मिनी डाळमिलच्या माध्यमातून व्यवसायात आधुनिकता

डॉ. टी. एस. मोटे 
बुधवार, 11 एप्रिल 2018

कृषी विभागाच्या सहकार्यातून व अनुदानातून नांदेड जिल्ह्यातील गोकुंदा येथील राम मुंढे यांनी मिनी डाळमिल घेतली. पूर्वीच्या पारंपरिक गिरणीचा वापर थांबवून ते आधुनिक यांत्रिकीकरणाकडे वळले. आज पंचक्रोशीतील शेतकरी व व्यापाऱ्यांना डाळ तयार करून देणे, स्वतः डाळ व बेसन विक्री करणे या व्यवसायातून त्यांनी मूल्यवर्धित शेती सुरू केली आहे.  

कृषी विभागाच्या सहकार्यातून व अनुदानातून नांदेड जिल्ह्यातील गोकुंदा येथील राम मुंढे यांनी मिनी डाळमिल घेतली. पूर्वीच्या पारंपरिक गिरणीचा वापर थांबवून ते आधुनिक यांत्रिकीकरणाकडे वळले. आज पंचक्रोशीतील शेतकरी व व्यापाऱ्यांना डाळ तयार करून देणे, स्वतः डाळ व बेसन विक्री करणे या व्यवसायातून त्यांनी मूल्यवर्धित शेती सुरू केली आहे.  

अनेक शेतकरी आज प्रक्रिया, मूल्यवर्धनाकडे वळले आहे. ही गरज अोळखून कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मिनी डाळमिलसाठी अनुदान दिले जाते. कडधान्यांवर प्रक्रिया करून त्याची मूल्यवृद्धी करावी हा त्यामागील उद्देश आहे. ही संधी साधून त्याचा पुरेपूर फायदा नांदेड जिल्ह्यातील राम निवृत्ती मुंढे या शेतकऱ्याने घेतला आहे. आदिवासी बहुल असलेल्या किनवट तालुक्‍यातील गोकुंदा येथे त्यांचा हा व्यवसाय आहे. 
 
कृषी विभागाने दिले अनुदान  
मुंढे यांची पूर्वी पारंपरिक गिरणी होती. त्याआधारे ते मसाले, हळद पावडर तयार करून विक्री करीत.थोड्या प्रमाणात डाळनिर्मितीही करीत. मात्र नांदेड कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांचा व्यवसाय पाहिला. त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळवण्याच्या उद्देशाने व श्रम कमी व सुलभ करण्याच्या उद्देशाने मिनी डाळमिल घेण्याबाबत सल्ला दिला. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून त्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले. 

सुरू झाला व्यवसाय 
मुंढे यांनी डाळमिलचा अकोला शहरापर्यंत शोध घेतला. त्या भागातून खरेदी केली. एप्रिल २०१७ मध्ये यंत्राची स्थापना करून व्यवसायास सुरवात केली. सिंगल रोलरच्या दोन मशीन्स, पॉलिशर, सॉर्टिंग मशीन, दोन इलेक्‍ट्रिक मोटरर्स व अन्य असा साडेतीन लाख रुपये खर्च आला. कृषी विभागाचे त्यापैकी दीड लाख रुपयांचे अनुदान मिळाले. 

यंत्राची निवड 
डबल रोलरचे मशीन घेण्याऐवजी सिंगल रोलरच्या दोन मशिन्स घेण्यास प्राधान्य दिले. याचे कारण म्हणजे डबल रोलर मशीनमध्ये एकावेळेस एकच रोलर चालतो. त्यास चांगला वेगही मिळतो. सिंगल रोलरच्या दोन मशीन्स असतील तर एकाच वेळी दोन प्रकारच्या डाळी तयार करण्याचे काम करून वेळ वाचवता येईल हा हेतू होता. 

तूर द्या, डाळ घ्या
यात डाळ रण्याच्या प्रक्रियेला साधारणतः चार दिवस लागतात. परंतु इतका वेळ थांबायला काहींना वेळ नसतो. त्यामुळे एक क्विंटल तूर आणून दिली की त्यापासून ६५ किलो डाळ, ३०  किलो कळणा, ३ किलो चुरी संबंधिताला देतात. क्विंटलमागे ५०० रुपये दर आकारला जातो. काही व्यापारीदेखील कडधान्य देऊन डाळी तयार करून घेतात.

