एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ

डॉ. टी. एस. मोटे
शुक्रवार, 30 मार्च 2018

नांदेड जिल्ह्यात उमरी व गोरठा परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून रेशीम शेतीची वाट धरली आहे. येथील सुभाष देशमुख यांनी तालुक्यातील पहिले रेशीम शेड सुमारे दीड वर्षापूर्वी उभारले. हायटेक शेतकरी गटाची स्थापना केली. आता गटातील ११ जण रेशीम उत्पादक झाले अाहेत. शेतीची शाश्वत वाट याच व्यवसायात शोधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यापासून अगदी जवळ असलेले गोरठा हे गाव सुधारित तंत्रज्ञानाच्या वाटेवरून चालले आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे इथल्या शेतकऱ्यांत तयार झालेली प्रयोगशील वृत्ती. उमरी- गोरठा परिसरात कापूस, सोयाबीन ही मुख्य पिके आहेत; मात्र शाश्वत शेतीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना अन्य पर्याय महत्त्वाचे वाटत होते. गोरठा येथील सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेतला. आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी, उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी हायटेक शेतकरी गटाची उभारणी केली. हळद, भाजीपाला उत्पादनात उतरलेला गट कृषी विभागाच्या मदतीने शेडनेट शेतीकडे वळला. शेडनेटमध्ये काकडी, ढोबळी मिरची, लांब मिरचीचे चांगले उत्पादन गटातील सदस्य घेत आहेत. 

रेशीम शेतीत पदार्पण  
शेडनेट शेतीला पूरक उद्योगाची जोड देताना गटाने रेशीम शेतीला सुरवात केली आहे. यातही देशमुख यांचाच पुढाकार राहिला. दीड वर्षापूर्वी तालुक्यातील पहिले रेशीम शेड आपण उभारल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी सुरवातीला काही लाख रुपये भांडवल गुंतवून कोष उत्पादन सुरू केले. टप्प्याटप्प्याने त्यांचे अनुकरण इतरांनी करण्यास सुरवात केली आहे.

देशमुख यांची रेशीम शेती  
एकूण शेती ३५ एकर, त्यातील रेशीम शेती- ४ एकर 
अन्य पिकांत ऊस १० एकर 
रोपे विकत आणून तुतीची लागवड जोड ओळ पद्धतीने. दोन ओळींमध्ये ठिबकची नळी 
रेशीम शेड- ६० बाय ३३ फूट, उंची १४ फूट. शेड बांधकामासाठी साडेतीन लाख रुपये खर्च आला.
शेडची क्षमता- ५०० अंडीपुंजाची.
सध्याचे उत्पादन- २५० ते ३५० अंडीपुंजांपासून
रेशीम शेती सुरू झाल्यापासून आतापर्यंत घेतलेल्या बॅचेस- ९ 
पहिल्या दोन बॅचेसपासून विशेष उत्पादन मिळाले नाही. 
प्रति १०० अंडीपुंज कोष उत्पादन- ८० ते ८५ किलो 
नांदेड तालुक्‍यातील दोन शेतकऱ्यांकडून चॉकी खरेदी करतात. 

मार्केट  
अन्य भागातील रेशीम उत्पादकांप्रमाणे देशमुख व त्यांचे सहकारी रामनगर (कर्नाटक) येथे जाऊन रेशीम कोष विक्री करतात. यापूर्वी हैदराबाद जवळील एका बाजारपेठेतही त्यांनी विक्रीचा अनुभव घेतला. नुकत्याच घेतलेल्या बॅचमधील कोषांची विक्री ५०० रुपये प्रतिकिलोप्रमाणे केली. बंगळूर येथील व्यापारी जागेवर येऊन खरेदी करून गेल्याचे देशमुख म्हणाले. आतापर्यंत सरासरी दर ४५० रुपये राहिल्याचेही ते म्हणाले. 

हायटेक शेतकरी गट- अन्य वैशिष्ट्ये  सदस्यांना प्रशिक्षण बंधनकारक  
कोष उत्पादन ‘फेल’ जाऊ नये, म्हणून रेशीम शेतीचे प्रशिक्षण गटातील सर्व सदस्यांना बंधनकारक केले आहे. जिल्हा रेशीम विभागाने गटाला मोलाची साथ व प्रशिक्षण दिले आहे. महिन्याच्या पहिल्या रविवारी एका सदस्याच्या संगोपनगृहावर गटाची बैठक होते. त्यात रेशीम कोष उत्पादनातील अडीअडचणींची सोडवणूक केली  जाते.

