पपईपासून बनवा पेपेन, पेक्टिनसह मूल्यवर्धित उत्पादने 

डॉ. आर. टी. पाटील
सोमवार, 12 जून 2017

पपईतील काढणीपश्चात प्रक्रियेसाठी काढणी  करताना योग्य पक्वतेची फळे काढणे आवश्यक असते. त्यासाठी प्रथम पपईच्या पक्वतेच्या  लक्षणांविषयी माहिती घेऊ.

फळाच्या सालीच्या रंगावरून पपईची पक्वता ठरवली जाते. गडद हिरव्या रंगापासून फिक्कट हिरवा रंग होत असताना सुमारे ६ टक्के रंग पिवळा झाल्यानंतर ते फळ काढणीयोग्य झाल्याचे मानले जाते. त्यातही बाजारपेठेच्या अंतरानुसार पिवळ्या रंगाचे प्रमाण ठरवले जाते. उदा. दूरवरच्या अंतरावरील बाजारपेठेसाठी एक चतुर्थांश पिवळा रंग असताना, तर जवळच्या किंवा स्थानिक बाजारपेठेसाठी अर्धा किंवा तीन चतुर्थांश फळ पिवळे झाल्यानंतर त्याची काढणी करावी. 

पपईतील काढणीपश्चात प्रक्रियेसाठी काढणी  करताना योग्य पक्वतेची फळे काढणे आवश्यक असते. त्यासाठी प्रथम पपईच्या पक्वतेच्या  लक्षणांविषयी माहिती घेऊ.

फळाच्या सालीच्या रंगावरून पपईची पक्वता ठरवली जाते. गडद हिरव्या रंगापासून फिक्कट हिरवा रंग होत असताना सुमारे ६ टक्के रंग पिवळा झाल्यानंतर ते फळ काढणीयोग्य झाल्याचे मानले जाते. त्यातही बाजारपेठेच्या अंतरानुसार पिवळ्या रंगाचे प्रमाण ठरवले जाते. उदा. दूरवरच्या अंतरावरील बाजारपेठेसाठी एक चतुर्थांश पिवळा रंग असताना, तर जवळच्या किंवा स्थानिक बाजारपेठेसाठी अर्धा किंवा तीन चतुर्थांश फळ पिवळे झाल्यानंतर त्याची काढणी करावी. 

चिकाची घनताही दुधाप्रमाणे न राहता पाण्याप्रमाणे पातळ झाल्यानंतर फळ काढणीसाठी तयार झाल्याचे ओळखतात. मात्र, फळांच्या सालीवर नख लावणे किंवा इजा करण्याचे प्रकार टाळावेत. 

फळ काढण्यासाठी धारदार चाकूचा वापर करावा. दांड्यासह कापलेल्या फळाचा दांडा नंतर फळापर्यंत कापून घ्यावा. 

अलीकडे फळ काढणीसाठी बांबूवर लावलेले रबर सक्शन कप उपलब्ध झाले आहेत. हे कप फळाच्या खाली येतील अशा प्रकारे धरावे. त्यानंतर बांबूच्या साह्याने दांडा कापावा. दांड्यातून गळणाऱ्या चिकामुळे काढणाऱ्या व्यक्तींच्या त्वचेचा दाह होऊ शकतो. त्यामुळे काढणीच्या वेळी योग्य त्या प्रकारचे हातमोजे आणि प्रतिबंधात्मक कपडे यांचा वापर करावा. 

काढणीनंतर येणारे रोग : 
काढणीनंतर फळावर ॲन्थ्राक्नोज, स्टेमएन्ड रॉट, फ्रुट रॉट आणि फायप्टोप्थोरो स्टेम एन्ड रॉट इ. रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यासाठी योग्य काळजी घ्यावी.

