esakal | शॉप फॉर चेंज
sakal

बोलून बातमी शोधा

शॉप फॉर चेंज

शॉप फॉर चेंज

sakal_logo
By
मयूरा बिजले

शेतकरी आणि शेतीमालाच्या प्रश्नांविषयी आस्था असणं वेगळं आणि त्यासाठी स्वतः झाेकून देऊन काम करणं वेगळं. कधीही शेती न केलेले, आयटी उद्योगात मार्केटिंगमध्ये काम करणारे मुंबईकर समीर आठवले दुसऱ्या वर्गात मोडतात. शेतकरी अाणि ग्राहक या दोघांचाही फायदा करून देणाऱ्या `शाॅप फाॅर चेंज`ची मुहूर्तमेढ त्यांनी राेवली. या माध्यमातून राज्यातील आणि राज्याबाहेरील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगली बाजारपेठ आणि भाव मिळत आहे. समीर हे काही काळ सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात मार्केटिंगचे काम करत होते. त्यानिमित्ताने समीर अनेक शेतकऱ्यांना आणि ग्राहकांनादेखील भेटायचे. आजवर देशातील लहान-मोठ्या किमान ५० हजार शेतकऱ्यांशी त्यांचा थेट संवाद झालाय. हे काम करत असताना शेतीमाल विक्री व्यवस्थेतील मध्यस्थांच्या भल्यामोठ्या साखळीमुळे निर्माण झालेले प्रश्न त्यांना जवळून बघायला मिळाले. यावर मात कशी करायची याचा विचार करत असताना शेतकरी ते ग्राहक थेट संपर्क आणि त्यासाठी `शॉप फॉर चेंज` या कल्पनेची बिजं पडली.

सुरवात कशापासून करावी, हे समीर यांच्या लक्षात येत नव्हते. तेव्हा त्यांनी अभ्यास सुरू केला. अनेकांना भेटी घेतल्या. त्यातून एक प्रयोग सुरू झाला. बारीपाडा या आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी पिकवलेला तांदूळ थेट ग्राहकांना विकण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. या सेवेची जाहिरातच ''बारीपाडा शेतकऱ्यांचा उत्कृष्ट इंद्रायणी तांदूळ तुमच्या घरी'' अशी केली. या तांदळाच्या पॅकवर हा तांदूळ कुणी पिकवला त्या शेतकऱ्याचे नाव, तांदळाची प्रत याबाबत माहिती दिली. इतर वाणांच्या तांदळाचीही विक्री सुरू केली. हा प्रयाेग लाेकांच्या पसंतीसही उतरला. शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्याही चेहऱ्यावर समाधान दिसले. 

शेतमालाच्या थेट विक्रीसोबतच समीर यांनी प्रक्रियायुक्त पदार्थांच्या विक्रीतही उडी घेतली. त्यातून उत्तराखंडातील महिला शेतकरी गटाने बनवलेले नैसर्गिक जाम, झारखंडमधील आदिवासी महिलांनी बनवलेले साबण, राजस्थानमधील आदिवासींकडील मध, कोकणातील फणस, मोदक तसेच विविध कारागीरांनी बनवलेली ज्यूट आणि कॅनवासची उत्पादने यांची विक्री केली. त्यासाठी एल ॲन्ड टी इन्फोटेक, डब्ल्यूएनएस आणि इतर कंपन्यांमध्ये जाऊन स्टाॅल्सही लावले. बाजारपेठेत या प्रयाेगाचेही स्वागत झाले. 

आजमितीला `शॉप फॉर चेंज`च्या वतीने डोंबिवली, ठाणे इथे शेतकऱ्यांची कायमस्वरूपी हक्काची विक्री केंद्रे सुरू आहेत. शिवाय ग्राहकांच्या मागणीवरून फेब्रुवारी २०१७ पासून मुंबईमध्ये घरपोच भाजी पोहचवण्याची सेवा सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांना शेतमाल कसा तयार करावा, कधी उपलब्ध करावा वा त्याचे संकलन कसे करावे, अशा विविध विषयावर प्रशिक्षण दिले जाते. हे सारे प्रयाेग करताना अनेक अडचणीही आल्या. पण पत्नीची मदत आणि पाठिंब्यामुळे त्यातून मार्ग काढता आला, असे समीर सांगतात.

अनेक वेळा बंद, सुटी, आेला दु्ष्काळ आणि अजूनही काही कारणाने शेतकऱ्यांचा माल वाया जाताे. शेतकऱ्याला हा माल घाईघाईत अतिशय स्वस्त दराने विकावा लागताे, नाहीतर तो खराब हाेताे. तेव्हा ग्राहकांनीही हा माल याेग्य भावात घेