कोरडवाहू शेतीचा हरितक्रांती दूत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

`महिको`चे संस्थापक व भारतीय बियाणे उद्योगाचे अर्ध्वयू डॉ. बद्रिनारायण बारवाले यांचे २४ जुलै रोजी मुंबईत निधन झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा हा विशेष लेख. 

`महिको`चे संस्थापक व भारतीय बियाणे उद्योगाचे अर्ध्वयू डॉ. बद्रिनारायण बारवाले यांचे २४ जुलै रोजी मुंबईत निधन झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा हा विशेष लेख. 

तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक वापरातून कोरडवाहू शेतीत हरितक्रांती घडवून आणणारे उद्योजक ही डॉ. बद्रिनारायण बारवाले यांची सार्थ ओळख होती. शेतकऱ्यांचा सच्चा मित्र हे स्थान त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून मिळवले होते. लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धीची पहाट आणणाऱ्या डॉ. बारवाले यांनी अगदी शून्यातून सुरवात करून कर्तृत्वाचा डोंगर उभा केला. महाराष्ट्र हायब्रीड सीड्स कंपनी (महिको)ची स्थापना करून त्यांनी एक नवीन अध्याय रचला.

माझ्या व्यावसायिक कारकिर्दीचा प्रारंभ जालन्यात सुरू झालेल्या `महिको`सोबतच झाला. कंपनीच्या पहिल्या काही कर्मचाऱ्यांमध्ये माझा समावेश होता. महिको ही बियाणे पुरविणारी भारतातली पहिली एतद्देशीय कंपनी. माझ्या सुदैवाने तेव्हापासून मला डॉ. बारवाले यांच्या सहवासात राहता आले. शेतीवर अख्खे आयुष्य अवलंबून असणाऱ्या शेतकरी समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचा साक्षीदार म्हणून मला त्यांना जवळून अनुभवता आले.  

मराठवाड्यातील हिंगोली येथील एका शेतकरी कुटुंबात डॉ. बारवाले यांचा जन्म झाला. त्यांचे सामाजिक भान तीव्र होते. डॉ. बारवाले तरुणपणी हैदराबाद मुक्ती संग्रामात सक्रिय होते. अनंत भालेराव व इतर स्वातंत्र्यसैनिकांसोबत त्यांचे निकटचे संबंध होते. निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध त्यांनी संघर्ष केला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुमारे एक वर्षानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त झाला. त्यानंतर डॉ. बारवाले यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आयुष्यभर काम करण्याचे निश्चित केले. जोपर्यंत ठराविक पावसाच्या मध्य भारतातील ज्वारी, बाजरी, कापूस, हरभरा, मटार, मूग, उडीद इ. पिकांच्या उत्पादनात सुधारणा होऊ शकत नाही, तोपर्यंत बळिराजाची गरिबी दूर होणार नाही, याची त्यांना खोल जाणीव होती. तसेच उत्कृष्ट दर्जाचे बियाणेच उत्तम पीक मिळवून देऊ शकते, हे त्यांच्या कुशाग्र बुद्धीला जाणवले होते.

त्या दृष्टीने शेतकऱ्यांना उत्कृष्ट गुणवत्तेचे बी-बियाणे मिळवून देण्याची त्यांनी जणू भीष्म प्रतिज्ञाच केली. तत्कालीन प्रसिद्ध पीक पैदासकार (ब्रीडर) डॉ. ए. बी. जोशी यांनी पुसा इन्स्टिट्यूटमध्ये ''पुसा सावनी'' हे भेंडीचे वाण विकसित केले होते. डॉ. बारवाले यांनी या भेंडीच्या बीजोत्पादनाचा पहिला प्रयोग केला गेला. या भेंडीची जात विषाणूला प्रतिरोधक असल्यामुळे त्या वर्षी भेंडीचे बंपर पीक मिळाले. या रोगमुक्त पिकामुळे त्यांचा व शेतकऱ्यांचा आत्मविश्वास दुणावला आणि हीच नांदी ठरली `महिको`च्या स्थापनेची. जालना येथे १९६४ साली `महिको`ची सुरवात झाली. हेटिरोसिस किंवा हायब्रिड प्रजनन तंत्रज्ञानाचा पूर्ण उपयोग करून कंपनीने ज्वारी, बाजरी, कापूस, सूर्यफूल, चारा पिके, कडधान्य आणि तेलबिया पिकांच्या संकरित जातींच्या बियाण्यांचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्याची कामगिरी बजावली. संकरित बियाणे हे कोरडवाहू शेतीसाठी वरदानच ठरले. कारण त्यांची अानुवांशिक लवचिकता, माॅन्सूनची अनियमितता व लहरी हवामान यांना समर्थपणे तोंड देत भरमसाठ पीक उत्पादन देऊ लागली. 

