पीक अवशेषांवर आधारित सेंद्रिय खतनिर्मितीचे प्रयोग

अनिल देशपांडे
मंगळवार, 27 जून 2017

पीक अवशेषांचा अधिकाधिक वापर व शेतीतील खर्च कमी करणारे तंत्रज्ञान ही दोन उद्दिष्टे ठेवून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विविध सेंद्रिय खतनिर्मितीचे प्रयोग केले आहेत. शेणखताचा वापर कमी करून गांडूळ खतनिर्मिती तसेच सीपीपी कल्चरचा वापर करून ढीग पद्धतीने कंपोस्ट खतनिर्मिती ही या प्रयोगांची वैशिष्ट्ये आहेत. शेतकऱ्यांसाठी देखील हे तंत्रज्ञान विद्यापीठाने उपलब्ध केले आहे.

पीक अवशेषांचा अधिकाधिक वापर व शेतीतील खर्च कमी करणारे तंत्रज्ञान ही दोन उद्दिष्टे ठेवून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विविध सेंद्रिय खतनिर्मितीचे प्रयोग केले आहेत. शेणखताचा वापर कमी करून गांडूळ खतनिर्मिती तसेच सीपीपी कल्चरचा वापर करून ढीग पद्धतीने कंपोस्ट खतनिर्मिती ही या प्रयोगांची वैशिष्ट्ये आहेत. शेतकऱ्यांसाठी देखील हे तंत्रज्ञान विद्यापीठाने उपलब्ध केले आहे.

पीक अवशेषांचे महत्त्व अलीकडील काळात अधिकच वाढले आहे. जमिनीची घटती सुपीकता व रासायनिक निविष्ठांच्या अति वापरामुळे होणारी एकूणच हानी लक्षात घेता सेंद्रिय घटकांचे महत्त्व वाढले आहे. काळाची गरज लक्षात घेऊन राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने देखील सेंद्रिय निविष्ठा निर्मितीच्या  प्रयोगांत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात  सेंद्रिय खतांचे कारखानेच सुरू झाले आहेत असे म्हटल्यास वावगे  ठरणार नाही. कुलगुरू डॉ.के. पी. विश्वनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्षेत्र संचालक डॉ.शरद गडाख व त्यांचे सहकारी या प्रकल्पात कार्यरत आहेत. 

असे आहेत सेंद्रिय खत प्रकल्प
विद्यापीठाने शेतातील पीक अवशेष, काडीकचरा अर्थात जैविक वस्तूमान (बायोमास) यांचा अधिकाधिक वापर करण्यावर भर दिला आहे. त्याचबरोबर शेतीतील खर्च कमी करण्याचाही प्रयत्न आहे. त्यादृष्टीने गांडूळ खतनिर्मिती, बायोडायनॅमिक व नाडेप हे प्रयोग विद्यापीठाच्या परिसरात पाहायला मिळतात. 

सेंद्रिय खतनिर्मितीचे फायदे 
जमिनीची नैसर्गिक व जैविक सुपीकता टिकून राहते.
शेतीमालाची प्रत उंचावते. त्याची टिकवणक्षमता वाढते.  
जमिनीची पाणीधारण क्षमता वाढून जमीन सच्छिद्र होते. 
पर्यावरणाचा समतोल राखला जातो.
प्रयोगातील तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध 
प्रकल्पाविषयी डॉ. गडाख म्हणाले, की विद्यापीठात प्रयोग करून त्याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करीत आहोत. आम्हाला पाणी देण्यासाठी मजुरीचा वेगळा खर्च करावा लागला नाही. खतनिर्मितीसाठी दंडाचे पाणी उपलब्ध होते.

उसाच्या पाचटाचे खत 
सुमारे ६१ हेक्टर क्षेत्रावरील उसाच्या पाचटाचे जागेवरच खत तयार केले. यात जागेवरच पाचटाची कुट्टी करून सीपीपी कल्चर व युरिया यांचा वापर केला. दीड महिन्यात खत कुजून गेले. हेक्टरी आठ टन कंपोस्ट खत तयार झाले.

विद्यापीठ परिसरात कार्यान्वित प्रकल्प 
विद्यापीठाच्या एकूण आठ हजार एकर क्षेत्रापैकी ठिकठिकाणी शक्य तेथे हे प्रकल्प सुरू आहेत. 
गांडूळ खत- ३५ प्रकल्प वा युनिट्स- वर्षात सहा बॅच- एकूण ४२० टन निर्मिती  
अन्य प्रकल्प- २४० टन गांडूळ खतनिर्मिती 
बायोडायनॅमिक खतनिर्मिती- २०० युनिट्स  

पीक अवशेषांवर आधारित गांडूळ खतनिर्मिती 
ही ढीग पद्धत आहे. यात शेडमध्ये जमिनीवर ८ ते १० फूट लांब, अडीच ते ३ फूट रुंद आणि दीड फूट उंचीचा बेड करून त्यात गांडुळे सोडली गेली. या आकारमानासाठी १५०० संख्येने किंवा एक किलो गांडूळ कल्चर लागते. शेडमध्ये दोन फूट रुंदीचा रस्ता सोडून त्याच्या दोन्हीही बाजूंस अडीच ते तीन फूट रुंदीचे बेड टाकले. खालीलप्रमाणे थर केले. 