प्रतवारी आणि स्वच्छता
काढलेली फळे स्वच्छ धुवून, त्यांची आकारमान व रंगानुसार प्रतवारी करावी. खराब फळे काढून टाकावीत. 
योग्य आकारमानामुळे कन्व्हेअर प्रकारच्या यंत्रामध्ये पुढील प्रक्रिया सोपी होते. काढणीनंतर काही काळ थंड वातावरणामध्ये (प्री कुलींग) फळे ठेवल्यास ती अधिक काळ टिकतात. 
 जवळच्या बाजारपेठेतील विक्रीसाठी फळे पिकवताना, काडावर किंवा भुश्श्यावर एका थरामध्ये ठेवावीत. 
दूरच्या अंतरावर फळे पाठवताना वाहतुकीमध्ये घासून इजा होऊ नये, यासाठी वर्तमान पत्रे किंवा टिश्यु पेपरने गुंडाळावीत. फळे शक्यतो एक थराच्या आणि फळामध्ये कुशन असलेल्या बॉक्समध्ये पाठवावीत. 

पपईची साठवण 
योग्य पक्वता आल्यानंतर २० अंश सेल्सिअस तापमानामध्ये फळे दोन आठवड्यांपर्यंत साठवता येतात. 
१२ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानामध्ये फळांना इजा होतात. पक्व हिरव्या पपया ह्या शीतकरणासाठी अधिक संवेदनशील असतात. मात्र, ५० टक्के व त्यापेक्षा अधिक पिवळ्या पपया ४ ते १२ अंश सेल्सिअस तापमानामध्ये साठवता येतात. त्यांना शीतकरणाची इजा फारशी होत नाही. 
३० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानामध्ये अधिक उष्णतेमुळे पपयांना इजा होते. 
पपईच्या साठवणीसाठी आदर्श तापमान हे १३ ते १६ अंश सेल्सिअस मानले जाते. 
तीन चतुर्थांश पिकलेल्या अवस्थेत काढणी केलेली असल्यास फळे १० अंश सेल्सिअस तापमानामध्ये २१ दिवसांपर्यंत साठवता येतात. 
पपईपासूनची मूल्यवर्धित उत्पादने
पपई गर
पूर्ण पक्व आणि पिकलेल्या पपईपासून गर वेगळा केला जातो. तसेच त्यापासून त्वरित तयार करता येणारी पेये बनवता येतात. त्यासाठी पूर्ण पक्व फळे काढल्यानंतर स्वच्छ केली जातात. त्यांची साल काढून यांत्रिक फ्रूट क्रशर किंवा घरगुती मिक्सरद्वारे गर बारीक करून घेतला जातो. चाळणीतून गाळून घेत त्यातील तंतूमय पदार्थ वेगळे काढले जातात. या ताज्या गराचा वापर विविध पदार्थांच्या निर्मिती साठी केला जातो. हा गर अधिक काळ टिकवण्यासाठी त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करणे किंवा गोठवणे किंवा कॅनिंग करणे या प्रक्रिया केल्या जातात. 

पेपेन
भारतामध्ये पेपेन निर्मितीसाठी CO-2 आणि CO-6 या दोन जाती शिफारशीत आहेत. 
पेपेन काढण्यासाठी अर्ध पक्व फळे (९० ते १०० दिवसांच्या कालावधीतील) निवडली जातात. 
 फळांच्या चारही बाजूने खालून वरपर्यंत बांबूला लावलेल्या धारदार चाकू किंवा खास अवजाराद्वारे ०.३ सेमी खोल रेषा मारल्या जातात. ही क्रिया सकाळी ९ वाजण्याच्या आत केली जाते. त्यातून बाहेर पडणारा चिक हा काचेच्या भांड्यामध्ये किंवा अॅल्युमिनिअमच्या ट्रेमध्ये गोळा केला जातो. तीन ते चार दिवसांच्या अंतराने अशाच खोल रेषा फळांवर अन्य ठिकाणी तीन वेळा मारल्या जातात. 
गोळा झालेला चिक हा पंधरा मिनिटांमध्ये घट्ट होतो. 
 या चिकाचा साठवण कालावधी वाढण्यासाठी चिक द्रवरूप अवस्थेमध्ये असताना त्यात ०.०५ टक्के पोटॅशिअम मेटा बायसल्फेट मिसळावे. 
 साधारण ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानामध्ये स्प्रे ड्राईंग किंवा सूर्यप्रकाशामध्ये हे द्रवरूप चिक वाळवावा. 
वाळवलेल्या चिकापासून पावडर तयार करून १० मेश जाडीच्या चाळणीतून गाळून घ्यावी. 
भुकटीच्या स्वरुपामध्ये असलेल्या पेपेनची साठवण पॉलिईथीलीन पिशव्यामध्ये किंवा हवाबंद अशा काचेच्या भांड्यामध्ये करावी. 
१० अंश सेल्सिअस तापमानामध्ये ही भुकटी सहा महिन्यांपर्यंत टिकू शकते. 
पेपेन निर्मितीसाठी व्हॅक्युम सेल्फ ड्रायर, डिह्युमिडीफायर, हॅमर मिल, ब्लेंडर आणि प्रयोगशाळेतील उपकरणे आवश्यक असतात. त्यामध्ये काचेची भांडी, वजनकाटा, हवाबंद करणारे यंत्र, शीतकरण यंत्र यांचा समावेश होतो. 
२० किलो प्रति दिन पेपेन निर्मिती उद्योगासाठी ५० वर्गमीटरची इमारत आवश्यक असून, प्रकल्पाची किंमत १५ लाखांपर्यंत जाते. मनुष्यबळ चार जण, ८ किलोवॉट वीज आणि दोन हजार लिटर पाणी या प्रकल्पासाठी आवश्यक आहे. 

