संघर्ष, परिश्रम, प्रयत्नांतून घडली प्रयोगशील शेती

रमेश चिल्ले
सोमवार, 31 जुलै 2017

कायम दुष्काळी व भूकंपग्रस्त अौसा तालुक्यातील चाकतपूर (जि. लातूर) येथील बाडगिरे कुटुंबाने मोठ्या कसरतीने, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत पाच एकरांची शेती १८ एकरांवर नेली आहे.कुटुंबातील उमेश आत्मविश्वासाने व प्रयोगशील विचारांनी डाळिंब व अन्य पिकांची शेती करताना उल्लेखनीय वाटचाल करतो आहे. यंदा डाळिंबाचे दर पडले तरी हताश न होता थेट विक्री करून आपल्यातील विक्रीकौशल्याची चुणूक त्यांनी दाखवली आहे.

कायम दुष्काळी व भूकंपग्रस्त अौसा तालुक्यातील चाकतपूर (जि. लातूर) येथील बाडगिरे कुटुंबाने मोठ्या कसरतीने, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत पाच एकरांची शेती १८ एकरांवर नेली आहे.कुटुंबातील उमेश आत्मविश्वासाने व प्रयोगशील विचारांनी डाळिंब व अन्य पिकांची शेती करताना उल्लेखनीय वाटचाल करतो आहे. यंदा डाळिंबाचे दर पडले तरी हताश न होता थेट विक्री करून आपल्यातील विक्रीकौशल्याची चुणूक त्यांनी दाखवली आहे.

नोकरी आणि शेतीची कसरत
कायम दुष्काळी असा शिक्का बसलेल्या भूकंपग्रस्त औसा तालुक्यात चाकतपूर गाव आहे.  हा भाग तसा दुष्काळी. त्यामुळे पाण्यावर बहुतांश पीक नियोजन अवलंबून असते. गावातील विश्र्वनाथ बाडगिरे हे जिल्हा परिषदेचे निवृत्त शिक्षक. वाट्याला वडिलोपार्जित हलकी, कोरडवाहू केवळ चार एकर शेती आलेली. तीही दोन किलोमीटरवर. पहाटे उठून पायी किंवा ‘सेकंडहँड’ जुन्या सायकलीला हवा मारून शेतात जावे लागे. कच्चे रस्ते. गावापासून नोकरीचे ठिकाण वीसेक मैलांवर. त्याकाळात शंभर - दीडशे रुपये पगार. तीन मुले व एक मुलगी. काटकसर करीत संसाराचा गाडा हाकीत. पैशाला पैसा जोडून चाळीस वर्षांच्या नोकरीत थोडी थोडी करीत चार एकरांची शेती १८ एकरांवर नेली. पत्नी चिंताबाई देखील घरचे, लेकरा-बाळांचे उरकून मजुरांसोबत राबत. 

प्रगतीच्या वाटेवर 
संघर्षातून घर पुढे आलेले. एक मुलगा औसा येथील महाविद्यालयात प्राध्यापक, एक शिक्षक, तर तिसरा उमेश एम.ए. झाला. त्याला शेतीची चांगली आवड होती. त्यातच प्रगती करायचे ठरवले. सुरवातीला पारंपरिक शेती केली; पण अल्पावधीतच पाण्याशिवाय प्रगतिशील शेतीचे स्वप्न कुचकामी वाटायला लागले. सन २००९ मध्ये जर्सी गायी घेतल्या. त्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले. तीन वर्षे दररोज ७० ते १०० लिटर दूध सोसायटीला घातले. मजुरांचा प्रश्न वाढला. मग हा जोडधंदा अल्पावधीत बंद करावा लागला. हे दुःख उराशी बाळगून नवीन शेतीपद्धतीचा अभ्यास उमेश करायला लागले.

डाळिंबाचा पर्याय  
पूर्वी वडिलांनी सुमारे पाच बोअर घेतलेले. त्यांना पाणी काही लागले नाही. सामाईक विहिरीतून फारसे पाणी मिळत नव्हते. मग उमेश यांनी ५० फूट खोल विहीर घेऊन सिमेंट- काँक्रीटचे कडे घातले. दहा ते पंधरा बोअर्स घेतले. प्रत्येकातील थोडे पाणी विहिरीत साठवून ते सहा एकर उसाला दिले. तेही उसाला कमी पडत असल्याने ऊस कमी करण्याचा निर्णय घेतला. गावातील डाळिंब, आंबा घेतलेल्या समवयस्क मित्रांच्या गटात उमेश सामील झाले. त्यात सुरेश पवार, मोहन साठे, शिवानंद पाटील, सदाशिव जोगदंड यांच्या संपर्कातून उमेश यांना डाळिंबाचा पर्याय मिळाला. मित्रांच्या व कृषी विभागाच्या संपर्काने राज्यातील काही भागांतील वेगवेगळ्या बागा पाहण्याची संधी मिळाली. 

