घनकचऱ्यासह प्लॅस्टिक प्रक्रियेसाठी प्रकल्प

अनिल देशपांडे 
सोमवार, 10 जुलै 2017

अोला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करून त्याचे योग्य व्यवस्थापन करणारे तंत्रज्ञान महात्मा फुले कृषी विद्यापीठाने अमलात आणून ते यशस्वी केले आहे. सुका कचरा या वर्गात येणारे प्लॅस्टिक डांबरनिर्मितीत ‘हॉट मिक्स’ तंत्रज्ञानांतर्गत वापरून डांबराची कार्यक्षमता वाढवणारा प्रयोग या विद्यापीठाने यशस्वी केला आहे.

सध्याच्या युगात प्लॅस्टिकचा वापर बंद करण्याकडे जगाचा कल आहे. प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याच्या कारणावरून पर्यावरणात त्याचा कचरा वाढला आहे. त्याच्या प्रदूषणाचे प्रतिकूल परिणाम पाहावयास मिळत आहेत. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने देखील आपले प्रक्षेत्र, परिसर प्लॅस्टिकमुक्त करण्याचा मानस बाळगला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी त्यासाठी आग्रह धरला. शेतीशी संबंधित सर्व प्रयोग करतानाचा विद्यापीठानेदेखील स्वच्छ भारत अभियानांतर्गत थोडे वेगळे मात्र विधायक पाऊल उचलले. त्याचबरोबर अोला कचरा म्हणजे ‘कीचन वेस्ट’ (स्वयंपाकघरातील वाया जाणारे घटक), पीक अवशेष, पालापाचोळा यांच्यापासूनही सेंद्रिय खत तयार करण्याचा प्रकल्प राबवून तो यशस्वी केला आहे. 
  
असे आहे घनकचरा व्यवस्थापन 
पूर्वी विद्यापीठ परिसरातील घनकचरा बहुतेक वेळा जागेवरच कचराकुंडीतच जाळला जात असे. आज मात्र ही पद्धत पूर्णपणे बंद झाली आहे. कचऱ्याचे खत झाले की ते सोनेच आहे असे लक्षात आणून देत कचऱ्यास काडी लावायची नाही असे कुलगुरू यांनी निक्षून सांगितले. घनकचरा व्यवस्थापनात ओला कचरा व सुका कचरा, असे मुख्य वर्गीकरण करण्यात आले. 

डांबराचे मूल्यवर्धन 
प्लॅस्टिक हे सुक्या कचऱ्याअंतर्गत साठविण्यात येते. साधारण दीड ते दोन टन त्याचे वजन झाले की त्यावर प्रक्रिया सुरू होते. प्लॅस्टिक श्रेडर या यंत्राद्वारे त्याचे तीन ते पाच मिमी आकाराचे तुकडे केले जातात. डांबरनिर्मितीचे राहुरी परिसरात दोन प्रकल्प आहेत. अशा कोणत्याही प्रकल्पातून एकूण डांबर घटकाच्या १० टक्के हे प्लॅस्टिक त्यात मिसळले जाते. त्यासाठी हॉट मिक्स हे तंत्रज्ञान वापरले जाते. यात १७० अंश सेल्सियस तपामानाला ते तापवण्यात येते. यामध्ये प्लॅस्टिक पूर्णपणे वितळते. डांबराभोवती त्याची ‘लेयर’ तयार होते. असा प्रकारे तयार झालेल्या डांबराचे मूल्यवर्धन होते. त्याची गुणवत्ता किंवा कार्यक्षमता वाढते. अशा डांबरापासून तयार झालेल्या रस्तेदेखील सुमारे ९ ते १० वर्षे टिकतात. पूर्वी याच रस्त्यांचे आयुष्य तीन ते चार वर्षे असायचे असे विद्यापीठाचे अभियंते व या प्रकल्पातील तज्ज्ञ मिलिंद ढोके यांनी सांगितले. या तंत्राच्या वापरामुळे डांबरातही काही प्रमाणात बचत होईल. 

अोल्या कचऱ्याचे व्यवस्थापन 
विद्यापीठ कार्यक्षेत्रात अोल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सुमारे चाळीस खड्डे घेण्यात आले आहेत. त्यात पाळापाचोळा, झाडांच्या फांद्या, कांड्या यांचे बारीक तुकडे करुन कल्चर वापरून सेंद्रिय खत तयार केले जाते. कुलगुरू, अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदवून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात स्वच्छता अभियानाला मोठा हातभार लावला आहे. साधारणतः साठ ते सत्तर जणांचा त्यात सहभाग राहिला आहे. दहा बाय सहा बाय सहा फूट अशा आककारमानाचे हे खड्डे आहेत. त्यातून तयार होणार सेंद्रिय खत विद्यापीठातच वापरले जाणार आहे. कचरा संकलित करण्यासाठी कचराकुंड्यांची संख्या वाढविली गेली. चाळीस खड्ड्यांद्वारे सुमारे तीन हजार किलो सेंद्रिय खत मिळेल अशी अपेक्षा आहे. सेंद्रिय खतांचे कारखाने गावोगावी विविध संस्थांच्या पुढाकाराने उभे राहिले पाहिजेत अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी व्यक्त केली आहे. 

नाडेप कंपोस्टचा प्रकल्प 
विद्यापीठात व्हर्मिकंपोस्ट प्रकल्पाबरोबर नाडेप कंपोस्टचे प्रयोगही झाले आहेत. या पद्धतीत कंपोस्टनिर्मितीसाठी जमिनीच्या वर तीन फूट उंच, सहा फूट रुंद व दहा फूट लांब या आकाराचे टाकीचे बांधकाम केले गेले. विटांच्या प्रत्येक दोन थरांनंतर खिडक्या ठेवल्या गेल्या. त्यामुळे जिवाणूंसाठी प्राणवायू मिळाला. कंपोस्ट टाकीच्या तळाला १५ सेंमी जाडीच्या कचऱ्याचा थर देऊन त्यावर शेणकाला टाकण्यात आला. त्यानंतर ५० ते ६० किलो सजीव माती टाकली. टाकी भरताना साठ टक्के कचरा ओला भरला. टाकी पूर्णपणे भरून झाल्यावर टाकीचा शेवटचा थर झोपडीच्या आकाराचा केला. सुमारे ४८ तासांच्या आत टाकी पूर्ण भरली. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी टाकीत सेंद्रिय पदार्थ भरले गेले. त्या वेळी पुन्हा पहिल्यासारखी टाकी भरून वरचा थर शेणकाल्याच्या साह्याने लिंपून घेतला. त्यामुळे चांगले कंपोस्ट खत तयार झाले. नाडेप पद्धतीने एका टाकीद्वारे तीन ते चार टन कंपोस्ट खत तयार झाले आहे.
 मिलिंद ढोके, ९९२२४५०१५१

Web Title: agrowon news agriculture plastic