सेंद्रिय, बहुविध पीकपद्धतीने क्षारपड समस्येवर मात

Agriculture
Agriculture

सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी (ता. वाळवा) येथील सचिन तानाजी येवले या तरुण कृषी पदवीधराने केवळ एकाच पिकावर अवलंबून राहण्याऐवजी फळबागेसह भाजीपाला पिकांची बहुविध लागवड केली आहे. क्षारपड जमीन सेंद्रिय घटकांच्या पुनर्वापरातून सुपीक बनवली आहे. सेंद्रिय उत्पादने विक्रीसाठी कृषिदूत ब्रँड तयार केला असून, विविध मार्गाने विक्री वाढवत आहेत.

सांगली-इस्लामपूर महामार्गालगतच्या पडवळवाडी (ता. वाळवा) गावातील जमिनी मुळातच हलक्या. त्यात अतिरिक्त खत, पाण्याच्या वापरामुळे जमिनी पानथळ आणि क्षारपड झाल्या आहेत. वाळवा तालुक्याची ओळखच विक्रमी ऊस उत्पादनासाठी आहे. त्यामुळे क्षारपड जमिनी सुपीक करून विक्रमी उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. येथील सचिन येवले यांनी कृषी पदवीधर व कृषी व्यवसाय व्यवस्थापनाची (एबीएम) पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांची वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. सचिन यांनी सुरवातीला चार वर्षे पुणे येथे नोकरी केली. त्यानंतर २०१७ मध्ये गावी येऊन पूर्ण वेळ शेती करू लागले. स्वतःच्या शेतीमध्ये हळूहळू बदल सुरू केले.

चार वर्षांपासून संपूर्ण सेंद्रिय...
क्षारपड जमीन असल्याने उसाचे एकरी केवळ ३० टन उत्पादन मिळायचे. उसामध्ये पाला व पाचट माती आड करणे, सेंद्रिय खतांचा वापर करणे अशा उपाययोजनांमध्ये सातत्य ठेवले. त्यातून गेल्या वर्षी २० गुंठ्यात ३८ टन ऊस उत्पादन मिळाले.

ऊस पीक हे अठरा महिन्यांचे आहे. त्यात वर्षभर खर्च करावा लागतो. ऊस पिकातून कष्टाच्या मानाने अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिणामी उसाचे क्षेत्र कमी करत फळ बाग आणि भाजीपाला पिकाकडे वळले. 

सध्या त्यांच्याकडे ऊस, शेवगा, भेंडी, गवार, कारली, टॉमेटो, चवळी, वांगी, दोडका, मिरची, घेवडा, पावटा, पेरू अशी पिके आहेत. मधमाशीपालन (दोन पेट्या), गुळ पावडर, मशरूम, देशी बी-बियाणे उत्पादन असे प्रयोग येवले यांनी केले आहेत. 

परिसरातील शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीचे मोफत प्रशिक्षण व प्रात्यक्षिकेही ते करतात. दोन बॅरलमध्ये पाचट कुजवणाऱ्या जिवाणूंची वाढ करून स्वतः वापरण्यासोबतच अन्य शेतकऱ्यांना वाटपही करतात. जिवामृत, दशपर्णी अर्क, निमार्क अशा सेंद्रिय घटकांची निर्मिती येवले दांपत्य करते.

क्षारपड जमीन केली सुपीक
     शेणखताचा वापर
     पाचट आच्छादन करणे व कुजवणे
     जीवामृताचा वापर
     गांडूळ खत आणि व्हर्मिवॉश
     आंतर पिकांचे अवशेष माती आड करणे
     सलग चार वर्षांपासून या उपाययोजनांमध्ये सातत्य.

शेवगा 
सन २०१२-१३ मध्ये २० गुंठ्यात देशी शेवगा पिकाची ८ फूट बाय ५ फूट अंतरावर लागवड केली. उत्पादनही सुरू झाले. व्यापारी थेट बांधावर येऊन खरेदी करू लागले. मात्र, खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या वर्षी शेवगा बाग काढली. या आठवड्यामध्ये घरच्या शेवगा बियांची टोकण केली आहे. 

पेरू  
दोन वर्षांपूर्वी ३० गुंठे शेतात पेरूच्या लाल आणि पांढरा गर असलेल्या जातींची लागवड केली. ८ फूट बाय ५ फूट अंतराप्रमाणे ८६० झाडे बसली. त्यातून या वर्षी उत्पादन सुरू झाले असून, ३०० ते ५६० ग्रॅम वजनाची प्रतिझाड १५ ते २० फळे मिळत आहेत.

