ग्रामविकासामध्ये मिळाली ‘लुपिन`ची साथ

 गणेश काेरे
रविवार, 30 जुलै 2017

ग्रामीण भागाच्या एकात्मिक विकासासाठी लुपिन फाउंडेशनच्या वतीने कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालविकास, आराेग्य, राेजगार, शिक्षण आणि पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांत काम सुरू आहे. या माध्यमातून राज्यातील अनेक गावांना विकासाची दिशा मिळाली आहे.

लुपिन उद्याेग समूहाचे अध्यक्ष डॉ. देशबंधू गुप्ता यांनी २ आॅक्टाेबर १९८८ मध्ये लुपिन ह्युमन वेलफेअर ॲण्ड रीसर्च फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. फाउंडेशच्या माध्यमातून शाश्‍वत ग्रामविकासाचे कार्य हाती घेतले. फाउंडेशनच्या वतीने नऊ राज्यांतील ३,३०० खेड्यांमध्ये तर २००० सालापासून महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये फाउंडेशनचे राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब बडे यांच्या मार्गदर्शनाखाली १,४०२ दुर्गम गावांमध्ये विकासाची विविध कामे सुरू आहेत. या गावांमध्ये पुणे जिल्ह्यातील ५२ गावांचा समावेश आहे. 

शाश्‍वत सिंचन सुविधांसाठी प्रयत्न 
आदिवासी शेतकऱ्यांना शाश्‍वत सिंचनाच्या साेयीसाठी पुणे जिल्ह्यातील पाच गावांमध्ये छाेट्या क्षमतेच्या अकरा उपसा सिंचन याेजना उभारण्यात आल्या. या प्रकल्पामुळे केवळ भात पिकेच घेणारे शेतकरी आता भाजीपाला लागवड करू लागले आहेत. माणिकडाेह धरणातून उपसा सिंचन याेजना सुरू आहे. पाच-सहा शेतकऱ्यांसाठी एक उपसा सिंचन याेजना राबविण्यात आली. या याेजनेमुळे ६० शेतकऱ्यांना लाभ झाला असून २५० एकर क्षेत्र सिंचनाखाली आले. यातील ६० एकर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे.

सोळा गावांमध्ये २ ते ३ शेतकऱ्यांचा गट करून संस्थेने ८१ विद्युत पंपाचे वाटप केले. या शेतकऱ्यांनी श्रमदानाने पाइपलाइन करून सिंचनाच्या सुविधा तयार केल्या. याचा फायदा १६२ शेतकऱ्यांना झाला असून, सुमारे ४०५ एकर क्षेत्र आेलिताखाली आले. सुमारे १६२ एकर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली. संस्थेच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील दहा आदिवासी गावांच्यामध्ये २१ गट विहिरी झाल्या आहेत. याचा शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनासाठी फायदा झाला.                                              

फळबाग लागवडीसाठी वाडी प्रकल्प 
नाबार्डच्या सहकार्याने २००९ आणि २०१४ या दाेन टप्प्यांमध्ये वाडी प्रकल्प राबविण्यात आला. पहिल्या टप्प्यासाठी ३ काेटी ७१ लाख २७ हजार तर दुसऱ्या टप्प्यासाठी २ काेटी ४४ लाख ८३ हजार रुपयांचा निधी मिळाला. या निधीमधील ७० टक्के हिस्सा नाबार्ड, तर ३० टक्के लुपिनचा हाेता. या प्रकल्पाच्या दाेन टप्प्यांमध्ये १,५०० एकरांवर फळबाग लागवड करण्यात आली. यामध्ये आंबा, काजू, पेरू आदी फळझाडांचा समावेश आहे. संस्थेने विविध गावांमध्ये वनीकरण मोहिम राबविली आहे.

