esakal | दुष्काळी स्थितीत सीताफळाने दिला आत्मविश्वास
sakal

बोलून बातमी शोधा

दुष्काळी स्थितीत सीताफळाने दिला आत्मविश्वास

दुष्काळी स्थितीत सीताफळाने दिला आत्मविश्वास

sakal_logo
By
रमेश चिल्ले

पाण्याची कमतरता असलेल्या लातूर जिल्ह्यामध्ये सीताफळाच्या माध्यमातून पीक बदल करीत तळणी (ता. रेणापूर) येथील प्रगतिशील तुकाराम, नामदेव व दिलीप या येलाले बंधूंनी नवा पायंडा पाडला आहे. २०१२ मध्ये केलेल्या लागवडीपासून उत्पादन सुरू झाले आहे. आकाराने मोठी व अधिक गर, कमी बिया असलेली दर्जेदार फळे दिल्ली, पुणे, मुंबई बाजारपेठांसह कतार बाजारपेठेत पोचली आहेत. 

पाण्याच्या कमतरतेशी लातूर जिल्ह्याचे नाव कायम जोडले जाते. गेल्या तीन वर्षांमध्ये दुष्काळी स्थितीमध्ये पिण्यासाठीही रेल्वेने पाणी आणावे लागले होते, तिथे शेतीसाठी सिंचनाची स्थिती तर प्रचंडच अवघड. जिल्ह्यात एकही बारमाही नदी नाही. मांजरा, रेणा अन् तेरणाकाठची जमीन सोडली, तर बाकीकडे दहा-वीस मीटरवर काळा पाषाण. त्यामुळे पावसाचे पाणीही मुरत नाही. परिणामी बहुतेक विहिरी, बोअरना वर्षभर पाणी टिकत नसल्याची स्थिती. बहुतांश जमीनही हलकी. तळणी (ता. रेणापूर, जि. लातूर) येथील प्रगतिशील शेतकरी तुकाराम माधवराव येलाले यांची आपले बंधू नामदेव आणि दिलीप यांच्यासह एकत्रित ६५ एकर शेती आहे. त्यातील त्यांनी जानवळ (ता. चाकूर) येथे विकत घेतलेल्या २३ एकर क्षेत्रामध्ये तब्बल सहाशे ट्रॉली गाळाची माती टाकली. या क्षेत्रामध्ये सुरवातीला द्राक्ष लागवडीसह डाळिंब, भाजीपाला पिके घेतली. मात्र, पाण्याच्या अडचणीमुळे एकेकाळी निर्यातक्षम द्राक्ष घेणाऱ्या येलालेंना फुलोरा अवस्थेमध्ये अडचणी येऊ लागल्या. पीक बदल करण्याची आवश्यकता जाणून त्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या, कोरडवाहू स्थितीत उत्तम उत्पन्न देणाऱ्या पिकाचा शोध सुरू केला. त्यांना गोरमाळे (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील नवनाथ मल्हारी कसपटे या शेतकऱ्याने निवड पद्धतीने विकसित केलेल्या सीताफळ जातीविषयी समजले. गोल्डन नावाची ही जात सोनेरी रंग, आंबट- गोड मधुर चव, पुष्कळ गर, १० ते १५ बिया, दिसायला आकर्षक, मोठे डोळे यामुळे बाजारात प्रसिद्ध होती. त्यातच अधिक उत्पादन देणारी व उशिराने पक्व होणारी असल्याने शेतकऱ्यांसाठीही फायद्याची ठरते. याचा विचार करून जानवळ (ता. चाकूर) येथे विकत घेतलेल्या २३ एकर क्षेत्रातील पाच एकरमध्ये गोल्डन सीताफळ लागवडीचा निर्णय घेतला.  

२०१२ मध्ये एक वर्ष वयाच्या २८३० सीताफळ रोपांची लागवड केली. ही रोपे त्यांना प्रतिरोप ७० रुपयेप्रमाणे मिळाली. पूर्वी द्राक्ष बागेतील बेडप्रमाणे आठ फूट बाय दहा फूट अंतर ठेवले. 
 मशागतीमध्ये शेणखत व रासायनिक खतांचा बेसल डोस दिला. ठिबक सिंचन केले. 
 वेळोवेळी रोपांना आधार देत अनावश्‍यक फांद्यांची छाटणी करीत योग्य आकार दिला.
 दोन विहिरी, तीन बोअर पाडले. पाण्यासाठी कृषी विभागाकडून एक कोटी लिटरचे शेततळे घेतले. पाणी पुरत नसल्याने अडीच किलोमीटरवरून शेजारच्या तळ्यातून पाइपलाइन करून शेततळ्यात पाणी आणले. एकूण क्षेत्रामध्ये त्यांच्याकडे दोन कोटी ७० लाख लिटर क्षमतेची तीन शेततळी आहेत. 

