खासगी कंपनीप्रमाणे शेतीचे नियोजन

रमेश चिल्ले
मंगळवार, 2 जानेवारी 2018

एखाद्या खासगी कंपनीप्रमाणे वेळेचा काटेकोर वापर, शेतीच्या नोंदी, आर्थिक ताळेबंद या साऱ्या बाबी कटाक्षाने पाळत आपली शेती म्हणजे एक उद्योग आहे, अशा भावनेने काम करणारे लातूर जिल्ह्यातील कर्नाटक हद्दीवरच्या औराद शहाजानी (ता. निलंगा) येथील प्रगतिशील शेतकरी सुभाषराव आनंदराव मुळे यांचे अर्थ नियोजन.

एखाद्या खासगी कंपनीप्रमाणे वेळेचा काटेकोर वापर, शेतीच्या नोंदी, आर्थिक ताळेबंद या साऱ्या बाबी कटाक्षाने पाळत आपली शेती म्हणजे एक उद्योग आहे, अशा भावनेने काम करणारे लातूर जिल्ह्यातील कर्नाटक हद्दीवरच्या औराद शहाजानी (ता. निलंगा) येथील प्रगतिशील शेतकरी सुभाषराव आनंदराव मुळे यांचे अर्थ नियोजन.

सुभाषराव अन्‌ थोरले बंधू गोविंदराव यांचे शिक्षण रात्रशाळेत तेही जेमतेम दुसरीपर्यंत झालेले. मात्र, आकडेमोड अन्‌ पैशांच्या हिशेबात ते अगदी पक्के. त्या काळी वडील आनंदरावांकडे स्वतःची दहा एकर जिरायती शेती. ते दुसऱ्याकडे सालगडी होते. घरखर्च न भागल्याने मुलांनाही रोजंदारीवर कामे करावी लागत.यातूनच शेतीत जीवतोड मेहनत, नवनवीन पिकांचा बारकाव्यासह अभ्यास करण्याची गोडी, अन् वेड लागत गेले. 

वर्ष १९७७. बशीर पटेल नावाच्या मित्राकडून चार म्हशी अन्‌ दोन बैल उधारीवर घेतले. नदीवरून दोन किलोमीटर पाइपलाइन करण्यासाठी म्हशी विकाव्या लागल्या. त्यात ऊस घेतला. असेच दोन्ही भावांनी आपल्या बायकांसह दिवसरात्र राबत हळूहळू एकर दोन एकर शेती विकत घेत गेले. जमलेल्या भांडवलातून विहीर पाडली. पाहुण्यांकडे भाजीपाल्याची शेती पाहिल्यावर वांगी, मिरची, दोडके लावून डोक्‍यावर माळवे विकली. पुढे सूर्यफूल, ज्वारीबरोबरच द्राक्ष लावली. 

१९९३ ला झालेल्या भूकंपामुळे गावातील धाब्याचे घर पडल्यावर शेतात पत्र्याचे शेडमध्ये आठ वर्षे काढली. २००१ साली सध्याचे दोन मजली टोलेजंग घर बांधताना प्रत्येक कुटुंबाचा विचार करून सर्व सोयीसुविधा केल्या. 
दरम्यान गावात कृष्णा कस्पटे नावाचे बार्शीकडील शिक्षक बदलून आले. त्यांच्या शेतीतून बोध घेत टोमॅटो, पपई, केळी, द्राक्ष अशा पिकांचे नियोजन करत गेलो. शेतीतील पैशांतूनच एक-दोन एकर अशी शेती विकत घेत ७० एकरपर्यंत पोचली आहे. 

सुभाषरावांचे काटेकोर नियोजन 
‘दिवस शेतात उगवला पाहिजे अन्‌ शेतात मावळला पाहिजे,’ हा सुभाषरावांचा मंत्र. पुरुष सकाळी सहाला तर महिला दहा वाजता शेतीवर असतात. कुठेही वेळ वाया घालवायचा नाही, हे तत्त्व पाळले जाते. 

प्रत्येक दिवशी संध्याकाळी जेवण्यापूर्वी एकत्र बसून, दिवसभरातील कामाचा आढावा, अडचणी व पुढील दिवसाचे नियोजन काटेकोरपणे केले जाते. 

काटकसरीचा संसार, कुठलाही पोकळ बडेजाव नाही. 

कधी कोणी एक मिनिटही फुकटचा वाया घालवत नाही. पूर्वपरवानगीशिवाय कुणालाही शेतीत प्रवेश किंवा फोनवरही भेट दिली जात नाही. 