 राेजगारनिर्मितीस चालना 
राेजगाराअभावी शहरात हाेणारे स्थलांतर राेखण्यासाठी ग्रामीण भागात राेजगारनिर्मितीसाठी फाउंडेशनच्या वतीने विविध प्रकल्प राबविले जातात. यामध्ये मुलींना नर्सिंग, फॅशन डिझायनिंग, शिवणकला, ब्युटी पार्लर, संगणक प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम राबविले जातात. या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थींना व्यवसाय कर्ज मिळवून स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी सहकार्य केले  जाते.

पाच शेतकरी उत्पादक कंपन्यांची सुरवात 
फाउंडेशनने नाबार्डच्या सहकार्याने राज्यात पाच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या. यामध्ये पुणे जिल्ह्यात मढ (ता.जुन्नर) येथे माळशेज शेतकरी उत्पादक कंपनीचा समावेश आहे. कंपनीचे ५०० सभासद असून, यामधील ९० टक्के सभासद आदिवासी आहेत. गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला कंपनीच्या वतीने कृषी सेवा केंद्र सुरू केले. मार्च, २०१७ अखेर या सेवा केंद्राने ५५ लाख रुपयांची उलाढाल केली. या उलाढालीतून कंपनीला ४ लाख २० हजार रुपयांचा नफा झाला.

महिला बचत गटातून आर्थिक विकास  
महिलांना आर्थिक स्वंयपूर्ण बनविण्यासाठी फाउंडेशनच्या वतीने ४०० बचत गट स्थापन करण्यात आले. यामध्ये जुन्नर तालुक्यात १३० आणि मुळशी तालुक्यात २७० बचत गट आहेत. गटांना व्यवसायासाठी नाबार्डच्या नॅफिन्स या पतपुरवठा सेवेद्वारे २०१६-१७ या वर्षात १ काेटी ७० लाखांचा कर्ज पुरवठा झाला. या कर्जाच्या परताव्याची हमी लुपिन फाउंडेशनने घेतली. तसेच खासगी बॅंकांद्वारे बचत गटांनी अर्थसाहाय्य मिळावे यासाठी देखील फाउंडेशनचे प्रयत्न आहेत. मुळशी येथील कुलस्वामिनी महिला बचत गटाला २५ हजार रुपयांपासून सहा वेळा कर्ज पुरवठा केला. त्यांची आता ५० लाखांपर्यंत उलाढाल वाढली आहे. या कर्जातून चार महिलांनी हाॅटेल, पॉलिहाऊस आणि चहा नाष्ट्यासाठीची हातगाडी व्यवसाय सुरू केला. गाेपालबुवा महिला बचत गटाला (रिहे, पडळवाडी, ता.मुळशी) २००९ पासून पुणे जिल्हा सहकारी बॅंक, आयसीआयसीआय आणि नाबार्डकडून विविध टप्प्यांवर सुमारे साडेतीन लाखांचा कर्ज पुरवठा करण्यात आला. यातून काही महिलांनी पशुपालन सुरू केले आहे.

महिलांना शेळी, कोंबडी, म्हैसवाटप 
पतीच्या अकाली निधनानंतर लहान मुले असणाऱ्या भूमिहीन विधवा महिलांच्या चरितार्थासाठी फाउंडेशनच्या वतीने शेळी, कोंबड्यांच्या बराेबरच म्हशींचे वाटप करण्यात येते. यामध्ये प्रत्येक महिलेला चार शेळ्यांचे वाटप करण्यात आले. हे वाटप करत असताना २५ हजार रुपये फाउंडेशन आणि नाबार्डच्या वतीने, तर ५ हजार रुपये लाभार्थ्यांने द्यावयाचे असतात. शेळी व्यवसायातून आठ महिन्यांमध्ये उत्पन्न सुरु हाेऊन कुटुंबाचा चरितार्थ चालू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या उपक्रमाचा २४ गावांतील ५५ महिलांना लाभ झाला आहे.  

Web Title: agrowon news gramvikas