नियोजन पेरू लागवडीचे...

मंजाबापू गावडे
शुक्रवार, 21 जुलै 2017

आपल्या भागातील पाऊसमानानुसार पेरूची लागवडीची वेळ ठरवावी. कमी पावसाच्या प्रदेशात पावसाळ्याच्या सुरवातीस शक्य तितक्या लवकर लागवड करावी, तर जास्त पावसाच्या प्रदेशात पावसाळा संपल्यावर लागवड करावी. 

पेरू लागवडीसाठी उन्हाळ्यात ६ x ६ मीटर अंतरावर खोदलेल्या ६० x ६० x ६० सेंटिमीटर आकारमानाच्या खड्ड्यात कलमांची लागवड करावी. त्याशिवाय लागवड करताना खालील बाबींवर लक्ष द्यावे. 

आपल्या भागातील पाऊसमानानुसार पेरूची लागवडीची वेळ ठरवावी. कमी पावसाच्या प्रदेशात पावसाळ्याच्या सुरवातीस शक्य तितक्या लवकर लागवड करावी, तर जास्त पावसाच्या प्रदेशात पावसाळा संपल्यावर लागवड करावी. 

पेरू लागवडीसाठी उन्हाळ्यात ६ x ६ मीटर अंतरावर खोदलेल्या ६० x ६० x ६० सेंटिमीटर आकारमानाच्या खड्ड्यात कलमांची लागवड करावी. त्याशिवाय लागवड करताना खालील बाबींवर लक्ष द्यावे. 

हवामान -
पेरू फळपिकाची साधारणपणे सर्वप्रकारच्या हवामानात वाढ हाेते. मात्र कोरडे व उष्ण हवामान तसेच हिवाळ्यात थंडीचे अधिक प्रमाण असलेल्या भागात दर्जेदार व भरपूर उत्पादन मिळते. 

वर्षभरात ३०० ते ५०० मि.लि. किंवा जून ते ऑक्टोबरपर्यंत १,००० मि.लि. पाऊस पडणाऱ्या भागात चांगले उत्पादन मिळते. 

अति दमट वातावरणामध्ये फळांची प्रतही निकृष्ट मिळते. तसेच त्यांच्यावर देवी रोगाचा प्रादुर्भाव होतो. 

सुधारित जाती -
सरदार : या जातीची झाडे फार उंच न वाढता आडवी वाढतात. पाने अंडाकृती आणि दोन्ही टोकांकडे निमुळती असतात. फळे आकाराने मोठी व गोल असतात. फळांचा गर सफेद असून, चवीस गोड असतो. फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असते. ही जात उत्पादनास चांगली आहे. 

अलाहाबाद सफेद - ही जात मध्यम उंच, घनदाट पालवी व अधिक फळधारणा देणारी आहे. झाडाचा आकार छत्रीसारखा बनतो. या जातीची फळे मध्यम आकाराची असतात. गर चमकदार, सफेद, गोड व सुवासिक असतो. फळातील बिया मऊ आणि कमी असतात.

ललीत - फळे मध्यम आकाराची व आकर्षक गुलाबी असतात. आंबटगोड अशा अनोख्या चवीमुळे खाणे किंवा प्रक्रिया अशा दोन्हीसाठी उपयोगी आहे.
श्वेता : फळे आकाराने मोठी, गोल व फिक्कट पांढऱ्या रंगाची असतात.

अभिवृद्धी -
पेरूची अभिवृद्धी बियांपासून तसेच शाकीय पद्धतीने करतात. 
बियांपासून तयार केलेल्या झाडांपासून उत्पादन उशिरा मिळते. फळांची प्रत आणि उत्पादन यांचीही खात्री नसते. त्यामुळे कलमी रोपांची लागवड करावी. 
कलम करण्यासाठी दाब कलम, भेट कलम आणि गुटी कलम या पद्धतींचा वापर करावा. 
कलम करण्यास लागणारा काळ, खर्च, मेहनत आणि यश यांचा विचार करता पेरूसाठी दाब कलम पद्धत योग्य ठरते.

कलमांची निवड : कृषी विद्यापीठ किंवा शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिकेतून कलमे घ्यावीत. कलमे जातिवंत, जोमदार वाढणारी आणि निरोगी असावीत. कलम झाडावरून काढल्याबरोबर शेतात लावू नये. काही दिवस ती रोपवाटिकेत जोपासल्यानंतर नंतरच शेतात लावावीत.

लागवड पद्धती -
खड्ड्याच्या तळाशी पालापाचोळा, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट घालावे. त्याच्यावर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत १० किलो व पोयट्याची माती १० किलो या प्रमाणातील मिश्रणाचा थर द्यावा. मिश्रणात फोरेट* (१० टक्के) १० ग्रॅम सुरवातीलाच मिसळावे. 

कमी पावसाच्या भागात पावसाळ्याच्या सुरवातीस शक्य तितक्या लवकर कलमे शेतात लावावीत. जास्त पावसाच्या भागात जोराचा पाऊस संपल्यानंतर कलमे शेतात लावावीत. 

कलम खड्ड्याच्या मधोमध लावून त्याला मातीचा भक्कम आधार द्यावा. लागवडीनंतर दुसऱ्या दिवशी कलमाच्या भोवतीची माती दाबून घ्यावी. अन्यथा कलमाची मुळे सैल होऊन कलम दगावते. 
कलमाला काठीचा आधार द्यावा.
जमिनीच्या मगदुरानुसार ८-१० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

आंतरपिके

पेरूच्या लागवडीनंतर सुरवातीच्या ४ वर्षांपर्यंत फारसे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे सुरवातीच्या चार वर्षांत द्विदल धान्यपिके अथवा भाजीपाल्याची पिके आंतरपिके म्हणून घ्यावीत. फार उंच वाढणारी आणि दाट अशी ज्वारी, मका, केळीसारखी पिके घेऊ नयेत. मात्र पपईचे पीक आंतरपीक म्हणून घेता येईल.

- मंजाबापू गावडे, ९४२२९२२०६०
(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

टीप - केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे सन २०२० पासून फोरेटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मानवी आरोग्य, पर्यावरण आणि जलस्रोतावर परिणाम होणार नाही, यादृष्टीने याचा वापर करावा. उत्पादनाच्या लेबलवरील शिफारशींचा काटेकोर वापर करावा.

Web Title: agro news management guava plantation