फळबागेतून शेती केली सक्षम

फळबागेतून शेती केली सक्षम

बबन विश्वनाथ डिघुळे हे मूळचे औरंगाबाद तालुक्‍यातील भालगावचे. शिक्षणानंतर १९८२ मध्ये त्यांना भारत संचार निगम लिमिटेडमध्ये नोकरी मिळाली. तरीदेखील त्यांनी शेतीशी असलेली नाळ तुटू दिली नाही. दर रविवारी शेतावर जाऊन पीकनियोजन, फळझाडांची लागवड आणि आपल्या कल्पकतेनुसार भावंडे, शेतातील मजूर आणि संपर्कातील शेतकऱ्यांना शेतीतील बदलांची ते माहिती देऊ लागले. शेतीनियोजनात त्यांच्या पत्नी पार्वती यांची चांगली साथ मिळते. बबन डिघुळे यांना वाट्याने वडिलोपार्जित पाच एकर जमीन आली. सध्या या शेतीमध्ये त्यांनी ५० गुंठ्यावर डाळिंब, दीड एकर मोसंबी, ३० गुंठ्यावर चिकू लागवड केली. याचबरोबरीने बांधावर पेरूची १० कलमे, २० नारळ, तसेच जांभूळ, सीताफळ, रामफळ, चिंच, आंबा, कवठ यांचीही एक-दोन कलमे त्यांनी लावली आहेत. शेततळ्याच्या बांधावर आवळ्याची २५ कलमे लावली आहेत. सन २००५ मध्ये ३० गुंठ्यावर चिकू लागवड केली होती. त्यातील काही कलमे गेली. त्या ठिकाणी लिंबाची झाडे लावली आहेत. सध्या बागेत चिकूची ५० आणि लिंबाची २५ झाडे आहेत. डाळिंब, मोसंबी आणि चिकूच्या दोन झाडांच्यामध्ये शेवग्याची रोपे लावली आहेत. डिघुळे हे ॲग्रोवनचे सुरवातीपासूनचे वाचक आहेत. यातील लेख, प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव वाचून त्यांनी सेंद्रिय व्यवस्थापनास सुरवात केली. त्यातून जमीन सुपीकता आणि आर्थिक बचतीवर लक्ष केंद्रित केले.

फळबाग लागवडीचे नियोजन  
 फळबाग नियोजनाबाबत बबन डिघुळे म्हणाले की, आम्ही भावांनी मिळून २००१ मध्ये मोसंबी लागवड केली होती. वाटणीनंतर मला दीड एकर मोसंबीची बाग वाट्याला अाली. २०१५ पर्यंत मी या बागेमध्ये रासायनिक खते, कीडनाशकांचा वापर करायचो. मला दरवर्षी या बागेतून साठ हजारांचे उत्पन्न मिळायचे, खर्च २० हजारांचा होत असायचा. मात्र २०१५ पासून सेंद्रिय पद्धतीने मोसंबी बागेच्या व्यवस्थापनास सुरवात केली. त्यामुळे खर्च कमी झाला. फळांची विक्री थेट व्यापाऱ्यांना करतो. मोसंबीमध्ये मी तुरीचे आंतरपीक घेतो. गेल्यावर्षी मला दोन क्‍विंटल तूर झाली.  २०१२ मध्ये ५० गुंठे क्षेत्रावर डाळिंबाच्या भगवा जातीची १४ फूट बाय ९ फूट अंतराने लागवड केली. पहिल्यांदा मी रासायनिक खतांचा फळबागेसाठी वापर करायचे. परंतु २०१५ पासून सेंद्रीय शेती पद्धतीने व्यवस्थापनास सुरवात केली. यामध्ये घन जीवामृत, शेणखत, पाचट आच्छादन आणि गोमूत्र अर्क, दशपर्णी अर्काच्या वापरावर भर दिला. डाळिंबाचा पहिल्या बहराचे मला तीन टन उत्पादन मिळाले. दर चांगला असल्याने दीड लाखाचे उत्पन्नही मिळाले. परंतु रासायनिक खते, कीडनाशकांच्या वापरावर पन्नास हजार रुपये खर्च झाले. त्यामुळे पुढील टप्प्यात सेंद्रिय खतांच्या वापरावर भर देण्यास सुरवात केली. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होत पुढील बहरात नफा वाढला. मला गेल्या वर्षी चार टन उत्पादन मिळाले. २०१७ मध्ये मोठ्या प्रमाणात गळ मोठ्या प्रमाणात झाल्याने केवळ ४० हजारांचे उत्पन्न मिळाले. नोकरी करत डाळिंब बागेचे व्यवस्थापन होत असल्याने काही त्रुटी राहिल्या होत्या. सध्या एक कायमस्वरूपी मजूर बागेचे व्यवस्थापन पाहातो. गरजेनुसार भावाची मदत घेतली जाते. डाळिंबाची विक्री परिसरातील शेतकऱ्यांच्याबरोबरीने नाशिक मार्केटमध्ये करतो.

