जाधव बंधूंचा व्यावसायिक शेळीपालनातील आदर्श

कोळगाव येथे जाधव बंधूंनी रेणुका गोट फार्म सुरू केला आहे.
कोळगाव येथे जाधव बंधूंनी रेणुका गोट फार्म सुरू केला आहे.

श्रीगोंदा (जि. नगर) तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील तीन बंधूंनी व्यावसायिक शेळीपालनाचा आदर्श उभा केला आहे. सुमारे सात वर्षांपूर्वी तीस शेळ्यांपासून सुरवात करून आज पाचशे ते साडेपाचशे शेळ्यांचे संगोपन ते तंत्रशुद्ध पद्धतीने करताहेत. पैदाशीसाठी शेळ्यांची विक्री करतानाच मटण विक्री हा देखील उद्देश ठेवून व्यवसायाची उलाढाल २५ ते २६ लाख रुपयांपर्यंत नेली आहे.    

नगर जिल्ह्यात पिंपळगाव पिसा (ता. श्रीगोंदा) येथील कुकडी साखर कारखान्यापासून नजीक  अनिल बापूराव जाधव राहतात. राज्य राखीव पोलिस दलातून ते सेवानिवृत्त झाले आहेत.  त्यांना नीलेश, अमोल आणि शनी अशी तीन मुले असून तिघेही उच्चशिक्षित आहेत. त्यांची सात  एकर शेती आहे. परंतु नीलेश आणि अमोल पुण्यात दोघेही खासगी कंपनीत नोकरीला होते. त्यांचा स्वतःचाच व्यवसाय करण्याचा उद्देश होता. त्यादृष्टीने शेळीपालन व्यवसायाची आखणी त्यांनी केली. त्यातही तिघा भावांनी आपापली जबाबदारी निश्चित केली. नीलेश पुणे येथे आयटी कंपनीत सल्लागार असून, ते नोकरी सांभाळून आपल्या शेळीपालन व्यवसायातील विक्री, मार्केटिंग पाहतात. दर शुक्रवारी ते फार्मवर येतात. अमोल व शनी पूर्णवेळ फार्मची जबाबदारी सांभाळतात.

जाधव बंधूंचा शेळीपालन व्यवसाय 
सुरवातीचा टप्पा 

सुरवातीला ३० शेळ्या खरेदी केल्या. शेड बांधून बंदिस्त पद्धतीने पालन सुरू केले. परंतु अनुभव नसल्याने काही अडचणी आल्या. व्यवसाय बंद करावा अशा मानसिकतेत ते आले; पण पुन्हा मनोदय पक्का करून हळूहळू अनुभवातून अनेक गोष्टी शिकत गेले. 

भाडेतत्त्वावर जागा घेतली - शेळ्याच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गावाजवळ कोळगाव येथे विसापूर फाट्यावर रमेश गायकवाड यांच्याकडील असलेली सुमारे ११२ एकर जागा भाडेतत्त्वावर घेतली. पूर्वी त्यांच्याकडेही हाच व्यवसाय असल्याने शेड उपलब्ध होते. त्यामुळे बराचसा खर्च वाचला.

रेणुका गोट फार्म असे नामकरण असलेल्या या व्यवसायात सासत्य ठेवले. 

आजचा टप्पा 
सध्या एकूण क्षेत्रापैकी १० एकरांत सिंचनाची पूर्ण सोय. कुंपण. उर्वरित क्षेत्र माळरानाचे. 

सध्या पाचशे ते साडेपाचशे शेळ्या - जातीनिहाय सुमारे संख्या - सिरोही २००, सोजत ७०, बीटल १००, बारबेरी २०, उस्मानाबादी ६०, सानेन ५, मेंढ्या मुझफ्फरबादी ४० 

शेळ्यांच्या सविस्तर नोंदी ठेवल्या जातात. त्यासाठी प्रत्येक शेळीच्या कानाला टॅग लावले आहेत. त्यामुळे आजारी किंवा पैदास झालेल्या शेळ्यांची ओळख त्वरित पटविणे सोपे जाते. 

वर्षभर चारा उपलब्ध व्हावा या उद्देशाने चारा पिकांचे नियोजन. चाऱ्यामध्ये स्वयंपूर्ण होणे सर्वांत महत्त्वाचे असल्याचे नीलेश सांगतात. शेळ्यांना नियमितपणे मुरघास दिला जातो. याशिवाय डाळचुणी, गहू भूसा, सरकी पेंड आदींचाही वापर होतो. 