मोफत बेणे  
या गटाचे वैशिष्ट्ये म्हणजे नवीन तुती लागवड करणाऱ्यांना सदस्यांमार्फत बेणे मोफत दिले जाते. अट फक्त एकच असते, की त्या शेतकऱ्यांनी अन्य तीन जणांना बेणे मोफत द्यावे. तुती लागवड वाढावी हा त्यामागील उद्देश आहे. उमरी तालुक्‍यातच नव्हे, तर धर्माबाद तालुक्‍यातील शेतकऱ्यांनाही त्यांनी बेणे मोफत दिले आहे.  

हायटेक गटाची वैशिष्ट्ये 
शेडनेटच्या माध्यमातून संरक्षित शेती 
शासनाची कुठलीही मदत न घेता स्वखर्चाने रेशीम शेती 
गटातील सदस्यांकडे एकूण ११ शेडनेट हाउसेस. सहा शेतकऱ्यांकडे काकडी, तर पाच शेतकऱ्यांकडे ढोबळी मिरचीचे उत्पादन 
गटातील १७ सदस्यांपैकी ११ रेशीम उत्पादक
एकूण क्षेत्र ५५ ते ६० एकरांपर्यंत 
दर महिन्याला गटाची बैठक होते. कोणतेही कारण न देता त्यास गैरहजर राहणाऱ्यास गटातून निलंबित केले जाते. 
हायटेक शेतकरी गट हा सर्वसाधारण पीकगट, तर रेशीम शेतीसाठी हायटेक शेतकरी गट युनिट क्र. २ असे नामकरण.   

क्‍लस्टरमध्ये समाविष्ट करण्याची मागणी 
उमरी तालुक्‍यातील शेतकऱ्यांची रेशीम क्‍लस्टरमध्ये समाविष्ट करण्याची मागणी आहे. शासनाने नांदेड जिल्ह्यातील सहा तालुकेच या क्‍लस्टरमध्ये निवडले आहेत. उमरी तालुक्‍याचा त्यात समावेश नाही. त्यामुळे तुती लागवड, संगोपनगृह बांधकामासाठी अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. 

रेशीम उत्पादकांच्या  प्रतिक्रिया 
मौजे कुदळा येथे आमची शेती आहे. देशमुख यांची प्रेरणा घेऊन जून २०१७ मध्ये तीन एकर तुतीची लागवड केली. पक्के कीटक संगोपनगृह नसल्यामुळे पहिल्या व दुसऱ्या वर्षांत प्रत्येकी दोन पिके समाधानकारक निघाली नाहीत. यामुळे पक्के संगोपनगृह बांधण्याचा निर्णय घेतला. आता ७२ फूट लांबीचे, २४ फूट रुंदीचे आणि १६ फूट उंचीचे संगोपनगृह उभारले आहे. सुमारे अडीचशे अंडीपुंजाच्या बॅचपासून २३० किलो कोष उत्पादन मिळाले आहे. 
- ज्ञानेश्‍वर जाधव, ८९७५०६८७१७ 

गटाचा सदस्य झाल्यानंतर शेडनेटमध्ये भाजीपाला उत्पादन घेऊ लागलो. उर्वरित शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने रेशीम शेतीकडे मागील वर्षी वळलो. विशेष म्हणजे माझ्याकडे संगोपनगृह नव्हते. मित्राच्या संगोपनगृहामध्येच रेशीम कीटकाचे संगोपन केले. माझ्या मित्राचे तुती पीक निघाले, की मोकळ्या काळात मी माझे पीक घ्यायचो. आमची एकूण शेती सहा ६ एकर आहे. त्यात तुतीचे ३० गुंठे क्षेत्र होते. यंदा त्यात २० गुंठे वाढवले. आता एक एकर १० गुंठे क्षेत्र रेशीम शेतीला दिले  आहे. पाचवी बॅच सुरू आहे. प्रति बॅच १०० अंडीपुंजांची घेतो. यापूर्वी कोषांचे ६९, ७२, ६८, ७१ किलो असे उत्पादन मिळाले आहे. शेड ६० बाय २२ फुटांचे आहे. 

शेडनेटचाही  होतोय फायदा 
सिमला मिरची २० गुंठ्यांत आहे. यापूर्वी त्यात जून ते आॅगस्ट, २०१७ या काळात काकडीचे ९ ते १० टन उत्पादन घेतले. त्याला १८ ते २२ किलो दर मिळाला आहे. 
- मारोती पांचाळ,  ७५८८४३०२४१ 

रेशीम शेती हा शाश्वत पर्याय वाटतो. एक बॅच फेल गेली तरी दुसऱ्या बॅचमधून नुकसान भरून काढणे शक्य होते. तसेच दीर्घ मुदतीच्या पिकांमधून पैसे लवकर हाती येत नाहीत. रेशीम शेतीत हमीभाव मिळतो व ताजा पैसाही मिळतो आहे. 
- सदस्य,  ‘हायटेक’ गट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro-special story sericulture nanded farmer subhash deshmukh