गादीवाफ्यावर करा उन्हाळी भुईमुगाची लागवड

रुंद वाफा आणि सरी पद्धतीने भुईमुगाच्या उत्पादनात चांगली वाढ होते.
रुंद वाफा आणि सरी पद्धतीने भुईमुगाच्या उत्पादनात चांगली वाढ होते.

उन्हाळी हंगामामध्ये सिंचनाची सोय असल्यास भुईमुगाचे उत्पादन खरिपाच्या तुलनेमध्ये चांगले येते. या पिकाला उन्हाळी हंगामातील भरपूर सूर्यप्रकाश व कोरडे हवामान मानवते. रोग, किडींचा प्रादुर्भाव नगण्य राहतो. मात्र शेंगा उत्तमरीतीने पोसण्यासाठी गादीवाफ्यावर भुईमुगाची लागवड करावी.

भुईमुगा हे पाण्यासाठी संवेदनशील पीक आहे. पाणी कमी किंवा अधिक झाल्यास त्याचा उत्पादनावर अनिष्ठ परिणाम होतो. हे टाळण्यासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीने (गादी वाफे) लागवड करावी. या पद्धतीमुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो. तसेच ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचाही अवलंब करता येतो.

जमीन
पेरणीसाठी मध्यम, परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थमिश्रित जमीन योग्य असते. या जमिनी भुसभुशीत असून, जमिनीत भरपूर हवा खेळती राहते. परिणामी मुळांची चांगली वाढ होते. आऱ्या सुलभपणे जमिनीत जाऊन शेंगा पोसण्यासाठी मदत होते.

पूर्वमशागत
चांगली मशागत करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. त्यासाठी १५ सें.मी. खोल नांगरट करून घ्यावी. कुळवाच्या २ ते ३ पाळ्या द्याव्यात. शेवटची कुळवाची पाळी देण्यापूर्वी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे.

पेरणीची वेळ 
उन्हाळी भुईमुगाची लागवड जानेवारीचा दुसरा पंधरवडा ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करावी. लागवडीस जसजसा उशीर होईल तसतशी उत्पादनात घट येते.  

बियाणे 
उपट्या वाणासाठी १०० किलो, तर मोठ्या दाण्याच्या वाणासाठी १२५ किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते. निमपसऱ्या व पसऱ्या वाणासाठी ८० ते ८५ किलो बियाणे वापरावे. 

बीजप्रक्रिया 
रोपावस्थेतील रोगांपासून संरक्षणासाठी ३ ग्रॅम थायरम प्रतिकिलो किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रतिकिलो या प्रमाणात चोळावे किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

त्यानंतर प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम व २५० ग्रॅम पीएसबी या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. बियाणे सावलीत वाळवून मग लागवडीसाठी वापरावे. 

आंतरमशागत 

पीक साधारणत: ६ आठवड्यांचे होईपर्यंत तणविरहित ठेवावे. यासाठी प्लॅस्टिक आच्छादन उपयुक्त ठरते.

आच्छादन शक्य नसल्यास तीन वेळा कोळपणी आणि आवश्यकतेनुसार २ ते ३ वेळा खुरपणी करावी. पीक साधारणत: ५० दिवसांचे झाल्यानंतर मातीची भर देण्याकरिता शेवटची कोळपणी करावी. नंतर मोठे तण उपटून घ्यावे. आऱ्या सुटल्यानंतर आंतरमशागतीचे कोणतेही काम करू नये.

खत व्यवस्थापन 
पूर्वमशागत करताना शेवटच्या कुळवणीअगोदर १० टन शेणखत प्रति हेक्टरी जमिनीत चांगले मिसळून द्यावे. पेरणीवेळी २५ किलो नत्र (युरिया खतातून), ५० किलो स्फुरद (एसएसपी खतातून) प्रति हेक्टरी द्यावे. 

