स्वनिर्मिती तंत्रज्ञानाला शेतकऱ्याने मिळवली नऊ राज्यांत बाजारपेठ 

मंदार मुंडले
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

नगर जिल्ह्यातील वडगाव तनपुरे येथील सुभाष तनपुरे प्रगतिशील शेतकरी म्हणून अोळखले जातात. कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावताना फिल्टर टॅंकची निर्मिती व त्या माध्यमातून ड्रिपद्वारे सेंद्रिय द्रवरूप स्लरी पिकांना देण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. मार्केटिंगचे कौशल्य, उद्योजकता, व्यवहारचातुर्य, चिकाटी यांच्या जोरांवर आपल्या संशोधनाला राज्य, परराज्यांत मार्केट मिळवून दिले. त्यातून आपल्या शेतीचे, कुटुंबाचे अर्थकारण उंचावताना राज्य व परराज्यांतील शेतकऱ्यांनाही स्वसंशोधनाचा फायदा मिळवून दिला आहे.  

नगर जिल्ह्यातील कर्जत हा संपूर्णपणे जिरायती तालुका. याच तालुक्यातील वडगाव तनपुरे येथील सुभाष तनपुरे प्रतिकूल परिस्थितीतही शेतीत प्रगती साधण्यासाठी सतत नवे प्रयोग करीत असतात. कधीही स्वस्थ न बसण्याचा यांचा स्वभाव आहे. एकेकाळी सुमारे दोनशे जनावरांचे समृद्ध पशुधन त्यांनी जोपासले. पण पुरेशा मजूरबळाअभावी पशुधन व त्या अनुषंगाने दुग्ध व्यवसाय त्यांना थांबवणे भाग पडले.  

स्वतःमधील संशोधक शोधला 
कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता कल्पक बुद्धीचा वापर करून समस्येवर मार्ग शोधायचा हे जणू तनपुरे यांच्या रक्तातच भिनलेले. पशुधन सांभाळताना शेतीत शेणस्लरीचा वापर नित्याचा झाला होता. त्यातूनच जीवामृत किंवा शेणस्लरी फिल्टर करून ती ड्रिपवाटे (ठिबक) देण्याचे अभिनव तंत्रज्ञान त्यांनी गरजेतून विकसित केले. त्यातून आपल्यातील संशोधक वृत्तीचा प्रत्यय दिला. जाणकारांकडून आपल्या कल्पनेतील फिल्टर टॅंक तयारही करून घेतला. त्याला पृथ्वीराज असे नाव दिले. 

स्वसंशोधानाला बाजारपेठ 
खरंतर शेतकरी संशोधकही असतो. आपल्या बुद्धिकौशल्याचा वापर करून तो विविध तंत्रज्ञान विकसित करीत असतो. मात्र या संशोधनाला पुढे बाजारपेठ मिळणे ही सोपी गोष्ट नसते. एखाद्या कंपनीला आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग करणे सोपे असते. कारण त्यादृष्टीने कर्मचारी व आर्थिक बळ तसेच अन्य यंत्रणा त्या कंपनीजवळ असतात. एकट्या शेतकऱ्याला मात्र या गोष्टी करणे प्रचंड आव्हानाचे असते. तनपुरे यांनी हेच आव्हान पेलले व यशस्वीदेखील केले. 

संशोधनाला पुरस्कार, पेटंट  
    सन २०१२ मध्ये नाबार्डतर्फे घेण्यात आलेल्या ‘रुरल इनोव्हेशन’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तनपुरे यांच्या संशोधनाचा गौरव. तंत्राचे पेटंट घेण्यासाठी तनपुरे यांचा अर्ज प्रक्रियावस्थेत. 

तनपुरे यांच्या कौशल्याच्या बाजू 
    सेंद्रिय वा रेसिड्यू फ्री शेतीतील सध्याची शेतकऱ्यांची गरज अोळखून तसे तंत्रज्ञान सादर केले. 
    आपल्या उत्पादनाचा प्रसार करण्यासाठी दिवस-रात्र, ऊन, पाऊस, थंडी असा काहीही विचार न करता अगदी एसटी बस वा अन्य वाहनांतून सातत्याने प्रवास. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचण्याचा प्रयत्न  
    मार्केटिंग ही खरेच अवघड कला. त्यातून नवी संकल्पना विकायची हे त्याहून अवघड आणि परराज्यांत जिथे भाषा, संस्कृतीच वेगळी अशा अनोखळी भागांत जाऊन मार्केटिंग करायचे अजूनच कठीण. पण तनपुरे यांनी ते साधले.
    स्वतःची कंपनी स्थापन करून व्यापार क्षेत्रात तरबेज असलेल्या दोघांना मार्केटिंगसाठी सोबत घेत भागीदारी केली. 
पृथ्वीराज फिल्टर टॅंक तंत्रज्ञानाचा प्रसार 
    महाराष्ट्र व सुमारे नऊ राज्यांत प्रसार 
    एकूण सुमारे दोन हजार टॅंकची विक्री 