सचिन येवले म्हणाले, ‘‘नोकरीमध्ये मी स्वतः सेंद्रिय शेतीविषयक ऑडिटर म्हणून काम करत होतो, पण आमच्याकडे सेंद्रिय शेती नव्हती. एखाद्या शेतकऱ्याच्या प्रश्नाचे उत्तर अनुभवातूनच देता येईल, या उद्देशाने शेतात प्रयोग सुरू केले. आमच्या घरातही लोकांनाही हळूहळू समजावत सेंद्रिय शेतीकडे वळवले. गेल्या चार वर्षांपासून संपूर्ण सेंद्रिय शेती करतो. त्याचे फायदे दिसत आहेत. शेतात वडील तानाजी येवले, आई अलका येवले, भाऊ प्रवीण येवले, आजी शालन येवले, चुलते संजय येवले, पत्नी वर्षा येवले, चुलती वैजयंता येवले यांचा मोठा हातभार असतो. जरी चुलते व आम्ही राहायला विभक्त असलो तरी शेतात एकत्रच राबतो. यामुळे वेगळपणा कधीच वाटत नाही. शेतात काम करण्याची ऊर्जा मिळते.’’

सचिन यांच्या पत्नी सौ. वर्षा येवले यांनीही कृषी पदवी घेतली आहे. त्यामुळे त्यांचे शेतीतील प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष असते. सध्या दोन मधमाशी पेट्या असून, त्या वाढवण्याचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे घरातील सर्व सदस्यांच्या मदतीने बचत गटाकडून विकत आणलेल्या शेतीमालाची प्रतवारी व पॅकिंगचे काम सौ. वर्षा या पाहतात. एका कंपनीशी करार करत ओयस्टर अळिंबीच्या (मशरुम) दोन बॅचेस घेतल्या. पहिल्या बॅचमधून ड्राय २५ किलो अळिंबी कंपनीला दिली असून, सुमारे २० किलो ओली अळिंबीही स्थानिक मागणीनुसार विकली.

सन २०१७-१८ - माती परीक्षण
सामू - ८.३० (पूर्वी ९.५), क्षारता - ०.४०, सेंद्रिय कर्ब - १.५७, नत्र, स्फुरद, पालाश भरपूर आहेत. 

एकूण चार एकर शेती
    ऊस - ११० गुंठे 
     शेवगा - २० गुंठे. (शेवग्यामध्ये आंतरपीक -१० गुंठ्यामध्ये तीन प्रकारचा भुईमूग, १० गुंठे झेंडू व बाजूने खाण्याचा सोयाबीन लागवड)
     पेरू - ३० गुंठे (आंतरपीक-२५ प्रकारचा भाजीपाला) 
२६ शेतकरी गटांशी संपर्कात

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेअंतर्गत  (आत्मा) जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे २६ गट आहेत. प्रत्येक गटामध्ये विविध भाजीपाला, धान्याचे उत्पादन होते. मात्र, नेटक्या विक्रीव्यवस्थेचा अभाव होता. या २६ सेंद्रिय बचत गटांशी संपर्क करून त्यांच्या शेतीमालाच्या विक्रीसंदर्भात प्रस्ताव दिला. प्रतवारी व पॅकिंग केल्यानंतर  आपल्या दुकानातून विक्री सुरू केली. 

कृषीदूत या नावाने सेंद्रिय उत्पादनांची ब्रँड तयार केला आहे. त्यासाठीचे सर्व परवाने मिळवले आहेत.  
 

विक्रीसाठी यंत्रणा - संपूर्ण सेंद्रिय उत्पादने विक्रीसाठी स्वतःची यंत्रणा उभारली आहे. शेताच्या बाजूला भाजीपाला विक्रीचे दुकान थाटले असून, फिरते विक्री केंद्रही सुरू आहे. नुकतेच या दुकानाचे कृषी राज्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. इस्लामपूर, सांगली आणि आष्टा येथे प्रत्येकी एक दिवस गाडी पाठवली जाते. सांगली येथील एका दुकानामध्ये मागणीनुसार दर आठवड्याला भाजीपाला पोचवला जातो.  : सचिन येवले, ८५३०८१५२५९, ८८८८१५८५५३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com