प्रत्येकाकडे आहे वेगळी जबाबदारी  
थोरला प्रताप २५ एकर शेतीचे नियोजन पाहतो. त्यात केळी, खरबूज, टरबूज, टोमॅटो व दोडका आलटून पालटून घेतात. चालू हंगामात प्रतापने खरबूज मल्चिंग व थ्रीप्सनेट वापरून केले आहे. तो माल फैजाबाद, मुंबई, हैदराबाद मार्केटला जातो.

सत्यवानकडे दुसऱ्या २५ एकर शेती असून, त्यातील १३ एकर सीताफळ लागवड आहे. त्यात पहिली तीन वर्षे अांतरपीक म्हणून कलिंगड, काकडी, टोमॅटो ही पिके घेतली. अन्य क्षेत्रात खरबूज, टोमॅटो, दोडका ही पिके आहेत. चालू वर्षी सीताफळापासून उत्पादन सुरू झाले. 

भीमा १५ एकर शेतीत टोमॅटो व वांगी घेतो. कर्नाटक सीमेवरील कराराने केलेल्या १० एकर शेतीमध्ये टोमॅटो, कोबी अशी पिके घेतली आहेत. 

स्वतः गोविंदरावांकडे २४ एकर अर्धकोरडवाहू शेती आहे. त्यात हरभरा, आले, सोयाबीन, मल्चिंगवर तूर, गहू, ज्वारी अशी घरासाठी धान्य देणारी पिके असतात. गुरांचे नियोजन पाहतात. 

तिन्ही सुनांपैकी दोघी शेतावरच्या प्रत्येकी तीस-चाळीस मजूर स्त्रियांचे हजेरी पगारासह नियोजन पाहतात. एक जण रोटेशननुसार घरी कामासाठी राहते. शेतातील सर्वजण गड्या, मजुरांसह तिथेच दुपारचे जेवण घेतात.  

शेतीमधील सुविधा 
प्रत्येकाच्या हिश्शामध्ये मध्यभागी ३० फूट बाय १० फूटचे एक पॅकहाउस बांधले असून, त्याच्या वरील मजल्यावर दोन खोल्या असून, त्यात संगणक, पुस्तकासह सर्व सोयी केल्या आहेत.  सर्व शेती नजरेच्या टप्प्यात राहील असे उंचावर बांधकाम केले आहे. खाली स्टोअर रूम केली आहे. शेतीतील घटक तिथे ठेवतात.

मालाने भरलेली वाहने सर्व शेतापर्यंत फिरतील असे रस्ते केले आहेत. 

एकूण मोठा एक व तीन लहान ट्रॅक्‍टर असून, सगळी कामे यंत्राने वेळच्या वेळी केली जातात.

सतत पाणी राहत असल्याने कोणतेही पीक घेता न येणारी नदीकाठची शेती स्वस्तामध्ये मिळाली. त्यातून दहा फूट खोलीवरून ड्रेनेज काढले असून, ते पाणी बोअरवेल व विहिरीमध्ये सोडून पुनर्भरण केले आहे. प्रत्येक चार एकर शेतामध्ये पाण्यासाठी एक आणि फवारणीसाठी एक  असे दोन सिमेंट हौद बांधले आहेत. 

वीस सालगडी, दोन ड्रायव्हर यांच्यासाठी छोटी घरे बांधली आहेत.  . सत्तर कायमस्वरूपी मजूर स्त्रिया असतात. सर्वांना घरच्या सदस्याप्रमाणे वागवले जाते. 

कंपनीप्रमाणे नियमित कामांनंतर प्रति तासाप्रमाणे ओव्हरटाइम दिला जातो. 

अधिक उत्पादकतेसाठी...
हवामान, पाऊस, वाऱ्यांचा वेग, तापमान, रोग किडीच्या सल्ल्यासाठी एका खासगी कंपनीकडून मोबाईलद्वारे सल्ला घेतला जातो. त्यासाठी वार्षिक फी भरली जाते. गरजेनुसार तज्ज्ञांशी फोनवरून संपर्क साधला जातो. पिकांबाबतची पुस्तके, माहिती, लेख जमा केले आहे.

देशभरातील बाजारभाव इंटरनेटवरून मिळवून त्याप्रमाणे विक्रीचे नियोजन करतात.

शेतीतील सर्व नोंदी संगणकावर ठेवल्या असून, त्याचे दरवर्षी विश्लेषण करतात.   

वर्षभर वेगवेगळी पिके घेताना  जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होऊ नये, यासाठी सुमारे चारशे ट्रॉली शेणखत, शेळी मेंढीची लेंडी, कोंबडीखत, प्रेसमड आदी मिश्रण देतात. भाजीपाल्यामध्ये सेंद्रिय फवारणीवर भर असतो. पिकांचे अवशेष रोटावेटरने जमिनीतच गाडले जातात. 
- pratapsmule@gmail.com (लेखक लातूर येथे कृषी अधिकारी आहेत.)

