य आहेत. 
- रवींद्र धनसिंग पवार, ९८२३०३३६००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com