    महाराष्ट्रातील प्रसार - सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक सीमा, पुणे जिल्हा, (नगर), संगमनेर, नाशिक, विदर्भात अमरावती भागात सुमारे ५० युनिट्स 

    अन्य राज्ये - पंजाब, हरियाना, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश. उत्तर प्रदेशातून अलीकडेच आॅर्डर मिळाली.  

    अल्पभूधारक शेतकऱ्यापासून ते मोठे शेतकरी, उद्योजक आदींकडून तंत्राचा वापर  

    या पिकांत वापर - ऊस, पपई, केळी, भाजीपाला, डाळिंब, संत्रा, मोसंबी, पेरू 

    उत्पादनाच्या मार्केटिंगसोबत देशभरातील सेंद्रिय उत्पादकांचे प्रयोग, अनुभव शेअर केले. त्यामुळे ग्राहक अधिक जवळ येण्यास मदत झाली.  

    ग्राहकांना विक्रीपश्चात सेवा. सतत संपर्कात राहून त्यांच्याकडून फीडबॅक घेतला जातो. 

    दीड वर्षापासून डीलर नेटवर्क. सध्या राज्यात पाच डीलर. तर कच्छ (गुजरात), कर्नाटक व आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी १ डीलर. 

परराज्यांतील प्रातिनिधिक उदाहरणे  
    रायचूर येथील नागा रेड्डी यांनी ‘फ्लड इरिगेशन’ पद्धतीत तीन फिल्टर बसवले. सेंद्रिय भात हे उद्दिष्ट ठेऊन सुमारे ४० एकरांत टॅंकद्वारे सेंद्रिय द्रवरूप स्लरी देणे त्यांना शक्य होत आहे.   

    गुजरात राज्यातील प्रगतिशील शेतकरी प्रवीणभाई देसाई यांची पेरू, आंबा, खजूर, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, केळी अशी विविध समृद्ध शेती आहे. त्यांच्याकडे सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण आहे. पाच फिल्टर टॅंक त्यांच्याकडे आहेत.   

    कर्नाटकात बंगळूरनजीक चित्रदुर्ग येथे डॉ. प्रशांत   हे सुपारी व काळी मिरी पिकांत तर हसन जिल्ह्यातील महेशकुमार कॉफी व मिरीत १० ते १५ एकरांत ‘ट्रायल’ म्हणून फिल्टर टॅंकचा प्रयोग करीत आहेत. 

    छत्तीसगडमध्ये सुमारे ७० ते ८० भाजीपाला उत्पादक सुमारे १०० ते १५० फिल्टर टॅंक सेंद्रिय पद्धतीसाठी वापरत अाहेत.

    मध्य प्रदेशातील उज्जैन येथे हॉटेल व्यावसायिकाचे २५ एकर क्षेत्र. अौषधी वनस्पतींच्या शेतात दोन टॅंकचा वापर.  

    राजस्थानातील गंगानगर जिल्ह्यातील उद्योजक राजेश्वरसिंग यांनी सेंद्रिय पद्धतीने गहू, ऊस, भात घेण्याच्या उद्देशाने १८ टॅंक बसवून सेंद्रिय शेतीला चालना दिली आहे.  

    लुधियाना (पंजाब) भागात पॉलिहाउसमधील काकडी, ढोबळी मिरचीसाठीही या तंत्राचा वापर होत आहे. तमिळनाडूत आयटी इंजिनिअर श्रीधर चौधरी यांचे ३० एकर पॉलिहाउस आहे. निर्यातक्षम गुलाबाला ते चार टॅंकद्वारे सेंद्रिय स्लरी देत आहेत. 

