आर्द्रतापूर्ण वातावरणामध्ये द्राक्ष बागेतील व्यवस्थापन

पावसानंतर द्राक्ष वेलीची झालेली जास्तीची वाढ.
पावसानंतर द्राक्ष वेलीची झालेली जास्तीची वाढ.

सध्या सर्वत्र पाऊस झालेला असल्यामुळे आर्द्रता वाढलेली आहे. त्याचे द्राक्ष बागेतील विविध अवस्थेमध्ये वेगवेगळे परिणाम होतात. असे विपरीत परिणाम कमी करण्यासाठी  खालील उपाययोजना उपयुक्त ठरतील.  
 

राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी पाऊस पडला असून, पाऊस नसलेल्या ठिकाणीही ढगाळ वातावरण दिसून येत आहे. अशा वातावरणात आर्द्रता जास्त प्रमाणात (८०-१०० टक्के) दिसून येईल. सध्या द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्था असून, त्यावर वातावरणानुसार होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती घेऊ. 

काडीची परिपक्वता लांबणे -
या वातावरणात द्राक्षवेलींच्या फुटींची वाढ जोमात होते. शेंडा व त्या सोबत त्याच फुटींवर बगलफुटीसुद्धा जोमाने वाढतात. या फुटीमुळेच काडीची परिपक्वता लांबणीवर जाईल. यामुळेच काडीवर वाढलेल्या दाट कॅनॉपीमुळे सावली पडेल. सतत सावली पडलेल्या या काडीमध्ये अन्नद्रव्याचा साठा निर्माण होण्यात अडचणी येतात. अशा परिस्थितीमुळे काडीतील लिग्नीन निर्मिती क्षमता कमी होते. परिणामी काडी कच्ची राहते. 

उपाययोजना - शेंडापिचिंग करणे, बगलफुटी काढणे व काड्या तारेवर बांधून घेणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. 

कॅनॉपी  व्यवस्थापन -
पावसाळी वातावरणात तापमान ३०-३३ अंश सेल्सिअस व आर्द्रता ८०-१०० टक्क्यांपर्यंत राहिल्यास डाऊनी मिल्ड्यू रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. कॅनॉपीमध्ये गर्दी असलेल्या भागात या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येईल. पावसाळी वातावरणात सतत वाढत असलेल्या कोवळ्या फुटीवर करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगाची लक्षणे पानांवर तपकिरी रंगाच्या बारीक ठिपक्यांच्या रूपात दिसतात. ती कालांतराने वाढून पानांवर छिद्र तयार होते. पुढील काळात हाच रोग काडीमध्ये प्रवेश करतो. परिणामी, फळ छाटणीनंतर द्राक्ष घडावरसुद्धा डाग दिसून येतात. यावर नियंत्रण म्हणजे प्रामुख्याने कोवळी शेंड्याकडील फूट काढून टाकणे. याच सोबत बोर्डो मिश्रण (१ टक्का) या प्रमाणे फवारणी केल्यास या कोवळ्या फुटीवर असलेला करपा नियंत्रणात येईल. कोवळ्या फुटीवर जास्त तीव्रतेची बोर्डोची फवारणी करू नये, अन्यथा स्कॉर्चिंग येऊ शकते. स्कॉर्चिंगमुळे पुढील वाढणारी वाढसुद्धा थांबेल. कॅनॉपी दाट असलेल्या व पाने जुनी झालेल्या बागेत पावसाची उघडीप झाल्यास भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. कॅनॉपीमधील दमट वातावरण या रोगाच्या प्रादुर्भावास फायदेशीर ठरते. तेव्हा या रोगांवर खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. 

शेंडापिचिंग करणे - यामुळे वाढ नियंत्रणात राहील व काडीची परिपक्वता मिळेल. परिपक्व काडीवर रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. 

बगलफुटी काढणे - यामुळे कॅनॉपी मोकळी होईल. आर्द्रता कमी झाल्यामुळे हवा खेळती   राहून रोगाचे प्रमाण कमी होईल. फवारणीसाठी कव्हरेज चांगले मिळेल.

पालाशची फवारणी करणे - यामुळे काडीची परिपक्वता लवकर होण्यास मदत होईल. पालाशची फवारणी (प्रमाण ः ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) केल्यामुळे काडीची शेंडावाढ थांबून, काडीमध्ये लिग्नीनची मात्रा वाढेल.

बोर्डोची फवारणी करणे - यामुळे कमी खर्चात चांगल्या तऱ्हेने रोगनियंत्रण होईल.

खुंटावरील बागेत कलम करण्यापूर्वीच पानगळ झालेली आढळून येईल. खुंट रोपाची पाने जुनी झालेली असल्यास, पावसाळी वातावरणात तांबेरा हा रोग जास्त प्रमाणात आढळून येतो. या वेळी रोगाचे जिवाणू पानांमधून रस शोषून घेतात. कालांतराने पाने गळून पडतात. या बागेत कलम करण्यापूर्वी अशी स्थिती असल्यास, जास्त जुनी (परिपक्व) काडी कलम करण्यासाठी वापरू नये. अर्धवट कच्ची अशी काडी (३-४ काड्या) बांबूस बांधून घ्याव्यात. यानंतर शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.  जमिनीवर पडलेल्या काड्यावरील पानाच्या आतील बाजूस फवारणी पोहचत नाही. परिणामी, रोगनियंत्रणात अडचणी येते.  

- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२० - २६९५६०६० (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com