शेतीत पुढे जायचे असेल, तर जीव ओतून नियोजनबद्ध करावे लागते. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी झाली तरच उपयोगी ठरते. त्यासाठी वेळ वाया जाणार नाही, याकडे काटेकोर पाहतो. कुटुंबाची एकजूट आणि विश्वास यावरच पत्र्याच्या शेडपासून एक कोटी रुपयांचा बंगला झाला. दोघे भाऊ अन्‌ पंचवीस जणांचे एकत्र कुटुंब एका छताखाली, एकहाती निर्णयावर वाटचाल करते आहे.
- सुभाषराव मुळे

नोकरीइतकाच पगार मिळतो प्रत्येकाला...
शिकलेले मनुष्यबळ शेतीत थांबत नाही, ही कायमची तक्रार आहे. शेती म्हणजे कोणीही करू शकतो, ही भावनाच चुकीची. घरातील हुशार मुलांनी शेती पाहिल्यास केवळ शेतीचेच नाही, तर संपूर्ण कुटुंबाचे भले होऊ शकते, हे मुळे कुटुंबीयांच्या उदाहरणातून दिसून येते.  

प्रसंग पहिला 
वर्ष १९९२. सुभाषरावांची प्रताप व सत्यवान आणि गोविंदरावांचा भीम ही मुले तोपर्यंत हाताशी आलेली. प्रतापची पदवीनंतर दिलेल्या परीक्षेमध्ये पी.एस.आय. म्हणून निवड झाली. ट्रेनिंगला जाण्याची तयारी सुरू असताना सुभाषरावांनी त्याला विचारले, ‘‘तुला दुसऱ्याला सलाम करायला आवडेल की तुला दुसऱ्याने आदराने नमस्कार केलेला? ताठ मानाने शेती केलीस, तर काळी माय तुला कधीही कमी पडू देणार नाही. दुसऱ्याला सलाम ठोकत राहण्यापेक्षा स्वाभिमानाने राहशील.’’ 

नोकरी, त्यातही पोलिस इन्स्पेक्टरचा रुबाब, याची भुरळ पडलेल्या प्रतापची द्विधा अवस्था झाली. तेव्हा वडिलांनी सांगितले, ‘‘नोकरीएवढेच काम तू शेतीत कर, तेवढाच पगार तुला मी शेतीतून देतो. आम्ही शून्यातून इथपर्यंत आलो. आम्ही लहाणपणापासून दुसऱ्याची कामे करत वाढलो. नोकरीत नाही म्हटले तरी लाचारी येतेच.’’ हळूहळू प्रताप शेतीत रुळला. नवनवे प्रयोग करू लागला. 

प्रसंग दुसरा
सत्यवानचे डी.फार्मसी पूर्ण झाल्यानंतर मेडिकल सुरू करण्याचे नियोजन होते. ‘‘सकाळी आठ वाजता सुरू झालेले दुकान रात्री डॉक्टर जाईपर्यंत ९.३० पर्यंत चालणार. चार भिंतीत बारा ते पंधरा तास कोंडला जाशील, त्यापेक्षा निसर्गात शेतीत चल. मोकळ्या झाडाखाली राहशील,’’ असे विनवत त्याचेही मन वळवले. असाच गोविंदरावांचा भीमा मॅट्रिक झाल्यानंतर शेतीत उतरला. 

प्रतापची पत्नी शशीकला पदवीधर, तर सत्यवानची पत्नी मैना आणि भीमाची पत्नी सुरेखा याही मॅट्रिक झालेल्या. त्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या. त्याही शेतीत काम करायला मागे नव्हत्या. त्यांची साथ मिळत गेली. 

आलेल्या उत्पन्नातून पुढील हंगामासाठीचा लागवड खर्च बाजूला काढला जातो. उर्वरित रक्कम प्रत्येकाच्या बॅंक खात्यात जमा केली जाते. त्यात सुनांचा हिस्सा ठरलेला आहे. 

तातडीच्या कामांसाठी (उदा. शेती, औजारे विकत घेणे) यासाठी प्रत्येकजण आपला हिस्सा देतात. 

गेल्या २५-३० वर्षांत केवळ शेतीतूनच दहा एकरपासून शंभर एकरपर्यंत क्षेत्र नेले. नातवंडे हैदराबाद, चेन्नई येथे इंजिनिअरिंग व शाळेसाठी ठेवली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news Farming management private company