दूध, तूपनिर्मितीसह जमिनीच्या सुपीकतेचे ध्येय

दूध, तूपनिर्मितीसह जमिनीच्या सुपीकतेचे ध्येय

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील कृषी पदवीधर, प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्र येत देशी गोवंशसंवर्धनासाठी ‘साहिवाल क्लब` स्थापन केला. जातिवंत दुधाळ साहिवाल गाईंचे संगोपन, दूध, तूपनिर्मिती; तसेच गोबरगॅस, शेतीसाठी सेंद्रीय खत आदी विविध उद्दिष्टांसह गटातील सदस्यांनी या क्षेत्रात भरीव वाटचाल सुरू केली आहे. 

देशी गोवंशाचे महत्त्व वाढू लागले आहे. त्यातीलच एक साहिवाल गोवंशसंवर्धनासाठी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील कृषी पदवीधर आणि प्रयोगशील शेतकरी सुमारे एक वर्षापूर्वी एकत्र आले. त्यांनी गटाला ‘साहिवाल क्लब’ असे नाव दिले. त्याचे सध्या ५२ सदस्य अाहेत. शेतीत प्रयोगशीलता सांभाळण्याबरोबरच गोसंवर्धन व शास्त्रीय नोंदी ठेवू शकणाऱ्यांनाच क्लबचे सदस्य करण्यात आले आहे.

असा आहे ‘साहिवाल क्लब’ 
गटाचे मार्गदर्शक सदस्य आणि पुणे कृषी महाविद्यालयातील पशुतज्ज्ञ डॉ.सोमनाथ माने म्हणाले की साहिवाल गाय आपल्या राज्यातील वातावरणात चांगल्या प्रकारे रूळू शकते हे अभ्यासातून लक्षात आले. त्यानंतर कर्नाल (हरियाना) येथील राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेला (एनडीआरआय) भेट देऊन तज्ज्ञांशी चर्चा केली. हरियाना राज्यातील पशुपालकांच्या भेटी घेतल्या. सन २०१५ मध्ये हरियाना राज्यातील पशुसंवर्धन विभागाची अधिकृत संमती व कागदपत्रांची पूर्तता करून पहिल्या वेताच्या १८ गाभण साहिवाल गायी आणल्या. गाय गोठ्यात येईपर्यंत सुमारे साठहजार रुपयांपर्यंत खर्च आला. यात गायीची खरेदी, आरोग्य, जनुकीय आणि दूध गुणवत्ता तपासणी व शासकीय परवान्याचा समावेश आहे. बारामती, इंदापूर, पुरंदर भागातील सदस्यांना प्रत्येकी दोन ते चार गायी संगोपनासाठी दिल्या. आपल्या वातावरणात रुळल्या. तीन महिन्यांत त्यांच्या आरोग्यात चांगली सुधारणा झाली. सुदृढ वासरे जन्माला आली. पहिल्या वेताच्या गायीचे प्रतिदिन सरासरी ६ ते ८ लिटर दुग्धोत्पादन आहे. पुढे ते वाढते. बारामती, इंदापूर, मुळशी, दौंड, शिरूर, सासवड, हवेली तालुक्यातील सदस्यांना साहिवालच्या रेतमात्रा देतो. व्हॉट्सॲपवर तांत्रिक माहितीही दिली जाते. 

गायींच्या व्यवस्थापनाविषयी 
हरियानातून गाय आणतानाच टॅगिंग क्रमांक. त्यानुसार रोजचे दूध उत्पादन, आहार, वासराचे वजन, लसीकरण, जंतनिर्मूलन, व्यायल्यानंतर गाईने किती दिवसांनी माज दाखविला, रेतनाची तारीख,गाय कधी व्यायली याची स्वतंत्र नोंद गटातील बहुतांश सदस्यांमार्फत मुक्त संचार पद्धतीने व्यवस्थापन  घरच्या घरी पशुखाद्यनिर्मितीचे मार्गदर्शन केले जाते. त्यानुसार दूध उत्पादक विविध खाद्यघटकांचा वापर करून पशुखाद्यनिर्मिती करतात. 

साहिवाल गायीत रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. तज्ज्ञांच्या सल्याने कोरफड, शतावरी, हळद, शेवगा,कडीपत्ता या सारख्या औषधी वनस्पतींचा उपचारात वापर  करतो.