पहिला थर - (जमिनीवर)- सावकाश कुजणाऱ्या काडीकचऱ्याचा दहा ते पंधरा सेंमी. जाडीचा थर. यात प्रामुख्याने उसाचे पाचट, गव्हाचे काड, सोयाबीन, तूर, हरभरा यांचा भुसा टाकून झाल्यावर त्यावर भरपूर पाणी मारून ते ओलावून घेतले. 

दुसरा थर - १५-२० सेंमी. जाडीचा. शेणखत, अर्धवट कुजलेला काडीकचरा, गोबर स्लरी यांचा वापर. शेणखत आणि अर्धवट कुजलेला कचरा ६५ः३५ या प्रमाणात वापरला. विद्यापीठ प्रक्षेत्रावर असे पीक अवशेष गोळा केले जातात. त्यातील अर्धवट कुजलेला कचरा वापरला. 

तिसरा थर - चांगले कुजलेले शेणखत किंवा गोबर स्लरीचा. पाच ते दहा सेंमी. जाडीचा. त्यानंतर अोल्या गोणपाटाने बेड झाकून घेतला.
पाणी व्यवस्थापन हवामानानुसार दोन ते तीन दिवसांतून गरजेनुसार पाणी दिले. जेणेकरून बेडमधील ओलावा ५० ते ६० टक्के राहील. 

खत उत्पादन ठळक बाबी 
सुमारे ६० दिवसांची खतनिर्मितीची बॅच. 
एकावेळी दोन बेडमध्ये निर्मिती झाली. त्यांच्या उभारणीचा खर्च केवळ पाच हजार रुपये झाला.
प्रति बेडमध्ये एक टन व वर्षातील सहा महिने सहा टन खत उपलब्ध होते. दोन बेडसाठी हेच खत १२ टन मिळते. 
खताव्यतिरिक्त व्हर्मिवॉश उपलब्ध होते. विद्यापीठ त्याची २० रुपये प्रति लिटर दराने विक्री करते. मात्र शेतकरी ५० ते ६० रुपये दराने त्याची विक्री करू शकतात असे प्रक्षेत्र संचालक डॉ. गडाख सांगतात.  
गांडूळखत देखील ६ ते ८ रुपये प्रति किलो दराने विकता येते. 
सध्या कार्यान्वित प्रकल्प 
४० टन क्षमतेचा प्रति बॅच- प्रकल्प- उत्पादन सुरू झाले आहे. 
प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग झाल्यावर त्याचे इतरांना प्रशिक्षण दिले जाईल.  

या गांडूळ खताची वैशिष्ट्ये 
गांडूळ खत म्हटले की शेण वापरावे लागते असे म्हटले जाते. मात्र या प्रकल्पात शेणखताचा वापर अत्यंत कमी करता येतो. केवळ सुरवातीला त्याचा वापर करता येतो. 
पीक अवशेषांचा अधिकाधिक विनियोग, झाडांची पानेही वापरता येतात. 
एक तृतीयांश शेण, एक तृतीयांश पीक अवशेष व एक तृतीयांश अर्धे कुजलेले खत (फार्म कंपोस्ट) असा वापर करता येतो.   
 खर्च अत्यंत कमी येतो.

बायोडायनॅमिक कंपोस्टिंग प्रयोग 
साहित्य- शेतातील काडीकचरा, पऱ्ह्याट्या, वाळलेली बोंडे, शेतातील तण, कडुनिंब, निरगुडी, एरंड, बेशरम, गिरिपुष्प आदींची पाने, सीपीपी कल्चर, ताजे शेण (८ ते १० दिवसांचे) आणि पाणी 
या तंत्रज्ञानात जागेवरच झाडाखाली किंवा बांधावर ढीग तयार करून हे खत तयार करता येते. 
यात पालापाचोळा, पीक अवशेष यांचा थर उभारता येतो. पाच बाय १२ फूट बाय दीड फूट उंचीचा अोटा उभारता येतो. 
यात दोन प्रकारची द्रावणे तयार केली जातात.
पहिले द्रावण- १०० लिटर पाणी- १० किलो सुपर फॉस्फेट व ८ किलो युरिया
दुसरे द्रावण- सीपीपी कल्चर व पाणी 
दोन्ही द्रावणांचे प्रत्येकी तीन भाग करायचे.
पहिल्या थरात प्रत्येक द्रावणाचा एक भाग वापरायचा. ते पाण्याने भिजवायचे. १० ते १५ घमेली माती त्यावर शिंपायची. 
आता दुसरा थर टाकायचा. त्यासाठीही पुन्हा द्रावणाची तशीच कृती करायची. 
तिसरा थर सहा उंच मातीचा द्यायचा. वाफा तयार करायचा. तो अोलावून घ्यायचा. त्यावर एकेक फुटावर ३० सेंटिमीटरच्या लाइन करायच्या. दहा ते १५ सेंटिमीटरवर चवळीच्या बिया टोकायच्या. पाणी द्यायचे.
दीड ते दोन महिन्यांनी चवळी काढून टाकायची. त्याचे अवशेष पुन्हा थरात मिसळायचे. पुन्हा अोटा तयार करून चवळी लावायची. चवळी हवेतील नत्र घेऊन तो कंपोस्ट घटकाला उपलब्ध करून देते. 
 ठळक बाब- वरील आकारमानाच्या युनिटमध्ये तीन महिन्यांनी एक टन कंपोस्ट खत तयार होते.  
विद्यापीठाने असे ४०० टन खत तयार केले आहे.

Web Title: agro news Use of organic fertilizers based on crop residues