सरला दुष्काळ... जाखलेत चहूकडे हिरवाईचा सुकाळ

सरला दुष्काळ... जाखलेत चहूकडे हिरवाईचा सुकाळ

कोल्हापूर हा बागायती जिल्हा असला तरी जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील अनेक गावे पावसाळा वगळता पाण्यासाठी कायम झगडत असतात. प्रसिद्ध श्री क्षेत्र जोतिबाच्या पायथ्याशी असलेले जाखले (ता. पन्हाळा) हे सुमारे चार हजार लोकसंख्येचे यापैकीच गाव. डिसेंबर संपला की जूनमध्ये पावसाळा सुरू होइपर्यंत गावात पाण्याचे दुर्भीक्षच असायचे. केवळ खरीप हंगामावरच शेतकऱ्यांना वर्षभर गुजराण साधावी लागे. ऊस घ्यायचा म्हटले तरी पुरेशा पाण्याअभावी अपेक्षित उत्पादन यायचे                          नाही. 

जलस्रोत बळकटीकरणावर भर  
 सन २०१५ नंतर गावाने रुपडे बदलण्यास सुरवात केली. विविध विभागांच्या योजना एकत्रित काम करू लागल्या. ग्रामस्थांचे श्रमदानही महत्त्वाचे ठरले. या प्रयत्नाला जलयुक्त शिवार योजनेची साथ मिळाली. आज त्याचे परिणाम दिसू लागले आहे. पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण अशी जाखलेची अोळख होऊ लागली आहे. गावात उसाचे क्षेत्र वाढत आहे. 

कृषी, सामाजिक वनीकरण, वन विभाग, लघुसिंचन, जलसंधारण, जलसंपदा, भूजल सर्वेक्षण आदी यंत्रणांमार्फत सुमारे पन्नास प्रकारची पन्नासहून अधिक कामे झाली.

झालेली कामे - सिमेंट बंधारे, अनघड दगडी बांध, सिंमेट नालाबांध दुरुस्ती, मातीबांध, गाळ काढणे, खोल सलग समतोल चर, खोस सलग समतल चर, वनतळे, कुरण तलाव दुरुस्ती, सिमेंट नालाबांध, तलाव दुरुस्ती, ओढा खोली व रुंदीकरण, केटीवेअर, गाळ काढणे, बोअर पुर्नभरण 

कामांचे दृश्‍य परिणाम  
 सुमारे ३७७ लाख रुपयांच्या झालेल्या कामांतून सुमारे ५३९ टीसीएम पाणीसाठा वाढला. त्याचा लाभ ३४० हेक्‍टरवरील पिकांना झाला.

 लोकसहभागाने साधली बचत - विशेष म्हणजे गावच्या तरुणाईने सक्रिय सहभाग घेत पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत श्रमदान केले. यातून झालेल्या सुमारे १४६ ठिकाणच्या कामांतून सुमारे ४१ लाख रुपयांची बचत झाली. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या श्रमदानामुळे विविध जलस्रोतांच्या माध्यमातून ८६ टीसीएम पाठीसाठ्याची वृद्धी झाली. यातून सुमारे ४३ हेक्‍टर क्षेत्र पिकांखाली आले. 

 जिथे डिसेंबरनंतर राने उजाड दिसायची तिथे आता हिरवाई फुलली आहे. ऊस, मका आदी पिकांबरोबर रब्बी पिकेही शिवारात डौलदारपणे उभी                  आहेत. 

 गावात सुमारे दोनशे विहीर आहेत. यापैकी सत्तर टक्के विहिरी डिसेंबरनंतर कोरड्या पडायच्या. आता त्यात मुबलक पाणीसाठा आहे. 

 सद्यःस्थिती पूर्ण झालेली कामे - २०० 
 एकूण खर्च - ४१८.८८ लाख रुपये
 नव्याने निर्मित झालेला पाणीसाठा - ६२६ टीसीएम
 सिंचन क्षेत्र वाढ - ३८३ हेक्‍टर

कामांमुळे सरपंचपदाची संधी  

गावातील सागर माने (वय ३४) यांनी जलसिंचनाच्या कामात हिरिरीने भाग घेतला. युवकांची फळी निर्माण केली. अनेक विकासकामांत सक्रिय सहभाग घेतला. त्यांची नेतृत्वक्षमता पाहता ग्रामस्थांनी त्यांना सरपंचपदासाठी उभे केले आणि विजयीही केले. माने शिरोली येथील एमआयडीसी येथे फौंड्रीत ‘प्लॅन्ट मॅनेजर’ म्हणून सेवेत आहेत. स्वत:च्या गावात कामे करण्याबरोबरच जिल्ह्यातील सरपंचांच्या कार्यशाळेतही व्याख्यानाद्वारे जागृती करण्याचे काम त्यांनी सुुरू ठेवले. कमी वयातील युवा सरपंच असणाऱ्या माने यांनी ॲग्रोवनच्या वतीने नुकत्याच आळंदी येथे झालेल्या सरपंच महापरिषदेतही सहभाग घेतला होता. उत्कृष्ट कामांमुळे गावाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कारही झाला आहे. 

नावीन्यपूर्ण ओघळ  जोड प्रकल्प  
गावात मोठा माने तलाव आहे. तो कधीच पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. त्यासाठी ग्रामस्थांनी नावीन्यपूर्ण योजना आखली. शेजारीच कुरण तलाव आहे. या दोन तलावांतील वाहात जाणारे चार ओघळींचे पाणी एकत्रित करून ते या तलावात सोडण्याचा प्रकल्प ग्रामस्थांनी आखला आहे. हे काम पूर्णत्वाला गेल्यास तलावात वर्षभर पाणीसाठा राहू शकेल. 

ग्रामस्थांची इच्छाशक्ती आणि पाणीटंचाई दूर करण्याचा दृष्टिकोन यातूनच परिस्थिती बदलणे शक्य झाले. कोणत्याही परिस्थितीत गावात जलसाक्षरता तयार होणे आणि बारमाही पाण्याची सोय या माझ्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाच्या बाबी आहेत. त्या पूर्ण होत असल्याने केलेल्या कामांचा वेगळा आनंद आहे. 
- सागर माने, ८९७५९५१२१५, सरपंच
 
ग्रामस्थांच्या सहभागामुळे जाखलेमध्ये जलयुक्त शिवार अभियानातून अधिक उठावदार व व्यापक कामे राबवणे शक्य झाले. 
- बंडा कुंभार, तालुका कृषी अधिकारी, पन्हाळा 

जल, मृद संधारण आणि पिकांसाठी पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन यांबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देणारे जाखले गाव हे प्रशिक्षण केंद्र म्हणून पुढे यावे, यासाठी आत्मा विभागाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत.  
- पराग परीट, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, पन्हाळा

डिसेंबर महिना आला की गावातील पाणीसाठे आटण्यास सुरवात व्हायची. त्यामुळे विविध पिके घेण्यावरच मर्यादा यायची. डिसेंबरनंतर पावसाळ्यापर्यत शेतात काही करणे शक्य व्हायचे नाही. उसासारखे पीकही वाळून जायचे. मात्र जलसंधारणाची कामे झाल्याने गावाच्या भूगर्भातील पाणीसाठा वाढला. आता पाण्याचा साठा सक्षम होऊन विविध हंगामातील पिके घेण्याबरोबर उसाला बारमाही पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.
- प्रकाश करंबळे, शेतकरी,  जाखले, ता. पन्हाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com