डाळिंबाने केला माळरानाचा कायापालट

अनिल देशपांडे
रविवार, 3 सप्टेंबर 2017

वैद्यकीय पेशाप्रमाणे शेतीदेखील काळजीपूर्वक केली तर निश्चितपणे किफायतशीर ठरू शकते, असाच काहीसा अनुभव राहुरी (जि. नगर) येथील डॉ. अशोक कुसळकर यांचा आहे. माळ जमिनीत त्यांनी डाळिंब बाग फुलविली. हंगामानुसार भाजीपाला लागवडीचेही त्यांचे नियोजन असते.

राहुरी (जि. नगर) येथील डॉ. अशोक बाबूराव कुसळकर यांनी मोरे चिंचोरे (ता. नेवासा, जि. नगर) गावातील वडिलोपार्जित शेती चांगल्या प्रकारे लागवडीखाली आणली. डॉक्टरी पेशा सांभाळत त्यांनी टप्प्याटप्प्याने शेतीमध्ये बदल केले. पारंपरिक पिकांच्याएेवजी डाळिंब फळबाग आणि भाजीपाला लागवडीवर भर दिला. संरक्षित पाण्यासाठी शेततळे खोदले. नऊ एकर डाळिंब बागेला ठिबक सिंचन केले. टप्प्याटप्प्याने माळ जमीन लागवडीखाली आणली. याबाबत माहिती देताना डॉ. अशोक कुसळकर म्हणाले की, आमच्या वडिलोपार्जित जमिनीच्या वाटण्या झाल्या, त्यातून मला आठ एकर जमीन आली. आवडीतून जमिनीमध्ये हळूहळू सुधारणा करण्यास सुरवात केली. टप्प्याटप्प्याने माझ्या नातलगांनी विक्रीस काढलेली जिरायती जमीन खरेदी केली. सध्या माझी २२ एकर जिरायती शेती आहे. राहुरीपासून माझी शेती पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. पीक व्यवस्थापनासाठी मदतनीस ठेवले आहेत. त्यामुळे दर रविवारी दवाखान्याला सुट्टी असल्याने मी शेतीवर जाऊन नियोजन करतो.

जमीन सुधारणेस सुरवात  
जमीन सुधारणेबाबत डॉ.अशोक कुसळकर म्हणाले की, मी साधारणपणे दहा वर्षापूर्वी शेतीच्या नियोजनाकडे लक्ष देण्यास सुरवात केली. पाण्याची सोय नसल्याने पहिली चार वर्षे ज्वारी, बाजरी, मका लागवडीवर भर दिला. माझ्या शेती शेजारी दगडाची खाण आहे. त्यात साठलेले पाणी मी पंपाने खेचून पिकांना द्यायचो. परंतु हलकी जमीन आणि अनियमित पावसामुळे अपेक्षित उत्पादन हाती येत नव्हते. हे लक्षात घेऊन मी परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा केली. पारंपरिक पिकापेक्षा शेततळे करून डाळिंबासारखी फळबाग केली तर काही प्रमाणात खात्रीशीर उत्पन्न मिळेल याची खात्री झाली. सन २०११ च्या दरम्यान परिसरातील  प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब खेत्री यांच्या सल्ल्याने मी शेततळे आणि पाइपलाइनचे काम सुरू केले. आमच्या शेतीपासून पाच किलोमीटर अंतरावर मुळा धरणाचा उजवा कालवा जातो. कालव्याशेजारी सहा गुंठे जमिनीत विहीर घेतली. या विहिरीतील पाणी रितसर परवानगी घेऊन शेततळ्यात साठविण्यास सुरवात केली. पावसाळ्यात शेताजवळील दगडी खाणीतील पाणी उपसून शेततळ्यात साठवितो. हिवाळा आणि उन्हाळ्यात विहिरीचे पाणी शेततळ्यात साठविले जाते.

डाळिंब लागवडीचे नियोजन   
डाळिंब लागवडीबाबत डॉ. कुसळकर म्हणाले की, हलक्या जमिनीत फळबाग लागवडीच्या दृष्टीने मी महात्मा फुले कृषी विद्यापिठातील तज्ज्ञ डॉ. संतोष कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. मी दैनिक ॲग्रोवनचा नियमित वाचक आहे. त्यामुळे दैनिकातील तांत्रिक सल्ला, प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव लक्षात घेऊन मी डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला. सन २०१३ मध्ये मी नऊ एकरावर १० बाय १२ फूट अंतराने डाळिंबाच्या भगवा जातीची लागवड केली.  डाळिंबाची रोपे महात्मा फुले कृषी विद्यापीठातून घेतली. डाळिंब फळबागेच्या दैनंदिन व्यवस्थापनात मला सुरेंद्र पवार, महेंद्र पवार आणि बाबासाहेब कसबे यांची चांगली मदत मिळते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मी डाळिंब लागवड आणि व्यवस्थापनाचे नियोजन सुरू केले. फळबागेला ठिबक सिंचन आणि आच्छादन केले आहे. त्यामुळे पाण्याची बचत होते. पहिली दोन वर्षे डाळिंब बागेच्या व्यवस्थापनासाठी एकरी चाळीस हजारापर्यंत खर्च आला. परंतु दरवर्षी तज्ज्ञ आणि प्रयोगशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून व्यवस्थापन खर्च निम्म्यावर आणला आहे. अनुभवातून शिकत तिसऱ्या वर्षीपासून बाग व्यवस्थापन खर्चात बचत होऊ लागली. दोन वर्षांनी बागेतून डाळिंबाचे किफायतशीर उत्पादन सुरू झाले. पहिल्यांदा नऊ एकरातून ३२ टन उत्पादन मिळाले. बागेतच व्यापाऱ्यांनी फळांची खरेदी केली. दुसऱ्या वर्षी मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे मी फक्त एक हजार झाडावर बहर धरला. त्यामुळे मला बारा टन उत्पादन मिळाले. तिसऱ्या वर्षी मात्र पुरेशा पाण्यामुळे नऊ एकरातून ५५ टन उत्पादन मिळाले. फळाची प्रतवारी करून बागेमध्ये व्यापाऱ्यांना विक्री केली. मला सरासरी ५० ते ५५ रुपये प्रति किलो दर मिळाला. दुसऱ्या क्रमांकाची फळे रहाता मार्केटमध्ये विक्रीस नेली. बागेचे योग्य व्यवस्थापन आणि फळांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन, प्रतवारीमुळे व्यापारी चांगला दर देतात. त्यामुळे पारंपरिक पिकांपेक्षा फळबाग आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरू लागली आहे. फळ उत्पादन वाढवण्याचा माझा प्रयत्न आहे.

