पाऊस पडला तरच घरी जाता येणार हाय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट बघतोय. जनावरांना चारा, पाणी नसल्याने सारा संसारच छावणीत आणलाय. प्यायलाच पाणी नाय तर शेतासाठी कुठून मिळणार. त्यामुळे सगळे शेत पडून हायती. पाऊस झाल्याशिवाय काय गत्यंतर नाय. त्यामुळं पाऊस पडला तरच घरी जाता येणार हाय, अशी व्यथा सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

सातारा जिल्ह्यातील पूर्व भागातील माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा हे दुष्काळग्रस्त तालुके आहेत. सध्या या तालुक्यांपैकी दुष्काळाच्या सर्वाधिक झळा माण तालुका सोसत आहे. या तालुक्यातील शेकडो गावे अजूनही तहानलेली आहेत. यामुळे येथील जनतेला टँकरच्या पाण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. दुष्काळामुळे शेतीचा आलेख ढासळत असल्याने घरखर्च भागवता यावा, हातात पैसा यावा यासाठी आजही मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जात आहे. मात्र, पाणी चाऱ्याची तीव्र टंचाई भासत असल्याने चाळीस हजारांवर जनावरांचा मुक्काम चारा छावणीत आहे. या जनावरांच्या देखभालीसाठी अनेकांना छावणीतच आपला संसार सुरू करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक तीन ते चार वर्षांनंतर दुष्काळाचे चक्र सुरू राहत असल्याने येथील जनता होरपळून निघाली आहे. जलसंधारणाची कामे झाली तरी त्यात पाणी साठण्यासाठी पावसाची आवश्यकता असल्याने पाऊस झाल्याशिवाय काहीच शक्य नसल्याचे शेतकरी सांगत आहे. काही भागांत गेले वर्षभर पाऊस झाला नसल्याने शेतात मोठ्या प्रमाणात ढेकळं निघाले आहे. यामुळे शेत लवकर हाताखाली येणार नाही.  

डाळिंबाचे क्षेत्र घटणार
माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत डाळिंबाचे क्षेत्र वाढले होते. मात्र, दुष्काळाच्या चक्राचा फटका डाळिंबास बसला आहे. या दुष्काळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी बागा सोडून दिल्या आहेत. पाणी नसल्याने बागा पूर्णपणे वाळून गेल्याने अनेक शेतात झाडांचे सांगडे उभे दिसत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कसरत करण्यापेक्षा बागा काढून टाकल्या आहेत. यामुळे डाळिंबाचे क्षेत्र घटणार आहे.

मंदीत संधी
इतर वस्तूच्या वाढत असलेल्या किमतीबरोबर जनावरांसाठी लागणाऱ्या पेंडीच्याही किमतीत वाढ झाली आहे. दुष्काळ येणे हे शेतकऱ्यांसाठी गंभीर संकट असते. मात्र काही जण याकडे संधी म्हणून पहातात. दुष्काळामुळे छावण्या सुरू झाल्या की निष्कृष्ट दर्जाची पेंडी बाजारात येते. हीच पेंड स्वस्त असल्याने काही छावणीत ती देण्याचा प्रकार सुरू झाला. शासनाकडून मिळणारे अनुदान पुरते नसल्याने छावणीचालकांकडून नाइलजास्तव त्याचा वापर केला जातो. तसेच शेतकऱ्यांनाही पर्याय नसल्याने ही पेंड जनावरांना द्यावी लागत आहे. या प्रकारावर शासनाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.  

कडक उन्हापासून हवे संरक्षण
दुष्काळी भागासह जिल्ह्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यात ४० ते ४१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. पाणीटंचाईची तीव्रता वाढत असल्याने दररोज छावण्यांत जनावरांची संख्या वाढत आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने आणि अनेक छावण्यांत व्यवस्थित सावली नसल्याने जनावरांची छावणीतही होरपळत असल्याचे चित्र पाहावायास मिळत आहे. सावलीसाठी साड्या लावून लावलीजाव सुरू असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. यामुळे जनावरे आजारी पडत असून, अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत.  