भरडा डाळ
काही व्यापाऱ्यांना मूग, उडदाची डाळ टरफल न काढलेल्या अवस्थेत लागते. या प्रकारच्या डाळी तयार करून देण्यासाठी क्विंटलमागे ३०० रुपये दर ठेवला आहे. चौदा इंची जाते असलेल्या चक्कीमधून मूग, उडीद भरडले जातात. त्यानंतर यंत्राद्वारे डाळ व कळणा घटक वेगवेगळे केले जातात. प्रति क्विंटल मूग,  उडीदापासून ८५ ते ९० किलो डाळ व १५ किलो कळणा मिळतो. 

डाळीची विक्री 
कडधान्यांची बाजारातून खरेदी व त्यापासून डाळी तयार करतात. त्यांची विक्री किराणा व्यावसायिकांना केली जाते. याचबरोबर आठवडी बाजारातील व्यापारीदेखील मोठे ग्राहक आहेत. तूर, मूग, उडीद, हरभऱ्याच्या डाळींची ५० किलो प्रमाणे प्रति आठवड्याला विक्री होते.  

व्यवसाय दृष्टिक्षेपात
डाळ प्रक्रिया 

तूर, मूग, उडीद व हरभऱ्यापासून डाळ करण्याची प्रक्रिया केली जाते.
 निवडलेले कडधान्य प्रथम पहिल्या रोलरमधून काढून त्यावरचे टरफल काढले जाते. पूर्ण टरफल काढण्यासाठी मालाला तेलपाणी करून रातभर मुरवत ठेऊन दुसऱ्या दिवशी त्याला उष्णता (सूर्यप्रकाश) दिली जाते. संध्याकाळी माल यंत्रातून काढला की डाळ तयार होते. 

असा मिळतो उतारा 
( प्रति क्विंटल कडधान्यापासून व सुमारे) 

 तूर- ६५ किलो डाळ, ३० किलो कळणा, 
    ३ किलो चुरी, २ किलो घट
 हरभरा- ७० किलो डाळ, 
    २७ किलो कळणा, ३ किलो चुरी
 मूग, उडीद- ७२ ते ७५ किलो डाळ, २३ ते २५ किलो कळणा, ३ किलो चुरी, 
    २ किलो घट
 पावसाळा वगळता तसा वर्षभर हा व्यवसाय चालतो. 
 श्री समर्थ डाळमिल असे लघू उद्योगाचे नाव

बेसन पिठाची विक्री
हरभऱ्याच्या डाळीपासून बेसन पीठ तयार करून त्याची हॉटेल व्यावसायिकांना ६५ ते ७० रुपये प्रति किलो दराने विक्री केली जाते. आठवड्याला साधारणतः ५० किलोपर्यंत त्याचा खप होतो. प्रति क्विंटल डाळीपासून सुमारे ९९ किलो बेसन पीठ तयार होते.

किरकोळ विक्री 
  घरगुती ग्राहकही मुंढे यांच्याकडून डाळी खरेदी करतात.

मूल्यवर्धन 
मुंढे म्हणाले की, लाल तुरीचा बाजारातील दर किलोला ४२ रुपये असेल तर प्रक्रियेनंतर म्हणजेच मूल्यवर्धनानंतर त्याचा दर ६० ते ६५ रुपये होतो. अर्थात यात खर्च भरपूर असल्याने मिळणारा फायदा मात्र तेवढा नसतो. 

आधुनिकता आणल्याने कष्ट झाले कमी  
पूर्वी घराच्या अंगणातच हळद, मसाले, डाळ तयार केली जायची. दोन चक्‍क्‍यांवर ते सर्व करताना प्रचंड मेहनत घ्यावी लागायची. डाळमिलच्या माध्यमातून मात्र या व्यवसायात मुंढे यांनी आधुनिकता आणली आहे. त्यातून व्यवसायवृद्धीदेखील झाली आहे. त्यांना पत्नी प्रेमकला यांची व्यवसायात मोठी मदत मिळते. त्याचबरोबर दोन महिला व एका सुशिक्षित बेरोजगार तरुणास या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगारही त्यांनी दिला आहे. 

उद्योगातील अडचणी 
मुंढे यांचे छोटेसे घर आहे. घरासमोरील जागेतच त्यांनी दाटीवाटीने वेगवेगळी यंत्रे उभारली आहेत. उद्योग विस्तारासाठी त्यांना ‘एमआयडीसी’ किनवट येथे जागा हवी आहे. त्यासाठी अर्जही केला आहे. अद्याप जागा मिळालेली नाही. मोठ्या डाळमिल उद्योगासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे २५ लाख रुपयांच्या निधीसाठी सहकार्य मागितले आहे.  
- राम मुंढे, ९८२२४१०३९८ (लेखक नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news mini dalmill business ram munde