शेणखत, कंपोस्ट खतावर भर  
बागेच्या व्यवस्थापनाबाबत डॉ. कुसळकर म्हणाले की, एकात्मिक पद्धतीने कीड,रोग नियंत्रणावर माझा भर आहे. फळबागेत मी रासायनिक खतांऐवजी सेेंद्रिय खतांच्या वापरावर माझा भर आहे. परिसरातील साखर कारखान्यातून कंपोष्ट खत विकत घेतो. फळबागेचे नियोजन करण्यासाठी तीन मदतनीस आहेत, त्यांच्याकडे बारा गावरान गाई आहेत. त्यामुळे पुरेसे शेणखत उपलब्ध होते. याचबरोबरीने फळझाडांना ठराविक दिवसांनी शेणस्लरी देतो. सेंद्रिय खतांचा चांगला परिणाम जमिनीची सुपिकता वाढ तसेच झाडे सशक्त होण्यासाठी झाला आहे.

 कुटुंबाची मिळते साथ  
शेतीच्या बांधावर डॉक्टरांनी आंबा, पपई, चिक्कू, नारळ, फणस, विलायती चिंच अशी विविध फळझाडांची लागवड केलेली आहे. त्यामुळे कुटुंबासाठी विविध फळे वर्षभर मिळतात. दर रविवारी शेती शिवारात फिरल्याने दैनंदिन वैद्यकीय पेशातील थकवा निघून जातो, असे ते सांगतात. येत्या काळात एक एकर ड्रॅगन फ्रूट आणि एक एकर बेहडा लागवडीचे त्यांनी नियोजन केले आहे. शेती नियोजनात त्यांना पत्नी डॉ. दीपा, मुलगा अद्वैय आणि ओजस यांचे चांगले सहकार्य मिळते.

हंगामानूसार भाजीपाला लागवड   
डॉ. कुसळकर दरवर्षी पाणी उपलब्धता आणि हंगामानुसार दोन एकर क्षेत्रावर भाजीपाला लागवड करतात. या शेतात देखील त्यांनी तीस गुंठ्याचे शेततळे केले आहे. त्यामुळे भाजीपाला लागवडीचे नियोजन करणे शक्य होते. गेल्या वर्षी त्यांनी वीस गुंठे काकडी, वीस गुंठे कारली आणि एक एकर भोपळा लागवड केली होती. डॉक्टरांचे शेतीमधील मदतनीस या भाजीपाल्याची लागवड ते विक्रीचे नियोजन करतात. योग्य पीक व्यवस्थापनामुळे भाजीपाल्याचे चांगले उत्पादन मिळते. स्थानिक बाजारपेठेत भाजीपाला विक्री केली जाते. मदतनिसांचा दर आठवड्याचा पगार भाजी विक्रीतून भागविण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न असतो. 

शेळीपालनात  मजुरांना भागीदारी
 डॉ. कुसळकर यांनी दीड वर्षापूर्वी सात शेळ्यांपासून शेळीपालनास सुरवात केली. शेळ्यांसाठी गोठा बांधला. गोठ्यासमोरील काही जागा शेळ्यांना मोकळे फिरण्यासाठी ठेवली. त्यास कुंपण केले. सध्या त्यांच्याकडे तीस शेळ्या आहेत. शेळीपालनामुळे लेंडीखताची चांगली उपलब्धता होते. मजूर शेळ्यांना चरावयास नेतात. त्यामुळे या मजुरांनाही डॉक्टरांनी शेळीपालनात भागीदार करून घेतले आहे. 

शेततळ्यात मत्स्यपालन  
डॉ. कुसळकर यांनी शेततळ्यात मत्‍स्यपालनास सुरवात केली आहे. या शेततळ्यात राेहू, कटला मत्स्यबीज सोडले आहे. या माशांना खाद्य म्हणून शेणस्लरी दिली जाते. वर्षभरात मासे अर्धा किलोपर्यंत वाढले आहेत. येत्या वर्षभरात या माशांच्या विक्रीतून त्यांना अतिरिक्त उत्पन्न सुरू होणार आहे.

Web Title: agrowon news Pomegranate