जमिनीची सुपिकता वाढवण्याचे नियोजन करा

प्र. र. चिपळूणकर
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

कुरण जमिनीत जर चराईबंदी केली तर पुढील प्रतिवर्ष गवताचे उत्पादन वाढत जाते असा अनेकांचा अनुभव आहे. या उलट जर जनावरे चारली तर सतत येणारी नवीन पाने जनावरे खातात. नवीन पानांची पूर्ण वाढ न झाल्याने त्यामध्ये प्रकाश संश्‍लेषणातून अन्नद्रव्य निर्मिती न झाल्याने गवताची मुळे व खोडाची वाढ होऊ शकत नाही. मुळांची वाढ होऊ न शकल्याने माती धरून ठेवण्याचे काम व्यवस्थित होऊ शकत नाही. ओलीत चराई चालू असल्यास खुराने गवताचे गड्डे जमिनीपासून निखळून पडतात. पाऊस जास्त वेगाने पडल्यास मातीची धूप होते. मातीचा सकस थर वाहून गेल्याने कातळाचा थर उघडा होतो, पुढे गवताची खुरटी वाढ होते.

कुरण जमिनीत जर चराईबंदी केली तर पुढील प्रतिवर्ष गवताचे उत्पादन वाढत जाते असा अनेकांचा अनुभव आहे. या उलट जर जनावरे चारली तर सतत येणारी नवीन पाने जनावरे खातात. नवीन पानांची पूर्ण वाढ न झाल्याने त्यामध्ये प्रकाश संश्‍लेषणातून अन्नद्रव्य निर्मिती न झाल्याने गवताची मुळे व खोडाची वाढ होऊ शकत नाही. मुळांची वाढ होऊ न शकल्याने माती धरून ठेवण्याचे काम व्यवस्थित होऊ शकत नाही. ओलीत चराई चालू असल्यास खुराने गवताचे गड्डे जमिनीपासून निखळून पडतात. पाऊस जास्त वेगाने पडल्यास मातीची धूप होते. मातीचा सकस थर वाहून गेल्याने कातळाचा थर उघडा होतो, पुढे गवताची खुरटी वाढ होते. अशा बरड जमिनीत अत्यंत हलक्‍या दर्जाची कुसळी गवत वाढतात. ज्याला जनावरे तोंडही लावत नाहीत. एकदा जमिनीची अशी अवस्था झाली, की परत सुधारणे खूप अवघड होते.

जर चराईबंदी केली तर पानांना पूर्ण वाढ होण्यास वाव मिळतो. पानात अन्नद्रव्ये तयार होतात, त्यातून पुढे मुळे व खोडाची वाढ होते. पहिल्या वर्षी वाळलेला मुळांचा पसारा कुजून त्याचे खत होते. या खतामुळे पुढील वर्षीच्या गवताच्या वाढीत मागील वर्षापेक्षा सुधारणा होते. असे सलग ४ ते ५ वर्षे होऊ दिल्यास उंच व मोठ्या वाढणाऱ्या गवताच्या जाती आपोआप तयार होऊन वर्षानुवर्षे गवताचे उत्पादन वाढत जाते. पावसाळ्या अखेर हे गवत कापून जनावरांना दिले जाते. गवत कापून रानाबाहेर जाते. परंतु, त्याचा जमिनीखाली राहिलेला भाग जागेला तसाच राहतो. पुढे त्याचे सेंद्रिय खत तयार होते. पुढील वर्षाचे गवत दरवर्षी जास्त जास्त सेंद्रिय खत तयार झाल्याने वाढत जाते. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, की मागील वर्षातील वनस्पतीचे अवशेषाच्या सेंद्रिय खतामुळे पुढील वर्षीच्या गवताची वाढ मागील वर्षापेक्षा जास्त चांगली होते. हे ठराविक पातळीपर्यंत असे गवताचे उत्पादन वाढत जाते व त्यानंतर स्थिर होते. या अभ्यासातून अनेक गावांत जलमृद संधारणाच्या कामात चराई व कुऱ्हाड बंदी आली. तेथे वृक्षाच्छादन जसे वाढत गेले तसा हा फायदा आणखी वाढत गेला. 

जमिनीत वाढवा सेंद्रिय कर्ब 
गवताची जमीन आपण नांगरत नाही. गवताच्या मुळांचे जाळे तसेच जमिनीत रहाते, कुजते व त्यातून पुढील वर्षीच्या गवताची निर्मिती होते. शेत जमीन मात्र आपण पीक कापणीनंतर नांगरतो, मशागत करतो. मागील पिकाचे जमिनीवरील अवशेष वैरण मूल्य असल्यास कापून नेले जातात. पुढे नांगरणी, मशागतीतून जमिनीखालील अवशेष रिकामे होऊन वर येतात.

धसकटे म्हणून आपण ते गोळा करून जमिनीबाहेर फेकून देतो अगर जाळून टाकतो. कुळवाच्या पाळीत फासात अडकून आलेली मुळांची जाळी ही काडीकचरा म्हणून गोळा केली जाऊन जमीन एकदम स्वच्छ केली जाते. जसे गवताचे उत्पादन वाढत जाते हा नियम जर शेत जमिनीला लावला तर खिशातील पैसे वापरून मनुष्य बळाचा वापर करून नैसर्गिकरीत्या जो सेंद्रिय कर्ब जमिनीला मिळणार होता, तो आपण कचरा करून टाकला. आपल्या जमिनीला सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय कर्बाची गरज आहे. म्हणून घरी नसेल तर विकत आणून २० ते २५ गाड्या शेणखत, कंपोस्टचा वापर करण्याचे काम आजही सर्वत्र चालू आहे. शेणखत खरेदी (अगर तयार करणे) भरणी-उतरणी, वाहतूक, रानात विसकटणे, मातीत मिसळणे यावर परत खर्च. असा दुहेरी खर्च करूनही सर्वत्र उत्पादकता टिकवून ठेवणे आपल्याला शक्‍य झाले नाही.
- प्र.र.चिपळूणकर - ८२७५४५००८८, ( लेखक प्रयोगशील शेतकरी आहेत)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news Plan to increase the fertility of the soil