दुग्धव्यवसाय ठरला कुटुंबाचा आर्थिक कणा

  अनिल देशपांडे
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

नगर जिल्ह्यातील गुहा या कोरडवाहू गावात किरण कोळसे पाटील यांनी ३० एकर शेतीपेक्षा ५० गायींचा दुग्धव्यवसाय आर्थिकदृष्ट्या अधिक सरस ठरवला आहे. घरच्या सर्वांचा सहभाग, मुक्त गोठा, पाणी, चाऱ्याची शाश्वशता व दुधाचा दर्जा या सर्वांमधून त्यांनी व्यवसायाचा विस्तार करीत प्रापंचिक स्थैर्यही गाठले आहे.

नगर जिल्ह्यातील गुहा या कोरडवाहू गावात किरण कोळसे पाटील यांनी ३० एकर शेतीपेक्षा ५० गायींचा दुग्धव्यवसाय आर्थिकदृष्ट्या अधिक सरस ठरवला आहे. घरच्या सर्वांचा सहभाग, मुक्त गोठा, पाणी, चाऱ्याची शाश्वशता व दुधाचा दर्जा या सर्वांमधून त्यांनी व्यवसायाचा विस्तार करीत प्रापंचिक स्थैर्यही गाठले आहे.

राहुरी तालुक्यातील गुहा (जि. नगर) गाव परिसर कोरडवाहू भाग. गावात किरण कोळसे- पाटील यांची ३० एकर शेती आहे. त्यांचे वडील साखर कारखान्याला भुस्सा पुरवण्याचे कंत्राट घेत. किरण यांनीही काही काळ व्यवसाय सुरू ठेवला. पुढे मजुरांची समस्या जाणवू लागली. कारखान्याकडून पेमेंट वेळेवर मिळत नसे. अखेर व्यवसाय थांबवावा लागला. दुसरीकडे शेतात कांदा, ऊस अशी पिके होती. पण समाधानकारक दर मिळत नसल्याने त्यातूनही भरीव काही हाती लागत नव्हते. 

दुग्धव्यवसायाचा आधार 
मित्र बबन कोळसे यांच्या डेअरीपासून दुग्धव्यवसायाची प्रेरणा मिळाली. संपूर्ण अभ्यास केला. त्यातून व्यवसायात उतरायचे ठरवले. 

असे केले प्रयत्न 
पाण्याचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले. तीन किलोमीटरवरून कॅनोलचे पाणी आणले. सायफन पद्धतीचा वापर केला. 
टप्प्याटप्प्याने गाय खरेदी केली. एका डेअरीने बिना व्याज कर्ज उपलब्ध केले. पहिल्या कर्ज प्रकरणातून चार व नंतरच्या कर्जातून तीन गायी घेतल्या. सर्व स्थानिक शेतकऱ्यांकडून खात्रीच्या म्हणूनच घेतल्या. 

व्यवसायातील मुख्य बाबी 
मुक्त गोठा शंभर बाय एकशे दहा फूट आकाराचा. घरातील साहित्याचा वापर केल्याने खर्च केवळ १५ हजार रुपये आला. मुक्त वावरण्याने गायींचे आरोग्य सुधारले आहे. त्यावरील खर्च कमी झाला. 
आठ दिवसांतून एकदा गायी धुतल्या जातात. दररोज पाणीही शिंपडले जाते. सत्तर बाय सत्तर फूट आकाराची दोन शेडस. उन्हाचा त्रास होतो तेव्हा गायी शेडमध्ये बसतात. तापमान नियंत्रित राहावे, यासाठी फाॅगर्स. शेडमध्ये ३० ते ३५ गायी बसू शकतात. 
गोठ्यात खाली मुरुम. तीस हजार लिटरची पाण्याची टाकी. 
किरण सांगतात की हा पारंपरिक व्यवसाय नसल्याने कोणालाही धारा काढता येत नव्हत्या. आज मिल्कींग मशीनद्वारे दीड तासात पस्तीस ते चाळीस गायींचे दूध काढून पूर्ण होते.
पहाटे चार वाजता दिवस सुरू. सकाळी सात वाजेपर्यंत कामे आटोपतात. संध्याकाळी चारनंतर पुन्हा काम सुरू. मधला वेळ शेतीसाठी (डाळिंब व ऊस) देणे शक्य होते.   
सत्तर टक्के चारा ओला तर तीस टक्के कोरडा दिला जातो. उसाचा वापर नाही. त्या एैवजी ज्वारी, बाजरी, कडधान्य, गहू व मका. 
दोन वर्षांत मिळून १४० ट्रेलर शेणखत मिळाले. स्वतःच्या शेतीतच वापर केला.  
पाच एकरांतील भगवा डाळिंबात गोमूत्राचा उपयोग महत्त्वाचा ठरला. भविष्यात शेणाची तसेच गोमूत्राची विक्री करण्याचे नियोजन. 

