मातीची सुपीकता जपण्यासाठी...

मातीची सुपीकता जपण्यासाठी...

सद्यःस्थितीमध्ये मातीची सुपीकता जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातील भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माची जोपासना करण्याची आवश्यकता वाढत आहे. मृदा सुरक्षेत असलेल्या समस्या व त्यावरील उपाययोजना याविषयी माहिती घेऊ.

कृषि व्यवसायामध्ये जमीन (मृदा) नैसर्गिक साधनसंपत्ती असून, मुख्य भांडवल आहे. एक इंच मृदेचा थर जमिनीवर नैसर्गिकरीत्या तयार होण्यासाठी ३०० ते ५०० वर्षे लागतात. त्यामुळे मृदेचा हा जिवंत थर जपण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. जमिनीच्या आरोग्यावरच माणसांसह सर्व पशूंचे आरोग्य अवलंबून असते, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. 

मृदेमध्ये काय असते?
मृदेमध्ये ४५ टक्के रासायनिक पदार्थ, ५ टक्के सेंद्रिय पदार्थ, २५ टक्के पाणी व २५ टक्के हवा असते. हे घटक संतुलित प्रमाणात असताना कृषी उत्पादनात वाढ व सातत्य मिळते. गेल्या काही वर्षांत सातत्याने झालेल्या चुकांमुळे मूलभूत घटकांचे असंतुलन झाले आहे. त्याला मृदेची धूप आणि सेंद्रिय पदार्थांचे घटते प्रमाण कारणीभूत आहे. सेंद्रिय पदार्थांच्या कमी होणाऱ्या प्रमाणामुळे त्यावर अवलंबून सूक्ष्मजीवांचे (जिवाणू, बुरशी व इतर सूक्ष्म सजीव घटक) व गांडुळासारख्या कृमींचे प्रमाण कमी होते. हे सारे घटक जमिनीला जिवंत करतानाच पिकांच्या वाढीसाठी मदत करत असतात. जमिनीतील खनिज पदार्थांमुळे रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात. प्रदेशातील हवामान व भौगोलिक घटकांमुळे भौतिक रासायनिक गुणधर्म (उदा. जमिनीचा सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब आणि चुनखडीचे प्रमाण) ठरत असतात.    

जमिनीच्या आरोग्यविषयक मुख्य समस्या - 
    जमिनीचा अल्कधर्मी सामू
    सेंद्रिय कर्बाची कमतरता
    एक पीकपद्धतीचा अवलंब
    अन्नद्रव्याचा ­ऱ्हास आणि अन्नद्रव्यांचा असमतोल
    भारी काळ्या जमिनी मशागतीसाठी कठीण
    चुनखडीयुक्त जमिनीचे व्यवस्थापन
    क्षारयुक्त व चोपन जमिनींचे व्यवस्थापन
    जमिनीची धूप होणे

जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे 
    जमिनीचा सामू सहापेक्षा कमी किंवा आठपेक्षा जास्त असणे.
    जमिनीत सेंद्रिय कर्बाचे कमी प्रमाण असणे.
    जमिनीत चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असणे.
    जमिनीची जलधारण क्षमता कमी असणे.
    भरखताद्वारे दिलेल्या अन्नद्रव्यांचे जमिनीत स्थिरीकरण होणे.
    जमीन पाणथळ किंवा उथळ किंवा फार खोल असणे.
    सतत एकच पीक घेत राहणे. पिकांची फेरपालट न करणे.
    भरखते अजिबात न वापरणे, खा­ऱ्या पाण्याचा सतत वापर करणे.

जमिनीची सुपीकता वाढविण्याचे मार्ग:
    पूर्वमशागत व आंतरमशागत योग्य प्रकारे करणे. 
    पिकांची फेरपालट व फेरपालटीत द्विदल पिकांचा समावेश.
    भरखतांचा (शेणखत, कंपोस्टखत, गांडूळखत, लेंडीखत) वापर हेक्टरी किमान पाच टन करावा. 
    हिरवळीच्या खतांचा वापर करणे.
    कृषी व्यवसायातील उपपदार्थ (प्रेसमड, कोंबडीखत, पाचटाचे खत) खत म्हणून वापरणे. 
    जैविक / जिवाणू खतांचा वापर.
    रासायनिक खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल वापर करणे.
    क्षारवट, चोपण व विम्ल जमिनी सुधारण्यासाठी भूसुधारकांचा वापर करणे.
    शेतात जल व मृदसंधारण करणे.

