द्राक्ष बागेत पावसाळी वातावरणामध्ये करावयाचे व्यवस्थापन

डॉ. आर. जी. सोमकुंवर
रविवार, 18 जून 2017

द्राक्ष बागेमध्ये गेल्या काही दिवसांपासून बऱ्यापैकी पाऊस झाला असून, काही ठिकाणी पावसाळी वातावरण तयार झाले आहे. अशा स्थितीमध्ये तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस व आर्द्रता ८० ते १०० टक्के दिसून येईल. या परिस्थितीमध्ये बागेतील व्यवस्थापनाची माहिती घेऊ.

द्राक्ष बागेमध्ये गेल्या काही दिवसांपासून बऱ्यापैकी पाऊस झाला असून, काही ठिकाणी पावसाळी वातावरण तयार झाले आहे. अशा स्थितीमध्ये तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस व आर्द्रता ८० ते १०० टक्के दिसून येईल. या परिस्थितीमध्ये बागेतील व्यवस्थापनाची माहिती घेऊ.

नवीन बागेतील व्यवस्थापन
या बागेतील ओलांडा तयार होत असून, त्यावर काही फळकाड्यासुद्धा तयार झाल्या असतील. या वेळी बागेत कमी झालेले तापमान व वाढलेली आर्द्रता यामुळे शेंडा वाढीकरिता पोषक वातावरण असेल. अशा स्थितीमध्ये काडीवरील बगलफुटीसुद्धा जास्त जोमाने वाढतील. यामुळे कॅनॉपी गर्दी होऊन सूर्यप्रकाश सर्व पानांपर्यंत पोचत नाही. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे पाने पिवळी पाडून गळून पडू लागली. नवीन बागेमध्ये फळकाडी तयार करताना वाढत असलेल्या सर्व प्रकारच्या फुटी तशाच राखण्याचा प्रयत्न करतो. काड्यांची गर्दी होऊन काडीच्या डोळ्यावर सूर्यप्रकाश पडत नाही. परिणामी, काडीमध्ये गर्भधारणा कमी प्रमाणात होते. अशी काडी हिरवी राहते. अशा काड्या फळकाढणीच्या वेळी पूर्णपणे काढून टाकाव्या लागतात. 

या गोष्टीचा विचार केल्यास बागेमध्ये खालील उपाययोजना महत्त्वाच्या असतील.
शेंडा पिंचिंग करून वाढ नियंत्रणात ठेवणे.

बगलफुटी काढून टाकणे - या पावसामुळे काही परिस्थितीमध्ये तळापासून ते शेंड्यापर्यंत बगलफुटी निघताना दिसतील. घडनिर्मितीकरिता सूर्यप्रकाश आवश्यक आहे. त्यामुळे काडीवरील डोळा पूर्णपणे उघडा राहील व त्यावर सूर्यप्रकास पडेल अशा प्रकारे बगलफुटी काढाव्यात. सबकेन केल्यांतर आवश्यक त्या १ किंवा २ बगलफुटी राखून अन्य फुटी काढाव्यात. 

०-५२-३४ या विद्राव्य खताची ३ ते ४ ग्रॅण प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. 

ज्या बागेमध्ये काडी तळापासून दुधाळ दिसते, अशा ठिकाणी ०.५ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी सुरू करावी. 

जुन्या बागेतील व्यवस्थापन - 
या बागेत काही ठिकाणी घडनिर्मितीची अवस्था शेवटच्या टप्प्यात असेल, तर काही बागेत काडी परिपक्वतेच्या कालावधी सुरू झालेला असेल. या दोन्ही अवस्थेत नुकताच झालेला पाऊस हानिकारक असेल. घडनिर्मितीच्या शेवटच्या टप्प्यातील या पावसामुळे गर्भधारणा होण्यावर विपरीत परिणाम होतील. कारण घडनिर्मिती व्यवस्थित होण्यासाठी बागेत फुटीची वाढ नियंत्रणात असणे आवश्यक आहे. दुसऱ्या परिस्थितीमध्ये पावसामुळे वेलीतील जिबरेलिन्सचे प्रमाण वाढून शेंडावाढ जोमात होईल आणि काडीची परिपक्वता लांबणीवर जाईल. 

या करिता खालील उपाययोजना महत्त्वाच्या असतील. 
शेंडापिंचिंग करणे - यामुळे वाढ नियंत्रणात राहील व काडीची परिपक्वता सुरू होईल. 

वेलीस ०-०-५० ची ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे ३-४ अंतराने २-३ फवारणी करणे.

काडीवरील बगलफुटी काढून टाकणे.

काडीच्या पक्वतेनुसार बोर्डो मिश्रणाची ०.७५ ते एक टक्का या प्रमाणे फवारणी करणे. 

काडीच्या तळातील २-३ पाने कमी करणे - यामुळे ओलांड्यावर आर्द्रता कमी राहील. ओलांड्यावर साल जुनी झालेली असल्यास, ती पावसाचे पाणी धरून ठेवते. परिणामी, आर्द्रतेचे प्रमाण वाढून रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. 

- डॉ. आर. जी. सोमकुंवर, ०२०- २५९५६०६०
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

रोग व्यवस्थापन 

नव्या व जुन्या अशा दोन्ही द्राक्ष बागांमध्ये कॅनॉपी दाट झालेली असल्यास रोगनियंत्रण करणे कठीण होते. फवारणीचे द्रावण कॅनॉपीच्या शेवटच्या टोकांपर्यंत पोचत नाही. परिणामी, रोगाचे प्रभावीपणे नियंत्रण होण्यामध्ये अडचणी येतात. 

सध्याच्या परिस्थितीचा विचार करता बागेत १०० टक्के आर्द्रता दिसून येईल. या वेळी जमिनीमध्ये सुद्धा मातीच्या कणांमध्ये पाणी साचलेले असेल. या परिस्थितीमध्ये रोगनियंत्रणासाठी जैविक घटकांचा वापर फायद्याचा ठरू शकतो. सध्या द्राक्ष बागेमध्ये डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू यांसारखे रोग व मिली बग यांचा प्रादुर्भाव दिसून येईल. त्यासाठी ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, व्हर्टिसिलियम यांसारख्या जैविक नियंत्रक घटकांचा वाढ आर्द्रतायुक्त वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे होते. विशेषतः अधिक कॅनॉपीमुळे फवारणीचे द्रावण पोचू न शकलेल्या भागामध्येही त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊन रोगनियंत्रणास मदत होईल. कीडनाशकांच्या वापरामुळे जैविक घटकांवर विपरीत परिणाम होत असला, तरी अंतर्गत भागामध्ये त्यांची पोच नसल्याने जैविक घटकांची वाढ होईल.

शिफारशीनुसार योग्य त्या जैविक घटकांच्या ५ मिलि किंवा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे २-३ फवारण्या कराव्यात. या प्रमाणे जमिनीमध्येही ड्रेचिंग केल्यास बुरशीनाशकांचा खर्च कमी करता येईल. परिणामी, रेसिड्यूचे प्रमाण शून्यावर आणणे सोपे होईल.

Web Title: agrowon news grapes management in rainy environment