शिफारशीनुसार लसीकरण. प्रतिगाय वर्षाला एक हजार रुपये औषधोपचार खर्च  महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार संकरित नेपियर (फुले जयवंत), लसूण घास  (आरएल८८), मारवेल (मारवेल-४०), स्टायलो (फुले क्रांती) आदी चारापिकांची लागवड गटातील सदस्यांनी केली आहे.

गोठा भेट, प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन 
केवळ दूध, तूप उत्पादनाचे उद्दिष्ट न ठेवता दूधप्रक्रिया, गोबरगॅस, गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी तसेच गोमूत्र अर्क आदींचीही निर्मिती व त्यातून नफावाढ.  

बहुविध फायद्यांसाठी साहिवाल 
साहिवाल क्लबचे अध्यक्ष संतोष राऊत म्हणाले की दूध, तूप उत्पादनाबरोबरच शेती, आरोग्य आणि ऊर्जा या बाबींच्या अनुषंगाने साहिवाल गाय संवर्धनाकडे पाहातो. बहुतांश सदस्यांनी बायोगॅस युनिट उभारले आहे. गॅस स्वयंपाकासाठी उपयोगात येतो. स्लरीपासून गांडूळ खत निर्मिती होते. बायोगॅस स्लरीमध्ये पीएसबी, ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम जिवाणू संवर्धक मिसळतो. डाळिंब, द्राक्ष, केळी, सीताफळ, भाजीपाला पिकांत त्याचा वापर करतो. या सेंद्रीय घटकांमुळे जमिनीचा पोत सुधारण्यास चालना मिळत आहे. रासायनिक खते, कीडनाशकांच्या वापरात बचत होत असून मालाची गुणवत्ता चांगली मिळत आहे. नुकताच मी ब्राझीलचा दौरा केला. तेथील पशुपालकांनी गीर, रेडसिंधी, कॉंक्रेज या भारतीय गायी चांगल्या पद्धतीने सांभाळलेल्या आहेत. तेथील गीर गाय दररोज सरासरी १५ लिटर दूध देते. काही शेतकऱ्यांकडे प्रतिदिन ३० लिटर दूध देणाऱ्याही गायी आहेत. त्यांनी शुद्ध गोवंश संवर्धन, आहार व्यवस्थापन, जातिवंत वळू संगोपनावर भर दिला आहे.

संतोष राऊत, ९८६००६४४४४
 डॉ.सोमनाथ माने   ९८८१७२१०२२

गायींची गुणवत्ता 
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार हरियाना, पंजाबमधील पशुपालकांकडून पहिल्या वेताच्या जातिवंत दुधाळ साहिवाल गायी आणल्या जातात. 
ब्रुसोलेसीस, टीबी, जॉन डिसीज आदी रोगांबाबत पशुवैद्यकांकडून तपासणी.
हिस्सार कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन विभागाच्या प्रयोगशाळेत दूध गुणवत्ता तपासणी.
राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेत गायींची जनुकीय (डीएनए) तपासणी.  
एनडीआरआय, एनडीडीबी संस्थेतून साहिवाल रेतमात्रांची खरेदी. त्यामुळे दुग्धोत्पादन सातत्य आणि वाढ. 
प्रत्येक गायीची स्वतंत्र नोंद. शास्त्रीय पद्धतीने संवर्धन.
परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत देशी गाय व्यवस्थापन तंत्राचा प्रसार. 

दूध, तूपविक्रीतून नफ्यात वाढ 
डॉ. माने म्हणाले की पहिल्या वेताच्या गायीपासून प्रतिदिन ६ ते ८ लिटर दुग्धोत्पादन मिळते. पुढील काळात हेच उत्पादन १० ते १२ लिटरपर्यंत मिळेल. दुधाचे फॅट ४.५ ते ५.२, एसएनएफ ९ च्या दरम्यान आहे. प्रत्येक सदस्याकडे २ ते ४ गायी आहेत. शहरी तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांकडून दुधाला मागणी वाढत आहे. पुणे शहराजवळचे पशुपालक एकत्रितपणे शहरात दररोज २०० लिटरपर्यंत दूध विक्री करतात. काही तूपनिर्मिती तर काही पनीरनिर्मितीमध्ये उतरत आहेत. ग्रामीण भागात दुधाला ६० ते ६५ रुपये तर शहरात ८० ते ९० रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. तुपाची २५०० ते ३००० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com