 मी २००५ मध्ये चिकूची ३० गुंठे क्षेत्रावर लागवड केली. या बागेलादेखील सेंद्रिय खतांचा वापर करतो. गेल्या वर्षीपासून फळांचे उत्पादन मिळू लागले आहे. चिकूच्या ५० झाडांपैकी काही झाडांना फळे धरली आहेत. बहुतांश फळे घरी खाण्यासाठीच वापरली. काही चिकू ३० रुपये किलो दराने थेट ग्राहकांना विकला. जेथे चिकूचे कलम गेले तेथे २००७ मध्ये लिंबाचे रोप       लावले. लिंबाला चांगली फळधारणा होते. सरासरी २०० फळे मिळतात. या फळांची विक्री घरूनच करतो, तसेच काही फळे मार्केटमध्ये विक्रीस पाठवितो. 

जमीन  सुपीकतेवर भर 
 जमीन सुपीकतेबाबत डिघुळे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून मी शेतातील तण, गवत, पाला पाचोळा हे घटक जमिनीमध्ये मिसळून देतो. त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊ लागली. उपयुक्त जिवाणू, गांडूळांची  संख्या वाढली. त्याचा झाडाच्या पोषणासाठी फायदा होत आहे. जमिनीत थेट शेणखत मिसळण्याऐवजी घन जीवामृत वापरणावर माझा भर आहे. घन जीवामृत तयार करण्यासाठी १०० किलो शेणखतात २० लिटर जीवामृत मिसळून पूर्णपणे सुकविले जाते. त्यानंतर हे घन जीवामृत पोत्यामध्ये भरून ठेवले जाते. उन्हाळ्यात फळबागेत पाचट आच्छादन करण्यापूर्वी २०० किलो प्रतिएकरी या प्रमाणात फळझाडांच्या आळात घन जीवामृत मिसळले जाते. 

शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी शेततळे 
डिघुळे यांनी शाश्वत पाणी व्यवस्थापनासाठी २४ मीटर बाय २४ मीटर बाय तीन मीटर आकाराचे शेततळे घेतले आहे. शेतीमध्ये दोन सामायिक विहिरी आणि एक कूपनलिका आहे. पावसाळ्यामध्ये विहिरी आणि कूपनलिकेतील पाणी उपसून शेततळ्यात भरून ठेवले जाते. उन्हाळ्यात गरजेनुसार शेततळ्यातील पाण्याचा वापर केला जातो.

गीर गाईंचे संगोपन  
 स्लरी, जीवामृत निर्मितीसाठी आवश्‍यक असलेले गोमूत्र आणि शेण उपलब्धेतसाठी डिघुळे यांनी दोन गीर गाई सांभाळल्या आहेत. गोमूत्र एका ठिकाणी गोळा करण्याची रचना त्यांनी गोठ्यात केली आहे. 

आच्छादनातून पाणीबचत 
 उन्हाळ्यात फळझाडांना कमी पाणी लागावे, यासाठी डिघुळे अाळ्यामध्ये पाचट, गवत, तणांचे आच्छादन करतात. आळ्यात मिसळलेले घनजीवामृत आणि ठिबकद्वारे दिल्या जाणाऱ्या स्लरीमुळे जमिनीत ओलावा टिकून रहातो. यामुळे गांडुळे तसेच उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढली आहे. 

शेतीची वैशिष्टे 
फळबागांमध्ये झेंडू, चवळी, हरभऱ्याचे आंतरपीक.
साधारणपणे १० ते १५ गुंठ्यावर चारा, ऊस, रब्बी ज्वारी, मका, बाजरी, गहू, हरभरा, तूर, मूग लागवड. 
गहू, बाजरी वगळता इतर पिकांच्या लागवडीसाठी घरचे बियाणे. 
शेततळे व बांधावर विविध फळझाडांची लागवड. त्यातून उत्पन्नवाढीवर भर.
महिन्यातून एकदा दशपर्णी अर्काची फवारणी.
पंधरवड्याला जीवामृत फवारणी व ठिबकद्वारे वापर.
प्रत्येक फळझाडाला घन जीवामृत आळ्यामध्ये दिले जाते.
फळबाग आणि बांधावरील झाडांना ठिबक सिंचनाने पाणी नियोजन.
 बबन डिघुळे, ९४२२९७०९७०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com