खतांची कार्यक्षमता वाढवेल ठिबकचा वापर

विजय माळी
मंगळवार, 23 जानेवारी 2018

ऊस पिकामध्ये केवळ पाटपाण्याऐवजी ठिबक सिंचनाचा वापर केल्याने खतांची कार्यक्षमता ५० ते ७३ टक्क्यांपर्यंत वाढते. ऊस पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांचे प्रमाण विभागून दिल्यास उत्पादनवाढीसाठी अधिक फायदा होतो.

ऊस पिकामध्ये केवळ पाटपाण्याऐवजी ठिबक सिंचनाचा वापर केल्याने खतांची कार्यक्षमता ५० ते ७३ टक्क्यांपर्यंत वाढते. ऊस पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांचे प्रमाण विभागून दिल्यास उत्पादनवाढीसाठी अधिक फायदा होतो.

रासायनिक खतांचा वापर करण्यापूर्वी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. त्यानुसार जमिनीत असलेल्या अन्न घटकानुसार खतांची मात्रा कमी जास्त करावी. सध्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब, स्फुरद व पालाश या घटकांची उपलब्धता कमी झालेली दिसून येते. अशा जमिनीसाठी आडसाली ऊस पिकासाठी शिफारशीत एकरी मात्रा (१६०:६८:६८ किलो) ही २५ टक्क्यांनी वाढवून द्यावी. त्यानुसार एकरी ७० ते ८० मे.टन उत्पादन घेण्यासाठी एकरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १२० किलो पालाश वापरावा. ही मात्रा १०० टक्के पाण्यात विरघळणाऱ्या (विद्राव्य) खतांद्वारे द्यायचे ठरवल्यास खर्चात वाढ होते. अशा वेळी युरिया, अमोनियम सल्फेट व पांढरा पोटॅश ही खते पाण्यात १०० टक्के विद्राव्य असल्याने ठिबकद्वारे वापरता येतात. परंतू स्फुरदयुक्त खते महाग असल्याने शिफारशीच्या ५० टक्के मात्रा ऊस लागवडीवेळी आणि मोठ्या बांधणीच्या वेळी जमिनीतून दयावी. उरलेली ५० टक्के मात्रा ही ठिबकमधून द्यावी. या पद्धतीने खतावरील खर्चात बचत करता येते. 

डुक्लॉज (२००२) या शास्त्रज्ञाने केलेल्या अभ्यासानुसार ऊस पीक वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांची गरज वाढत जाते. (तक्ता १ पहा)

नत्र व स्फुरदाची गरज पहिल्या ६ ते ७ महिन्यांपर्यंत अधिक असते. त्यानंतर त्यांची गरज कमी होत जाते. 

पोटॅशची गरज सुरवातीला ६ महिन्यांपर्यंत कमी असते. ती सहा महिन्यांनंतर वाढत जाते.

सिंचनाच्या पद्धतीनुसार रासायनिक खतांची कार्यक्षमता  
तामिळनाडू कृषी विद्यापीठातील संशोधनानुसार, पाटपाणी पद्धतीच्या तुलनेमध्ये ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर केल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता दुपटीपेक्षा जास्त वाढते. 

पाटपाण्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश या खतांची कार्यक्षमता सरासरी ३० टक्क्यांपर्यंत आहे. 

नुसते ठिबक सिंचन बसवून खतांची मात्रा जमिनीमध्ये दिल्यास खतांची कार्यक्षमता ५० टक्के, तर ठिबक सिंचनमधून फर्टिगेशन केल्यास खतांची कार्यक्षमता ७३ टक्के पर्यंत मिळत असल्याचे आढळले आहे. (तक्ता २ पहा)
उदा. 

नत्रयुक्त खते - पाटपाण्यामध्ये वापरलेल्या १०० किलो युरियापैकी फक्त २५ ते ३० किलो, ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास ६५ किलो मिळतो. फर्टिगेशन केल्यास ९०-९५ किलो युरिया पिकास मिळतो. 

स्फुरदयुक्त खते - १०० किलो स्फुरदयुक्त खतापैकी पाटपाण्यामध्ये फक्त १५ ते २० किलो, तर ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास ३० किलो पिकांना उपलब्ध होतो. फर्टिगेशन केल्यास ४५ किलो पिकास मिळतो.

पोटॅशयुक्त खते - १०० किलो पोटॅशयुक्त खतांपैकी पाटपाण्यामध्ये फक्त ४० किलो, ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास ६० किलो तर फर्टिगेशन केल्यास ८० किलोपर्यंत पोटॅश पिकांस मिळतो.

ठिबक सिंचनामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता पाटपाण्यामध्ये मिळणारी ३० टक्के वरून ७० ते ७३ टक्के पर्यंत वाढते. पाटपाण्यामध्ये मिळणारी पाण्याची कार्यक्षमता सरासरी ३० ते ३५ टक्केवरून ९० टक्क्यांपर्यंत वाढते. परिणामी उसाच्या पानांची लांबी, रुंदी वाढते. थोडक्यात, त्यांची अन्न तयार करण्याची क्षमता वाढून तयार झालेले अन्न कांडीमध्ये साठविले गेल्याने उसाच्या कांडीची लांबी, जाडी वाढते. ऊस उत्पादनात ४० ते १०० टक्क्यांपर्यंत भरघोस वाढ मिळते.

सेंद्रिय कर्बाची उपलब्धता करण्यासाठी 
सध्या माती परीक्षणाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होऊन ते ०.४ ते ०.५ टक्क्यांपर्यंत आले आहे. ते १ ते १.२५ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी एकरी २० बैलगाड्या किंवा ५ ते ६ ट्रॅाली चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर करणे आवश्यक आहे. 

शेणखत उपलब्ध नसल्यास, एकरी ५ ते ६ मे. टन कारखान्यातील प्रेसमड केकपासून तयार केलेल्या कंपोस्ट खतांचा वापर करावा.

ऊस लागवडीपूर्वी हिरवळीचे पीक (उदा. ताग किंवा धैंचा) घेऊन ४५ ते ५० दिवसांनी सुमारे ५ टक्के पिवळी फुले आल्यानंतर जमिनीत गाडावीत. यापासून ४ ते ५ मे. टन (८ ते १० बैलगाड्या) सेंद्रिय खतांची बरोबरी करते. या हिरवळीच्या पिकासाठी पेरणीच्या वेळी एकरी २ गोण्या सिंगल सुपर फॅास्फेट व पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी १ गोणी युरिया वापरल्यास हिरवळीच्या पिकाची वाढ चांगली होऊन अधिक बायोमास मिळतो. जास्त प्रमाणात हिरवळीचे खत तयार होते. 

वरील नियोजनाप्रमाणे २० बैलगाड्या किंवा ५ ते ६ मे. टन कंपोस्ट खत वापरले असल्यास त्यातून पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता होते. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता फारशी जाणवत नाही. 

Web Title: agro news Due to the use of drip to increase the efficiency of the fertilizers