जमिनीची सुपीकता वाढवून केळीची उत्तम शेती

जमिनीची सुपीकता वाढवून केळीची उत्तम शेती

नांदेड जिल्ह्यात अर्धापुरी तालुका केळी पिकासाठी प्रसिद्ध आहे. मुदखेड तालुक्यातील बारड येथील शिवाजीराव रामराव देशमुख यांचेदेखील केळी हे पारंपरिक पीक आहे. शिवाजीराव यांचादेखील अनेक वर्षांच्या अनुभवातून या पिकात हातखंडा तयार झाला आहे. त्यांची एकूण २७ एकर शेती आहे. त्यापैकी सुमारे १० एकरांत ते दरवर्षी केळी घेतात. यंदा त्यांचे केळीचे क्षेत्र १८ एकरांपर्यंत आहे. केळीचे उत्पादन दरवर्षी ३५ ते ४० टनांच्या आसपास घेण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. रासायनिक व सेंद्रिय अशा एकात्मिक पद्धतीने ते केळीचे व्यवस्थापन करतात. नेहमी चांगले उत्पादन मिळण्यामागे जमिनीची सुपीकता व उत्तम सेंद्रिय कर्ब या बाबी कारणीभूत असल्याचे शिवाजीराव सांगतात. 

केळी पिकातील व्यवस्थापन 
दरवर्षी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केल्यानंतर मोगडणी करण्यात येते. त्यानंतर एकरी आठ ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत टाकून बैलाच्या नांगराने ते जमिनीत चांगले मिसळून घेण्यात येते. शेणखताचा वापर दरवर्षी होतो. यानंतर रोटर मारून ढेकळे बारीक करून घेण्यात येतात.  

विविध टप्प्यांत लागवड 
देशमुख दरवर्षी सुमारे चार टप्प्यांत किंवा वेगवेगळ्या बहारात केळीची लागवड करतात. जेणे करून एखाद्या बहारात दर चांगले न मिळाल्यास पुढील बहारात मिळू शकतात. त्यामुळे त्यांच्या शेतात केळीच्या वेगवेगळ्या अवस्था नेहमीच पाहण्यास मिळतात. लागवडीसाठी जी-९ जातीच्या टिश्यू कल्चरची रोपे वापरण्यात येतात. लागवडीपूर्वी प्रथम रासायनिक व नंतर जैविक रोपप्रक्रिया करण्यात आली. यात मेटलॅक्झील अधिक मॅंकोझेब व क्लोरपायरीफॉस यांच्या द्रावणात रोपांची मुळे बुडवण्यात येतात. ट्रायकोडर्मा, तसेच जीवाणूखतांचा वापरदेखील शिफारसीनुसार करण्यात येतो. 

खत व्यवस्थापन 
-लागवड सात बाय पाच फुटांवर केली आहे. प्रत्येक आठ दिवसाला जिवामृत शेणस्लरीची रोपांभोवती आळवणी करण्यात येते. लागवडीनंतर ३० दिवसांनी प्रति हजार झाडास १०० किलो डीएपी, ५० किलो पोटॅश, ८० किलो निंबोळी पावडर, ८० किलो भूसुधारक, २० किलो सूक्ष्म अनद्रव्य ही खते एकत्र मिसळून बांगडी पद्धतीने देण्यात आली. यानंतर ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करण्यात येते. लागवडीनंतरदेखील प्रति हजार झाडांसाठीचे प्रमाण लक्षात घेऊन पोटॅश, युरिया, डीएपीनिंबोळी पावडर, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा गरजेनुसार वापर करण्यात येतो.  

बुरशीनाशकांचा प्रतिबंधात्मक वापर 
नांदेड जिल्हा हा पारंपरिक केळी उत्पादक जिल्हा आहे. वर्षानुवर्षे केळी घेतल्यामुळे सिगाटोका रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यासाठी बुरशीनाशकांच्या प्रतिबंधक उपायांवर भर दिला जातो. 

पीलबागेचे नियोजन
रोप लागवडीनंतर ८० टक्के केळी निसवली की पीलबागेचे नियोजन करण्यात येते. प्रति झाड एक पील ठेवून बाकी पील कापून काढण्यात येते. एक महिन्याने प्रत्येक पीलला अर्धचंद्राकार आळे करून खताचा पहिला डोस देण्यात येतो. यानंतर या बागेलाही नवीन लागवडीप्रमाणेच खतांच्या मात्रा देण्यात येतात. 