पेक्टिन निर्मिती
 कच्ची हिरवी फळे किंवा चिक काढल्यानंतर राहणारी फळे ही पेक्टिन निर्मितीसाठी वापरता येतात. हिरव्या पपईमध्ये  कोरड्या वजनाच्या आधारावर पेक्टिनचे प्रमाण १० टक्के असते. टाकाऊ ठरलेल्या हिरव्या पपईच्या सालीपासूनही पेक्टिन मिळवता येते. पेक्टिनचे खाद्य आणि औषध उद्योगामध्ये अनेक उपयोग आहेत. 
अन्य मूल्यवर्धित उत्पादने 

पपईपासून अनेक मूलवर्धित उत्पादने तयार करता येतात. त्यामध्ये जॅम, मार्मालेड, टुटी फ्रुटी, लोणचे, पापड, चॉकलेट, कॅनड् पपया, गोठवलेले कोरडे पपया यांचा समावेश होतो. 

प्रसाधन उत्पादने
पपईचा गर किंवा साल यामुळे त्वचेची हानी भरून काढणे किंवा त्वचेवरील मृत पेशी कमी करणे शक्य होते. त्वचेवरील छिद्रे मोकळी करण्याचे काम पपईद्वारे केले जाते. पपईची फळे, बिया, साल, पाने यामध्ये आवश्यक विकरांचे प्रमाण मोठे असून, त्याचा त्वचेच्या आरोग्यासाठी फायदा होतो.  

पपईच्या पानामध्ये असलेली अल्कोलाईड कॅपेन, बियामधील सेरीसीन आणि फळामध्ये असलेली प्रथिने आरोग्यासाठी लाभदायक आहेत. 
कच्च्या पपईचा रस हा चेहऱ्यावरील मुरूमाच्या उपचारामध्ये लाभदायक आहे. तसेच मुरूमामध्ये पू होण्याची प्रक्रिया टाळली जाते. 
पेपेनमुळे सूर्यप्रकाशाने पडलेले त्वचेवरील तपकिरी ठिपके कमी होण्यास मदत होते. त्याच प्रमाणे त्वचेचा दाह कमी होतो. जळलेल्या त्वचेची भरून येण्यास पेपेन मदत करते. पेपेनमधील विकरे ही त्वचेतील मेदांचे प्रमाण कमी करण्यासोबतच त्वचा मऊ करण्यास मदत करते. त्वचा उजळ करण्यासाठीही काही प्रमाणात फायदा होतो. 

पपई उद्योगासाठी भविष्यातील धोरणे : 
निर्यातीमध्ये पपईसाठी अत्यंत काटेकोर नियमांमुळे फळे नाकारली जाण्याचे प्रमाण ३० टक्क्यापर्यंत आले आहे. अशा स्थितीमध्ये स्थानिक बाजारात फळे आल्यानंतर त्यांच्या किमतीमध्ये मोठी घसरण होते. त्याऐवजी स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग उभारणीला चालना दिली पाहिजे. 