`महिको`ने शेतकऱ्यांना भागीदारी पद्धतीने आपल्या व्यवसायात सामावून घेण्याचा स्तुत्य पायंडा पाडला. शेतकरी बियाण्यांचे उत्पादन घेताे व कंपनी त्या बियाण्यांवर प्रक्रिया करते. लाखो शेतकरी या बीज उत्पादनाच्या माध्यमातून कंपनीचे भागीदार बनले आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना अतिरिक्त कमाईची इतकी चांगली संधी मिळवून देणारी महिको ही पहिलीच कंपनी ठरावी. तसेच डॉ. बारवाले यांनी देशभर शेतकऱ्यांना स्वस्त पण उच्च पीक घेणारे वाण आणि शेतीशास्त्र यांचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले. भाजीपाला व इतर अनेक पिकांचे व्यावसायिक बियाणे शेतकऱ्यांना तयार करण्यास सांगण्यात आले. त्यासाठी आवश्यक कौशल्य विकास आणि प्रशिक्षण यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. या कार्यप्रणालीने शेती समुदायाचे संपूर्ण अर्थकारणच बदलून टाकले. कापूस बियाण्यांकरिता पिकाच्या परागीकरण व कापणीसाठी प्रचंड मनुष्यबळाचा वापर केला जाऊ लागला. त्या माध्यमातून अनेक पूरक व्यवसाय उभे राहिले व रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या. 

डॉ. बारवाले यांचा कृषी संशोधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत उमदेपणाचा होता. त्यांनी `महिको`मध्ये कृषक सेवेला समर्पित शास्त्रज्ञांची फळी निर्माण केली होती. जालना या लहानशा गावात डॉ. बारवाले यांनी बीज व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. जालना हे शहर बियाणे उत्पादनात अग्रेसर आहे. आज बियाण्यांच्या व्यवसायाचे ते राष्ट्रीय केंद्र बनले आहे. डॉ. बारवाले यांची दूरदृष्टी आणि अथक परिश्रम त्यामागे आहेत. बियाण्यांचे व्यावसायिक उत्पादन हे नवीनच क्षेत्र खासगी उद्योगक्षेत्राला मिळाले. `महिको`सोबत इतर अनेक कंपन्यांनी बियाणे व्यवसायात बरकत आणली. दर्जेदार बियाण्यांच्या पुरवठ्याच्या क्षेत्रात आज या खासगी कंपन्यांचा वाटा जवळपास ६० टक्के इतका आहे. 

जननशास्त्र किंवा वनस्पती प्रजनन यांची कुठलीही पार्श्वभूमी नसताना डॉ. बारवाले यांनी व्यावसायिक प्रयोगांसाठी या विषयांतले बारकावे आत्मसात केले. एवढेच नव्हे तर नवतंत्रज्ञानाच्या शोधदिंडीत त्यांनी जनुकीय सुधारित (जीएम) पिकाशी भारताची प्रथम ओळख करून दिली. डॉ. बारवाले यांनी २००२ साली देशात बीटी कापूस आणला. बोंडअळीमुळे त्रस्त झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान म्हणजे वरदान ठरले. बीटी कापसामुळे देशाच्या कापूस उत्पादनात विक्रमी वाढ झाली. या पांढऱ्या सोन्याला एक वेगळी झळाळी प्राप्त झाली.   

डॉ. बारवाले यांनी बियाणे उत्पादनाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल १९९८ साली अमेरिकेतील वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशनने त्यांना  ‘वर्ल्ड फूड प्राइज’ हा किताब देऊन गौरवले. भारत सरकारने त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल २००१ साली ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. उद्योग क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळालेल्या डॉ. बारवाले यांनी सामाजिक बांधिलकीचा वसा सोडला नाही. सामाजिक मूल्य जपणारे डॉ. बारवाले लोकोपकारी व गरिबांचे सुहृद होते. त्यांनी जालना येथे गोरगरिबांसाठी गणपती नेत्रालयाची स्थापना केली. तसेच चेन्नईतील शंकर नेत्रालया, औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल आणि विविध आरोग्य संस्थांच्या रक्तदान युनिट्सना सढळ हस्ते देणग्या दिल्या. डॉ. बारवाले यांनी जालना व त्यांच्या पैतृक गावी अनेक शैक्षणिक संस्था सुरू केल्या. शासकीय संघटना, विद्यापीठे, व्यावसायिक संस्था, आयसीएआर, सीएसआयआर, डीबीटी इ. द्वारा आयोजित तांत्रिक परिषदा, कार्यशाळा, सेमिनार्स यांचे ते उदार प्रायोजक होते. अगदी सरकारी प्रकल्पांनाही त्यांनी निरपेक्ष भावनेने मदत केली.  डॉ. बारवाले यांचे कार्य कायम स्मरणात राहील. त्यांना विनम्र अभिवादन. 

(लेखक कृषी शास्त्रज्ञ भर्ती मंडळाचे माजी अध्यक्ष आणि दक्षिण आशिया बायोटेक सेंटरचे विद्यमान अध्यक्ष आहेत.)

Web Title: agro news Green Revolution angel of dryland farm