   जीवामृत शेण स्लरी 
रोप लागवडीपासून १५ दिवसांच्या अंतराने जीवामृत शेण
 स्लरीची आळवणी दिली जाते. यासाठी प्रति २०० लिटरच्या टाकीमध्ये शेण, गोमूत्र, बेसन पीठ, गूळ, दूध, दही, ट्रायकोडर्मा आदींचे योग्य प्रमाणात मिश्रण केले जाते. दहा दिवस ठेवून मग त्याचा वापर केला जातो. 

जमीन चांगली म्हणून उत्पादन सरस  
शिवाजीरावांना एकरी ३५ ते ४० टन उत्पादनासाठी दरवर्षी सुमारे ७० हजार ते ९० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. यंदा त्यांना किलोला ८ रुपये दर मिळाला आहे. यंदा घडांचे वजन चांगले मिळाल्याने दर तुलनेने कमी असला तरी उत्पन्नात वाढ होणार असल्याचे ते म्हणाले. आपल्या चांगल्या उत्पादनामागील रहस्य सांगताना शिवाजीराव म्हणाले की, माझ्या जमिनीत नैसर्गिकरीत्या गांडुळांची संख्या निर्माण झाली आहे. मी केळीचे सारे तसेच अन्य पिकांचेही सारे अवशेष जमिनीत गाडतो. त्यांच्यामुळे जमिनीला चांगले सेंद्रिय खत मिळते. जीवाणू खतांचा माझा वापरही चांगला असतो. 

    सेंद्रिय कर्ब एक टक्क्यापुढे 
शिवाजीराव यांनी मागील वर्षी आपल्या मातीचे परीक्षण करून घेतले आहे. त्यात सेंद्रिय कर्बाचे प्रमाण १.१३ टक्के आढळले आहे. राज्यात अनेक ठिकाणी सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटत चालल्याचे दिसत असताना शिवाजीराव यांच्याकडे मात्र हे प्रमाण अत्यंत चांगल्या प्रमाणात आहे, यावरूनच त्यांचे शेती व्यवस्थापन चांगले असल्याचे दिसून येते. जमिनीचा सामूही ६.४ आहे.   

  शेतीचे नेटके व्यवस्थापन 
शिवाजीराव अभ्यासू वृत्तीने शेती करतात. एकरी सुमारे ३५ क्विंटल उत्पादन (सुकवलेले) त्यांनी हळदीचे घेतले आहे. पपईचेही उल्लेखनीय उत्पादन ते घेतात. स्वखर्चाने जल व मृद संधारण करून माळरानावर नंदनवन फुलविण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. त्यांच्याकडे विहीर व बोअर असे दोन्ही जलस्रोत आहेत. शिवाय शेततळ्याचाही मोठा आधार आहे.  शंकर या लहान भावाचेही शेतीत मोठे सहकार्य मिळते. गीर गायीचेही पालन केले जाते.  

केळीच्या घडाचे वजन
यंदाच्या एप्रिलमध्ये काढणी केलेल्या दोन एकरांतील खोडवा पिकात एका घडाचे वजन सुमारे ९९ किलो मिळाल्याचा दावा शिवाजीराव यांनी केला आहे. अन्य काही घड देखील ७० ते ८० किलोच्या आसपास असल्याचे ते सांगतात. ही केळी खरेदी केलेला व्यापारी म्हणाला की माझ्या नव्या वजनकाट्यावरच या घडाचे वजन केले. गेल्या १५ वर्षांपासून केळी खरेदी विक्री व्यवसायात असून एवढ्या वजनाचा घड मी यापूर्वी पाहिलेला नाही. 

शास्त्रज्ञ व शेतकरी काय म्हणतात?
बारड भागातील एका शेतकऱ्याकडे सुमारे ६२ ते ६६ किलो वजनाचा घड मी पाहिला आहे. मात्र जी-९ उती संवर्धित वाणाचा त्यापुढील वजनाच्या घडाबाबत माझ्या वाचनात कधी आलेले नाही किंवा तसे कुठेही ऐकलेले नाही. त्याविषयी अधिक अभ्यास, निरीक्षण करूनच भाष्य करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया नांदेड येथील केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ आर.व्ही. देशमुख यांनी दिली. बारामती (जि. पुणे) भागातील प्रयोगशील व प्रसिध्द केळी उत्पादक कपील जाचक म्हणाले की नांदेड भागातील तापमान अधिक असते. हा विचार करून देशमुख यांना मिळालेल्या घडाच्या वजनाबाबत अधिक अभ्यासाची व पुनर्वलोकनाची गरज आहे. 

 शिवाजी देशमुख- ९७६३६३११२२
(लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com