बंद नळाद्वारे शुद्ध पाणी शेळ्यांना दिले जाते, त्यामुळे त्या आजारी पडण्याचे प्रमाण कमी अाहे. 

चार बोअर, साठ लाख लिटर क्षमतेची टाकी, तसेच गरजेनुसार शेजाऱ्यांकडून लिफ्ट योजनेचे पाणी वापरले जाते.  

विक्री व्यवस्थापन व उत्पन्न 
बकरी ईद सणाच्या कालावधीत बोकडांना अधिक मागणी असते. त्यादृष्टीने बोकडांचे विशेष संगोपन करण्यात येते. सध्या सुमारे तीस बोकड उपलब्ध आहेत. पुणे शहरातील कौसूरबाग येथे स्टॉल थाटून विक्री केली जाते. येथे विक्रीसाठी वावही चांगला असतो. जातीनिहाय तसेच गुणवत्तानिहाय नर व मादी यांचे दर किलोला ३०० रुपयांपासून ते ४३० रुपयांपर्यंत राहतात. आफ्रिकन बोअर व सानेन मादीचे दर मात्र २५०० रुपये व नराचे दर १५०० रुपये असे राहतात.  

बोकड सांभाळण्यातून अतिरिक्त उत्पन्न 
पुणे, मुंबई येथील खासगी व्यक्तींकडील बोकडही जाधव बंधूंच्या फार्मवर सांभाळले जातात. बोकडाच्या वजनानुसार अडीच हजार ते पाच हजार रुपये प्रतिमहिना या दराने हे संगोपन केले जाते.  फार्मवर २०१३ पासून आत्तापर्यंत दरवर्षी जवळपास ३५ ते ४० बोकड सांभाळले जातात. त्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास मदत होते. 

मटण विक्री
नगर जिल्ह्यातील एका व्यावसायिकाला शेळ्या पुरवून प्रक्रियायुक्त मटण तयार करून घेतले जाते. भागीदारीत या मटणाची विक्री सध्या पुणे शहरात केली आहे. तसेच, दुबई येथे मटणाचे दोन कंटनेर पाठवले असल्याचे नीलेश यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांना प्रशिक्षण 
शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची सुविधा आहे, त्यासाठी स्वतंत्र हाॅल आहे. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित या प्रशिक्षणासाठी प्रतिदिवस पाचशे रुपये फी आकारली जाते. त्यामध्ये शेळीपालनासंबंधी सविस्तर माहिती, तसेच ‘फार्म फेरी’ घडवण्यात येते. आत्तापर्यंत सुमारे हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. 

लेंडी खताची विक्री 
दरवर्षी सुमारे ४५ ते ५० ट्रेलर लेंडी खत उपलब्ध होते. त्याची पाच हजार रुपये प्रतिट्रेलरप्रमाणे विक्री केली जाते. लेंडी खताची स्लरी बनवून ती देखील फळबाग उत्पादकांना प्रतिकिलो ८ रुपये दराने विकली जाते. या स्रोतातूनही वर्षाला सुमारे दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते. 

उलाढाल 
सुरवातीला उत्पन्नाचा अोघ कमी होता. मात्र हळूहळू त्यात वाढ होत गेली. अलीकडील काळाचा विचार केला तर दरवर्षी सुमारे पंधराशे ते दोन हजार शेळ्यांची विक्री केली जाते. यंदा सुमारे १९०० शेळ्यांची तर ईदसाठी चारशे बोकडांची विक्री झाली. या व्यवसायातून एकूण सुमारे २५ ते २६ लाख रुपयांपर्यंत उलाढाल करण्यात जाधव बंधूंना यश मिळाले. अर्थात मजूर, चारा, खुराक, लसीकरण आदींवरही भरपूर खर्च होतो. साधारण ६० टक्के खर्च, तर ३० ते ४० टक्के नफा शिल्लक राहतो. जाधव बंधूंनी या व्यवसायासाठी सुरवातीला कर्ज काढून सात लाख रुपये गुंतवले. व्यवसायाचा विस्तार केला तेव्हा एकूण ६० लाख रुपयांची गुंतवणूक झाली.  

- नीलेश जाधव, ९८२३९८०५४८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com