जमिनीच्या आरोग्याची गुरुकिल्ली : 
    जमिनीचा सामू ः जमिनीचा सामू हा विविध अभिक्रियांचा निर्देशांक आहे. जमिनीचा सामू सातपेक्षा कमी असल्यास आम्लधर्मी, तर सातपेक्षा जास्त असल्यास विम्लधर्मी असते. सर्वसाधारणपणे ६.५ ते ७.५ यादरम्यान सामू असल्यास पिकांसाठी आवश्यक सर्वच अन्नद्रव्ये घेणे शक्य होते. 

    सिंचनाचा कार्यक्षम वापर : महाराष्ट्रातील जमिनीपैकी सुमारे ४२.५ टक्के जमिनीचा विविध कारणांमुळे ­ऱ्हास झाला आहे. त्यात पाण्यामुळे झालेल्या धुपेशी संबंधित क्षेत्र ३८ टक्के आहे. अतिरिक्त पाणी देण्यामुळे जमिनीची धूप होणे, जमीन पाणथळ होणे अशा समस्या दिसत आहेत. पाणी हे पिकाच्या गरजेनुसार, जमिनीच्या प्रकारानुसार द्यावे. पाणी क्षारयुक्त असल्यास सेंद्रिय खते व हिरवळीच्या खतांचा भरपूर वापर करावा. सोडियम क्षार जास्त असल्यास जिप्समचा वापर करावा. क्षारांना सहनशील पिकांची लागवड करावी. क्षार संवेदनशील पिके टाळावीत.  

    खतांचा संतुलित वापर :  हरितक्रांतीपूर्वी शेती स्वयंपूर्ण मानली जात असली, तरी एकूण उत्पादन व उत्पादकता कमी होती. हरितक्रांतीनंतर आलेल्या संकरित जाती, खतांचा व सिंचनाचा वापर यातून उत्पादनामध्ये वाढ झाली. मात्र, पुढे खतांचा अतोनात असंतुलित वापर झाल्याने मातीच्या सुपीकतेवर विपरीत परिणाम झाला. अवाजवी खत किंवा पाण्याच्या वापरातून मृदा संपत्तीचा ऱ्हास होत आहे. माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची  पिकनिहाय शिफारशीत मात्रा द्यावी. 

जमिनीच्या आरोग्यासाठी खतांचा शास्त्रीय पद्धतीने वापर :
    सेंद्रिय खते : जमिनीच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्ब गरजेचे असून, त्यासाठी सेंद्रिय खतांसोबत जिवाणू खतांचा वापर करावा. शेणखत पूर्ण कुजलेले वापरावे, अन्यथा जमिनीची ताकद शेणखत कुजविण्यामध्ये जाते. पिकासाठी त्वरित उपलब्ध होत नाही. 
    रासायनिक खते : रासायनिक खतांचा संतुलित वापर केला पाहिजे. प्रामुख्याने नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर होतो. यातील बहुतांश खत पाण्याबरोबर वाहून जाते, जमिनीत निचरा होते किंवा सूर्याच्या उष्णतेने वाफेत रूपांतर होते. एकूणच जमीन, पाणी आणि हवा यांच्या प्रदूषणात वाढ होते. जमिनीत ह्युमस तयार होत नाही.

विविध खतवापराची कार्यक्षमता
नत्रयुक्त खते    ३० ते ५० टक्के
जस्तयुक्त खते    २ ते ५ टक्के
स्फुरदयुक्त खते    १५ ते २५ टक्के
लोहयुक्त खते    १ ते २ टक्के
पालाशयुक्त खते    ५० ते ६० टक्के
बोरॉनयुक्त खते    १ ते ५ टक्के

रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्याच्या पद्धती :
    खते जमिनीवर फेकू नयेत. योग्य ओलावा असतानाच द्यावीत.
    पेरणी करताना खते बियाण्यांखाली पेरून द्यावीत.
    आवरणयुक्त खते/ ब्रिकेटस / सुपर ग्रॅन्यूलसचा वापर करावा. युरिया, निंबोळी पेंड सोबत १ : ५ प्रमाणात वापर करावा.
    खते पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत विभागून द्यावीत.
    सूक्ष्म सिंचनाद्वारे द्रवरूप खतांचा वापर करावा.
    तृणधान्य पिकांसाठी खतांचा ४:२:२:१ (नत्र : स्फुरद : पालाश : गंधक) या प्रमाणात तर कडधान्यांसाठी १:२:१:१ प्रमाणात खताचा वापर करावा.
    सेंद्रिय खतांचा नियमित वापराने जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान आणावा.
थोडक्यात, मृदा सुरक्षेकरिता मृदा संधारण, सेंद्रिय शेती, एकात्मिक रासायनिक व सेंद्रिय शेतीद्वारे जमिनीचे आरोग्य जोपासावे. ही काळाची गरज आहे.
- डॉ. हरिहर कौसडीकर, ९४२३१४२२१० (संचालक संशोधन, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com