कापूस प्रक्रियादारांचा संपाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 डिसेंबर 2017

कापसावर जीएसटीअंतर्गत लागू केलेल्या रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम (आरसीएम)च्या विरोधात १५ डिसेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया(सीएआय)ने घेतला आहे. जीएसटी परिषदेच्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत कापसावरील `आरसीएम`च्या मुद्यावर तोडगा निघाला नाही तर २२ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही `सीएआय`ने दिला आहे.

कापसावर जीएसटीअंतर्गत लागू केलेल्या रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम (आरसीएम)च्या विरोधात १५ डिसेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया(सीएआय)ने घेतला आहे. जीएसटी परिषदेच्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत कापसावरील `आरसीएम`च्या मुद्यावर तोडगा निघाला नाही तर २२ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही `सीएआय`ने दिला आहे.

सीएआयने नुकतीच सर्व प्रमुख कापूस उत्पादक राज्यांतील संघटनांची बैठक बोलावली होती. जिनरही त्यावेळी उपस्थित होते. या बैठकीत कापसावर आरसीएम लागू केल्यामुले निर्माण झालेल्या अडचणी, निर्यातदारांची थकलेली देणी, देशभरातील कापूस क्षेत्रावर झालेला परिणाम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सीएआयचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. 

`कापूस सोडून इतर कोणत्याही शेतमालावर आरसीएम लागू नाही. हा कापसावर सरळ सरळ अन्याय आहे. जर कापसावरील `आरसीएम`चा फेरविचार झाला नाही, तर कापूस प्रक्रिया क्षेत्राला प्रचंड नुकसान सहन करावे लागेल. सरकारने तातडीने हा प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलावीत. आरसीएम हटवले तर कापूस उत्पादकांना चांगला दर मिळून सरकारला अप्रत्यक्ष फायदाच होणार आहे,`` असे महाराष्ट्र कॉटन जिनर्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. एस. राजपाल यांनी सांगितले. 

तेलंगणा कॉटन मिलर्स ॲण्ड ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रविंदर रेड्डी यांनी गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांना सोसावे लागत असलेल्या प्रचंड तोट्याकडे लक्ष वेधले. मध्यांचल कॉटन जिनर्स ॲण्ड ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनजितसिंह चावला यांनी `आरसीएम`च्या प्रश्नामुळे स्पिनर्स आणि जिनर्स यांच्यातील संबंध बिघडले असल्याचे सांगितले. 

जीएसटी परिषदेची बैठक २१ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यावेळी अनुकूल निर्णय झाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा `सीएआय`ने दिला आहे.

बोंडअळीमुळे कापूस निर्यात घटणार
गुलाबी बोंडअळीमुळे पिकाचे मोठे नुकसान होत असल्यामुळे यंदा देशातील कापूस निर्यात घटण्याची चिन्हे आहेत. आधीच्या अंदाजाप्रमाणे यंदा ७५ लाख गाठी कापूस निर्यात होईल, असे मानले जात होते. परंतु आता केवळ ६० लाख गाठी कापूस निर्यात होईल, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे. 

`कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे यंदा कापूस उत्पादनाचा आधीचा अंदाज बदलावा लागणार आहे. उत्पादन घटणार आहे. त्यामुळे यंदा ६० लाख गाठीच कापूस निर्यात होईल,`` असे खिमजी विश्राम ॲन्ड सन्स या आघाडीच्या कापूस निर्यातदार फर्मचे भागीदार नयन मिरानी यांनी सांगितले. 

वास्तविक यंदा देशात कापसाचे विक्रमी उत्पादन अपेक्षित होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाच्या लागवड क्षेत्रात १९ टक्के वाढ झाल्यामुळे यंदा ४०० लाख गाठी कापूस उत्पादन होईल, असा कापूस प्रक्रिया उद्योग क्षेत्राचा अंदाज होता. परंतु गुलाबी बोंडअळीमुळे हा अंदाज फोल ठरला. विशेषतः देशातील सर्वाधिक कापूस उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रात यंदा बोंडअळीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले. त्याचा निर्यातीवर विपरीत परिणाम होणार आहे.

देशात बोंडअळीमुळे कापूस पिकाला बसलेला फटका पाहता यंदा ३७५ लाख गाठी कापूस उत्पादन होईल, असा आमचा सुधारित अंदाज आहे, असे जयदीप कॉटन फायबर्स प्रा.लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग पटेल यांनी सांगितले. 

बोंडअळीला प्रतिकारक असलेले बीटी कापूस वाणही गुलाबी बोंडअळीला बळी पडल्याचे आढळून आले आहे. ``बीटी तंत्रज्ञानामुळे भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कापूस निर्यातदार देश बनला. परंतु आता बोंडअळीमध्ये प्रतिकार क्षमता विकसित झाली आहे,`` असे नागपूर येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च(सीआयसीआर)चे संचालक व्ही. एन. वाघमारे म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news cotton process strike warning