नियोजन सुधारले 
गायी असताना दरवर्षी पंचवीस ट्रॅक्टर शेणखत शेतीला मिळे, त्यामुळे चांगले उत्पादन येऊ लागले. शेणखत व स्लरीचा चांगला अनुभव गाठीला होता. औरंगाबादहून एका शेतकऱ्याच्या नर्सरीतून भगवा जातीची ५०० रोपे आणली. ती १४ बाय १२ फूट अंतरावर एक हेक्टर क्षेत्रात लावली. शेणस्लरी व सेंद्रिय खतांवर झाडे चांगली पोसली. छाटणी, फवारणीचे तंत्र अवगत करून घेतले. परिसरातीलच सेंद्रिय व जैविक घटकांचा उदा. गोमूत्र, शेण, सरकी, शेंगदाणा पेंड, गूळ, बेसन पीठ स्लरी, शेळ्यांचे मूत्र, कडुनिंब, निरगुडी, सीताफळ यांचा पाला, गावरान काळा गूळ व पाणी यांचे मिश्रण आदी देण्यास सुरवात केली. त्यामुळे झाडे बळकट व जोमदार वाढली. 

आश्वासक उत्पादन, थेट विक्री 
मागील वर्षी अडीच एकरांतून सुमारे साडेसहा टन उत्पादन मिळाले. त्या वेळी किलोला ६० रुपये, तर कमाल दर १२० रुपये मिळाला होता. यंदा आत्तापर्यंत २०० क्रेट मालाची विक्री झाली आहे. यंदा ए ग्रेडच्या काही फळांना ६५ रुपये दर मिळाला तरी बाकी फळांना ३० रुपये दरावरच समाधान मानावे लागले. त्यामुळे थेट ग्राहकांनाच विक्री करण्याचा निर्णय घेतला. लातूर शहरात दोन निवडक ठिकाणी स्टॉल लावले. एके ठिकाणी चुलतभावाच्या मुलाने, तर दुसऱ्या ठिकाणी स्वतः उमेश यांनी माल विकला. सुमारे ५० क्रेट माल अशारीतीने विकण्यात आला. त्याला किलोला ८० रुपये दर मिळाला. पावसाळा काळात विक्रीच्या अडचणी आल्याने जमेल तशी विक्री केली. अजून २०० क्रेट मालाची विक्री होणे बाकी आहे. बाजारात किलोला चाळीस ते पन्नास रुपये दर असताना स्वतःच्या विक्री व्यवस्थेमुळे नफा वाढवणे शक्य झाले. डाळिंबाचा आकार, सुमारे अडीचशे ग्रॅम वजन, चकाकी, रंग व चव यामुळे ग्राहकांकडून चांगली मागणी राहिली. 

सौ. चिंताबाईंचे मोलाचे योगदान 
चाळीस वर्षांपासून उमेश यांच्या आई सौ. चिंताबाईंचे योगदान फार मोलाचे ठरले आहे. ही  माउली दररोज गावापासून दोन किलोमीटर चालत शेतात येऊन कामाचे व्यवस्थापन, जनावरांचे चारा- पाणी पाहते. खुरपणी, पीककाढणी, साफसफाई अशा सगळ्या कामात उमेश यांना मदत करते. वयाच्या सत्तरीतही अमरनाथ व चारीधाम यात्रा केली. पण थकल्या नाहीत. पती देखील जमेल तशी शेती पाहतात. उमेशसारखी तरुण मंडळी उच्चशिक्षण घेऊन चिकाटी व आत्मविश्‍वासाने शेती करताहेत म्हणून आजच्या व भविष्यातील शेतीला चांगले दिवस राहतील यात शंका नाही. 

उमेश यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 
शेतीत ६० टक्के सेंद्रिय पद्धतीवर भर. गरजेच्या वेळेसच रासायनिक पद्धतीचा वापर. आता वर्षातून एकच बहर (आंबेबहर) घेतात. परिसरात काहीजण दोन बहर घेत असल्याने तेलकट डाग रोगाचे प्रमाण तेथे आहे, जे उमेश यांच्या बागेत नाही.  
गेल्या वर्षी सामुदायिक शेततळे योजनेतून ३४ बाय ३४ बाय ५ मीटर आकाराचे शेततळे घेतल्याने पाण्याची सोय झाली. त्यामुळेच आंबेबहर घेता आला. मागील तीनेक वर्षे अवर्षणाच्या काळात थेंब- थेंब पाण्यासाठी वणवण केली. फवारणीसाठी एचटीपी पंप कृषी विभागाने अनुदानावर दिला.
तालुक्यात सेंद्रिय पद्धतीचा वापर करण्यावर भर असलेल्या पाचशे शेतकऱ्यांचा गट आहे.  त्यात उमेश यांचा सहभाग अाहे. 
त्याचबरोबर व्हॉट्स ॲप ग्रुपद्वारे देखील माहितीची देवाण- घेवाण फायद्याची ठरते. 

शेतीतून  समाधानी 
उमेश यांचे वडील धार्मिक स्वभावाचे आहेत. गावात ते कित्येक वर्षांपासून कीर्तन करतात. कुटुंबाने गावात चांगले घर बांधले आहे. पॅकहाउस घ्यायचे आहे. चार गावरान गायी व दोन बैलांचे शेणखत उपलब्ध होते. सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, तूर, गहू, हरभरा यांच्यापासूनही समाधानकारक  उत्पन्न मिळते.

 उमेश बाडगिरे, ९९७५३२२२३२
(लेखक लातूर कृषी विभागांतर्गत अधिकारी आहेत.

Web Title: agrowon news Pomegranate