सीताफळाचे व्यवस्थापन 
 शेतीतील सर्व कामांचे वाटप बंधूंमध्ये केले आहे. सीताफळ बागेचे दैनंदिन व्यवस्थापन पुतणे बाळकृष्ण नामदेव येलाले पाहतात; तर कीड- रोग आणि विक्री संदर्भातील सर्व निर्णय तुकाराम येलाले पाहतात. 
 स्थानिक जातीची फळे सप्टेंबर- ऑक्‍टोबरमध्ये संपल्यावर गोल्डन वाणाची फळे ऑक्‍टोबरच्या शेवटी ते नोव्हेंबरमध्ये तोडणीला येतात. सुरवातीला जूनमध्ये फूट येते. फुले जुलैमध्ये लागतात. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला फळे संपल्यानंतर एक- दोन पाणी देऊन काडी फुगवून घेतली जाते. 
 जानेवारी ते मे झाडे सुप्त अवस्थेत असताना ताणावर सोडली जातात. त्यात कुठलीच मशागत केली जात नाही. मे मध्ये सेंद्रिय खते, रासायनिक खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली जातात. 
 पाऊस पडल्यावर फुटवा येतो. नवीन पालवीवर फूलकिडे, तुडतुडे, तर नवीन फळांमध्ये फळसड रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी वेळोवेळी फवारणीचे नियोजन केले जाते. 
 लागवडीनंतर ४ ते ५ वर्षांनंतर फळे धरली. तोपर्यंत झाडांची चांगली वाढ करून घेतली. 

विक्री व्यवस्थापन 
 एका झाडाला पाचव्या वर्षी १५ ते २५ फळे ठेवली. मोठ्या फळांचे वजन ६५० ग्रॅम, तर लहान १५० ग्रॅम असते. या वर्षी पाच एकरांमधून १६ टन सीताफळ मिळाले. 
 मध्यम २५० ग्रॅम व त्यापुढील वजनाची फळे निर्यातीला चालतात. दिल्ली, मुंबईच्या मार्केटमध्ये ‘कृषी विकास एक्‍स्पोर्ट’ या नावाने पाठवली जातात. सध्या कतार येथे एका व्यापाऱ्यामार्फत निर्यात केली आहे. तसेच, युरोपीय बाजारपेठेतही नमुने पाठवले आहेत. 
 बाळानगरी सीताफळामध्ये ४० ते ५० बिया, तर गोल्डनमध्ये १० ते १५ बिया असतात. सदर फळे चालू वर्षी कतार, सौदी अरेबियाला ३०० ते ३५० रुपये पेटीप्रमाणे पाठवली. (एका पेटीत मोठी सहा, तर मध्यम नऊ फळे बसतात.) दिल्ली, मुंबई, पुणे बाजारपेठेत नऊ व बारा फळे बसणारी पेटी पाठवली. कारण सीताफळाला आतल्या पाकळीवर भाव मिळतो. तो देशांतर्गत प्रतिपेटी १५० ते २०० चा मिळाला. 
 दिल्ली मार्केटला पिकायला चार दिवस अगोदर डोळे उघडलेली फळे पाठवतात. दिल्ली येथे नांदेडमार्गे सचखंड एक्‍स्प्रेसने, तर मुंबई, पुणे बाजारपेठेत खासगी ट्रॅव्हल्सद्वारे माल पाठवतात. 

किमान उत्पादन खर्च 
सीताफळाची पाने कडू असल्याने गुरे, शेळ्या, मेंढ्या, हरीण ते खात नाहीत. रोग-किडींचे प्रमाण तुलनेने कमी आहे. पानावर शक्‍यतो कुठली कीड येत नाही. उत्पादन खर्च पहिल्या वर्षी एकरी पन्नास हजार रु. होतो, तर पुढील तीन वर्षे वीसेक हजार रुपये खर्च आला. पुढील ५ ते १५ वर्षे वयाच्या कालावधीत कमी- अधिक चाळीस हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. हलक्‍या जमिनीत हिवाळ्यात फळांच्या वाढीच्या अवस्थेत ठिबकने पाणी, सेंद्रिय खते, जैविक घटकांचा वापर केल्यास सीताफळाला देशांतर्गत व परदेशी बाजारपेठ मिळू शकते. खर्च वजा जाता एकरी किमान एक लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. 

लागवड वाढतेय...
सध्या उस्मानाबाद, सोलापूर, बीड, लातूर, औरंगाबादचा काही भाग व पुणे जिल्ह्यात सुमारे हजार एकरच्या आसपास नवीन लागवड आहे. लातूर जिल्ह्यामध्ये २० एकरमध्ये लागवड झाली आहे. या वाणाला दिल्लीच्या केंद्रीय संशोधन संस्थेने मान्यता दिल्याने व कृषी विभागाकडून रोजगार हमीमध्ये अनुदान मिळत असल्याने भविष्यात दुष्काळाशी चार हात करणारे, कमी पाणी व कमी मेहनतीचे पीक असल्याने लागवडीत वाढ अपेक्षित आहे. वाढत असलेल्या लागवडीमुळे दरात चढ-उतार होण्याची शक्यता लक्षात घेता सीताफळाचा गर काढण्याचे युनिट उभारण्याचा येलाले यांचा मनोदय आहे.  
- तुकाराम येलाले, ९७६७९१२९२१, ९४२२४६९१०६ (संपर्क वेळ - संध्याकाळी ६ ते ७)
(लेखक कृषी विभाग, लातूर येथे कार्यरत आहेत.)

loading image