पपईच्या मूल्यवर्धीत प्रक्रिया उत्पादनासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत. 
पपईपासून गर किंवा भुकटी तयार करण्याचे तंत्रज्ञान सोपे असून, त्याला पेय उद्योगामध्ये मोठी मागणी आहे. 
ज्या विभागामध्ये पपईचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते, अशा ठिकाणी अशा प्रक्रिया उद्योगांचे क्लस्टर तयार करणे गरजेचे आहे.  

काढणीनंतर येणारे रोग : 
१) अॅन्थ्राक्नोज ः पपई फळामध्ये काढणीनंतर येणारा महत्त्वाचा नुकसानकारक रोग आहे. अपक्व फळावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फळे पिकल्यासारखी दिसतात. प्राथमिक स्थितीमध्ये पपईचा दांडा काढणीची खूण ही लहान, तपकिरी असते, त्यानंतर त्यामध्ये पाणी शोषल्याप्रमाणे वाढून २.५ सेमी किंवा त्यापेक्षा मोठी होते. 
२) स्टेम एन्ड रॉट ः पहिली लक्षणे फळाच्या देठाजवळ दिसून येतात. लहान असलेली खुण वाढून गडद तपकिरी किंवा काळी पडते.
३) फ्रुट रॉट ः काही लक्षणे वरील प्रमाणे असतात. किंवा फळाच्या सालीवर इजा दिसून येते. हा रोग पक्व फळामध्ये वेगाने वाढतो. त्यामुळे फळांचे साल व आतील गर मऊ होऊन किचिंतसा गडद होतो. 
४) फायटोप्थोरो स्टेम एन्ड रॉट : अधिक पाणी शोषल्याप्रमाणे दिसणारे भाग तयार होऊन त्यात पांढऱ्या मायसेलियमची वाढ होते. त्यात वेळेनुसार वाढ होते. 

रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी,
काळजीपूर्वक हाताळणी करून फळांना होणाऱ्या इजा कमीत कमी राहतील, याची काळजी घ्यावी.
 काढणीनंतर त्वरित शीतकरण करणे आणि त्यानंतर संपूर्ण काढणीपश्चात हाताळणीवेळी तापमान आणि सापेक्ष आर्द्रता यांचे प्रमाण योग्य ठेवावे. 
शिफारशीप्रमाणे योग्य बुरशीनाशकांचा वापर करणे.
फळे ४९ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यामध्ये २० मिनिटे ठेवावीत.

पपईच्या झाडाचे उपयोग
पपईच्या झाडाचा प्रत्येक भाग हा उपयोगात येतो. त्यामुळे त्याला कल्पवृक्ष म्हणता येऊ शकेल. 
 फळे धरल्यानंतर ७५ ते ९० दिवसांच्या कालावधीमध्ये हिरव्या फळातून निघणारा चिक गोळा केला जातो. या कच्च्या चिकापासून कॅन्डी किंवा टूटी फ्रुटी तयार करता येते. 
१३० दिवसांनंतरच्या पक्व फळातून मिळवलेल्या चिकातून जॅम, जेली, टॉफी, बार, स्क्वॅश, सॉफ्ट ड्रिंक, पपई गर भुकटी इ. तयार करता येते.   
कच्चे व पक्व फळांची पाने, दांडे, साली व अन्य टाकाऊ घटक पल्व्हरायझरमध्ये टाकून, त्यापासून पशुखाद्य, पोल्ट्री खाद्य तयार केले जाते. या पशु किंवा पोल्ट्री खाद्याचा वापर केल्यानंतर कोंबड्यापासून अंड्याच्या उत्पादनामध्ये वाढ होते.   
पपईच्या वाळवलेल्या पानांचा चहा हा ह्रद्य रोग आणि कर्करोग असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरतो. 
अन्य वार्षिक किंवा द्विवार्षिक पिकांच्या तुलनेमध्ये पपई झाडापासून अधिक बायोमास उपलब्ध होते. त्याचा उपयोग कागद निर्मिती उद्योगासाठी होऊ शकतो. 
मुळातून स्त्रवणाऱ्या विशिष्ठ सेंद्रिय घटकांमुळे सूक्ष्मजीवांच्या संख्येत वाढ होते. त्याच प्रमाणे तणांच्या वाढीवर मर्यादा येतात.

Web Title: agrowon news Papaya agro