चुलतभावाने धीर दिला 
सन २०१६ मध्ये गोठ्यात १५ गायी असताना बुरशीजन्य मका त्यांच्या खाण्यात आला. विषबाधा होत तीन गायी दगावल्या. त्या वेळी किरण यांनी गोठा बंद करण्याचा निर्णय घेतला. डॉ. संदीप पाठीशी उभे राहिले. त्यांच्यामुळेच निर्णय बदलला. प्रत्येक गायीचे नोंदवहीत रेकॉर्ड  ठेवले जाते. गायींना आजपर्यंत एकदाही सलाईन दिलेले नाही. विषबाधा प्रकरणाने आम्हाला धडा दिला. त्यानंतर प्रत्येक गायीस चाळीस हजार रुपयांचे साडेसातशे रुपयांच्या वार्षिक हप्त्याद्वारे विमा संरक्षण दिल्याचे किरण म्हणाले. 

दुष्काळातही व्यवस्थापन  
सन २०१५-१६ मध्ये दुष्काळात कालव्याची आवर्तने अपेक्षेनुसार मिळाली नाहीत. शेततळे कोरडेठाक पडले. चारा बिल्कूल नव्हता. एक एकर वाळून गेला होता. दुधाचे सगळे पैसे चाऱ्यातच जात होते. चार हजार रुपये प्रति टन उसाचा दर होता. नारायणगावला पॉपकाॅर्नसाठी मका पिकतो. त्याचा शोध लागला. तेथून हिरवा मका दोन हजार रुपये प्रति गुंठा दराने आणला. उसापेक्षा तो स्वस्त पडला. सहा महिने त्यावरच गरज भागली. बाभळेश्वर (जि. नगर) येथे हायड्रोपोनीक चारा निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर घरातच दररोज २० ते २५ ट्रे उत्पादन घेतले. त्यातून पूरक खाद्याची सोय केली. प्रसार-मूरघास, दुग्धव्यवसाय पाहण्यासाठी अनेक शेतकरी मोठ्या संख्येने येतात. नाबार्डचे अधिकारी शैलेश नवाल यांनीही भेट दिली आहे.  

यशाला कारणीभूत बाबी 
घरच्या पाच सदस्यांचे श्रम- किरण यांच्यासह मुलगा कार्तिक, भाऊ दीपक, पुतणे मयूर व अभिजित व सालगडी प्रदीप हे राबतात. त्यातून मजूरटंचाईचा प्रश्न सोडवला. 
मुबलक चारा- ३० एकरांपैकी १५ एकरांत मका, गिनीची लागवड. वर्षभर उत्पादन.  
पाणी शाश्वतता- दीड एकरात शेततळे घेतले. त्यासाठी खासगी बॅंकेचे कर्ज घेतले. दीड कोटी लिटर पाण्याची तजवीज झाली. त्यातून चाऱ्याचे संपूर्ण क्षेत्र वर्षभर ओलिताखाली. 
मुरघास- दीडशे बॅग्ज ( दीडशे टन) चारानिर्मिती. तो सुमारे १५० ते २०० दिवस पुरतो. 
गोठ्यातच पैदास - ५० पैकी सुमारे २४ ते २५ जनावरे गोठ्यातच पैदास केली. त्यांच्या     खरेदीवरील खर्च वाचवला. 
 यांत्रिकता- मिल्कींग मशीन, भरडा काढण्याचे यंत्र, फाॅगर्स, वाहतुकीसाठी वाहन     आदींच्या वापरातून श्रम व वेळेची बचत. बाहेरून धान्य भरडून घेण्याचा खर्च वाचला.
घरचाच डॉक्टर - गावातच राहणारे पशुवैद्यक अधिकारी डॉ. संदीप कोळसे आरोग्य, खाद्य व लसीकरण याविषयी मार्गदर्शन करतात. त्यामुळे खात्रीशीर सल्ला मिळतो.  

आजची परिस्थिती 
लहान मोठी धरून जनावरे - ५० (होल्स्टिन फ्रिजीयन) 
दररोजचे दूध संकलन- (वर्षभराचे)- २५० ते ३०० लिटर
खासगी दूध व्यावसायिक कंपनीला लिटरला २७ ते २९ रुपये 
दराने विक्री 

झालेले साध्य 
आज कोळसे यांनी दुग्धव्यवसायात स्थिरता मिळवली आहे. शेतीपेक्षा दुग्ध हाच मुख्य व्यवसाय झाला आहे. 
याच व्यवसायातून कर्जाची परतफेड करणे शक्य झाले. तीन लाखांचे पहिले कर्ज सात महिन्यांतच फेडता आले. 
सुरवातीला जेमतेम २५, ७० लिटर दूध संकलित व्हायचे. आज तिपटीहून अधिक वाढ झाली आहे.

किरण कोळसे-पाटील, ९९२१३५६६९६

Web Title: agrowon news milk agriculture