भुईमुगास नत्र व स्फुरद या मुख्य अन्नद्रव्यांसोबतच गंधक व कॅल्शिअम ही दुय्यम अन्नद्रव्ये द्यावी लागतात. स्फुरद देताना तो सिंगल सुपर फॉस्फेट या खतातून द्यावा. तसेच १२५ किलो जिप्सम पेरणीच्या वेळी आणि १२५ किलो जिप्सम आऱ्या सुटण्याच्या वेळी द्यावा. यामुळे शेंगा लागण्याचे प्रमाण वाढून उत्पादनात वाढ होते.

लोह 
लोह कमतरता असलेल्या जमिनीत फेरस सल्फेट २० किलो प्रतिहेक्टरी वापरावे. तसेच लोहाची कमतरता पिकावर आढळल्यास फेरस सल्फेटची २.५ किलो प्रतिहेक्टरी फवारणी करावी.

जस्त
जस्त कमतरता असलेल्या जमिनीत झिंक सल्फेट २० किलो प्रतिहेक्टरी द्यावे. 

बोरॉन 
अधिक उत्पादनासाठी ५ किलो बोरॉन प्रतिहेक्टरी पेरणीवेळी द्यावे किंवा एक ग्रॅम प्रति लिटरप्रमाणे फवारणी करावी.   
पाणी व्यवस्थापन 

पेरणीपूर्वी पाण्याची पहिली पाळी द्यावी. वाफसा आल्यावर पेरणी करून लगेच पाण्याची दुसरी पाळी द्यावी.

उगवणीनंतर नांगे आढळून आल्यास ते भरून नंतर पाण्याची तिसरी पाळी द्यावी. नंतर पाण्याचा ताण द्यावा. म्हणजे साधारणत: २० ते २५ दिवस पिकास पाणी देऊ नये, त्यामुळे एकदम फुले येण्यास मदत होते. 

त्यानंतर पाण्याची चौथी पाळी देऊन ताण तोडावा. पुढे पाण्याची कमतरता पडू देऊ नये. साधारणत: फेब्रुवारी महिन्यात १०, मार्च महिन्यात ८, एप्रिल महिन्यात ६ ते ८ आणि मे महिन्यात ४ ते ६ दिवसांनी पिकास ओलीत करावे. तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे भुईमुगास मानवते. 

रुंद वाफा सरी तयार करताना... 
पूर्वमशागतीनंतर तयार झालेल्या शेतामध्ये १.२० मीटर अंतरावर छोट्या नांगराने ३० सें.मी. रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात. त्यामुळे ०.९० मीटर रुंदीचे रुंद वाफे (गादी वाफे) तयार होतात. वाफ्याची उंची १५ ते २० सें.मी. ठेवावी. शक्यतो गादीवाफ्यावर प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केल्यास तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. यामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करता येतो. एकूणच सिंचनाच्या पाण्यामध्ये बचत होते. 

रुंद वाफ्यावर दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन रोपांतील अंतर १० सें.मी. ठेवून टोकन पद्धतीने भुईमुगाची लागवड करावी. 
 

गादीवाफे पद्धतीचे फायदे
गादीवाफ्यावरील जमीन भुसभुशीत राहत असल्याने मुळांची कार्यक्षमता वाढते. पिकांची वाढ जोमदार होते. 

जमिनीत पाणी व हवा यांचे प्रमाण संतुलित ठेवता येते. 

ठिबक, तुषार किंवा पाटानेही सिंचन करणे सोईस्कर होते. पिकास पाण्याचा ताण बसत नाही, तसेच अतिरिक्त पाणी झाल्यास निचराही त्वरीत होतो. 

गादीवाफे तयार करताच सेंद्रिय खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा. पुढे शिफारशीप्रमाणे संतुलित खत व्यवस्थापन केल्यास पिकाची वाढ जोमदार होते. उत्पादनात वाढ होते.

- डॉ. श्रीकांत फाजगे, ९७३००३८८८१/९४०४५९४४७३
(सहायक प्राध्यापक, कृषिविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, नायगाव (बा.), नांदेड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com