जिल्ह्यातील टँकर व छावणी
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागाबरोबरच पश्चिमेकडेही दुष्काळ जाणवू लागला आहे. सध्या जिल्ह्यात टँकरने अडीचशेचा टप्पा ओलंडला आहे. सर्वच म्हणजे अकरा तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये माण तालुक्यात सर्वाधिक ११० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या जिल्ह्यातील २२३ गावे ९०३ वाड्या वस्त्यांवरील तीन लाख ६७ हजार नागरिक टँकरच्या पाण्यावर विसंबून आहे. कमी पर्जन्यमान असलेल्या माण तालुक्याबरोबरच सर्वाधिक पाऊस होत असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील काही गावांत टॅंकर सुरू ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. याबरोबरच सरकाने जनावरे हाल टाळण्यासाठी उशिरा का होईना छावण्या सुरू केल्या आहेत. सध्या माण तालुक्यात ४० चारा छावण्या सुरू असून, यामध्ये ३३ हजार जनावरे आहेत. जनावरांसाठी अनेकांना छावणीतच मुक्काम करावा लागत आहे. जिल्ह्यात प्रतिदिन नवीन छावण्या सुरू होत असून, जनावरांच्या संख्येतही वाढ होत आहे.  

चाऱ्यासाठी ऊस; दूध उत्पादनात घट
दुष्काळाची दाहकता वाढली असताना त्यानुसार चाऱ्याचे नियोजन झालेले नाही. यामुळे बहुतांशी चारा छावण्यांत चारा म्हणून सर्रास उसाचा वापर केला जातो. यामुळे जनावरांना आवश्यक पौष्टिक चारा मिळत नाही. एकाच प्रकारामुळे चारा खाल्ल्याने दूध उत्पादनावर परिणाम झाला असून, उत्पादनात घट दिसू लागली आहे.

गावात पाणी नसल्यामुळे टँकर येत आहे. या टँकरमधील पाणी गावाच्या विहिरीत सोडले जात आहे. त्यानंतर आम्हाला पाणी प्यायला मिळत आहे. जनावरे जगवण्यासाठी त्यांना छावणीत घेऊन आलोय. पाणी नसल्यानं मागचे दोन्ही हंगाम वाया गेलेत. आता पण शेत नांगरून पडलीत पाऊस पडला तर हंगाम नाही तर जनारांसाठी छावणीतच थांबावं लागेल.- गजानन गायकवाड, मोगराळे, ता. माण

सततच्या दुष्काळामुळे शेतात काय कामच उरलेले नाय. बैल जो़डी सांभाळणं तर अवघड होऊन बसलय. चारा नसल्यामुळे ही बैलजोडी विकून टाकलीय. दुभती जनावरे जगवणं मुश्किल झालं होत. छावणी सुरू झाल्याने ही जनावरे छावणीत घेऊन आलोय. आता किमान जनावरे जगवता तरी येतील.- श्यामराव जगदाळे, मोगराळे, ता. माण

घरच्या विभाजानातून माझ्या वाटणीला गाय आली होती. रोजचे वीस लिटर दूध देत होती. चारा, पाणीटंचाई जाणवल्याने गायीला छावणीत आणले. पण दुर्दैव आडवे आल्याने गाय दगावली. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती वाईट आहे. शासनाने आम्हाला मदत करावी.- चंद्रकांत ओंबासे, वडगाव, ता. माण.

रान नांगरून पडल्यात. पाणी नाय त्यामुळे काय करता येत नाही. जनावरांसाठी छावणीत राहवे लागत आहे. सरकारने चारा वाढवल्याने जनावरांची भूक भागत आहेत.
- चंद्रकांत छगन ओंबासे, वडगाव, ता. माण.

छावणी सुरू झाल्याने जनावरे छावणीत घेऊन आलोय. पहिल्याच दिवशी ३०० वर जनावरे छावणीत आलेत. दोन ते तीन दिवसांत हा आकडा पंधराशेवर जाईल. वाईट अवस्था असल्याने छावणीशिवाय पर्याय नाही.- गणेश महाडिक, दहीवडी, ता. माण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro special satara district drought