शेतकरी असल्याचा झाला फायदा 
तनपुरे म्हणाले की एकेक टॅंक विकताना संघर्ष करावा लागला. मुळात शेणस्लरी फिल्टर होऊन पूर्ण द्रवरूप स्थितीत ड्रिपमधून बागेला देता येते हेच अनेक शेतकऱ्यांना पटवून देण्यात संयमाची कसोटी लागली. स्वतः शेतकरी असल्याने शेतीतील प्रॅक्टिकल समस्या मला माहीत असायच्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या, गरजा सोडवणे अवघड गेले नाही. काही शेतकरी विचारायचे, की ड्रिपमध्ये स्लरी चोकअप होत नाही याची गॅरंटी काय? तेव्हा त्यांना सांगायचो, की तसे झाल्यास संपूर्ण ड्रिप यंत्रणा नवी बसवून देऊ. हा विश्वास ग्राहकांना देता यायला हवा. त्यासाठी तुमचे तंत्रज्ञान शंभर टक्के परफेक्ट हवे, असे तनपुरे म्हणाले.

कृषी प्रदर्शनांचा प्रभावी वापर
महाराष्ट्रासह बंगळूर, धारवाड, बागलकोट, बेळगाव, नागपूर, गुजरात आदी ठिकाणी मिळून सुमारे २० ते २२ प्रदर्शनांतून भाग घेतला. त्याद्वारे विक्री ही महत्त्वाची बाब नव्हती. तर शेणस्लरी ड्रिपमधून देणे शक्य आहे व त्यासाठीचे तंत्रज्ञान एका शेतकऱ्याने तयार केले आहे, याचा प्रसार करता आला हीच माझ्यासाठी महत्त्वाची बाब होती. त्या वेळी तयार केलेल्या संपर्कातून पुढे ग्राहक तयार होण्यास मदत मिळाल्याचे तनपुरे म्हणाले.  

ॲग्रोवनमुळे प्रसाराला चालना
तनपुरे यांच्या प्रयोगाची यशकथा ॲग्रोवनमध्ये मार्च २०१४ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर राज्यभरातून शेतकरी त्यांना संपर्क करू लागले. नाशिक येथे ॲग्रोवनने हार्टिकल्चर प्रदर्शन भरविले होते. त्या वेळी संशोधक शेतकऱ्याचे तंत्रज्ञान म्हणून विनामूल्य स्टाॅल उपलब्ध झाला. त्याचाही मोठा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. 

तंत्रज्ञान प्रसारातील कष्ट, कौशल्ये  
    ''वेबसाईट’ तयार करून आपले तंत्रज्ञान जगभरात पोचवले. त्या माध्यमातून परराज्यांतील शेतकरीही संपर्क साधू लागले. 

    शेतकऱ्यांकडून टॅंकची विचारणा आली की त्याचे गाव कोठेही असो, मग तनपुरे ऊन, वारा, पाऊस, थंडी, रात्र, दिवस यांचा विचार न करता त्यांच्यापर्यंत एसटी किंवा अन्य वाहनांतून पोचायचे. 

    त्यांना संपूर्ण तंत्रज्ञान समजावून द्यायचे. प्रवासात प्रसंगी बस स्टॅंडवर झोपूनही रात्री काढल्या. 

    टॅंकसाठी संशोधन व विकास (आर ॲँड डी) व विक्री यासाठी भूक-तहान विसरून सुरवातीची काही वर्षे न मोजण्याइतकी भ्रमंती केली.  

    आजच्या जमान्यात सर्वांत लोकप्रिय ‘यू ट्यूब’वरही तंत्रज्ञान वापराचा व्हिडिअो अपलोड केला. त्यातूनही ग्राहक संपर्क साधू लागले. जर्मनी, आॅस्ट्रेलिया, आखाती देशांत वास्तव्यास तीन भारतीयांनी (महाराष्ट्र, अोरिसा, विशाखापट्टणम) संपर्क करून टॅंक खरेदी केले. त्यांच्या शेतात टॅंक बसवून प्रात्यक्षिक देण्यापर्यंत काम साधले.

    व्हॉटसॲपसारख्या हुकमी तंत्रज्ञानाद्वारेही मार्केटिंग 

    गेल्या दोन वर्षांत फिल्टर टॅंक मार्केटिंगसाठी महाराष्ट्रासह विविध राज्ये पालथी घालताना तब्बल दीड ते दोन लाख किलोमीटरचा प्रवास केला.

    परराज्यात एका शेतकऱ्याकडे युनीट बसले, त्याला शेतात अनुकूल परिणाम दिसू लागले की परिसरात त्याची माऊथ पब्लिसिटी सुरू व्हायची. मग या शेतकऱ्याचा धागा पकडत त्या राज्यातील अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याची धडपड सुरू व्हायची.

    पराज्यातील काही शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतात नेऊन टॅंक, स्लरी व त्याचे पिकांवरील परिणाम प्रत्यक्ष दाखवले. त्यातून त्यांची तंत्राविषयीची खात्री पटविली.   
 सुभाष तनपुरे, ९४२३७५२५१७


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon news farmer technology market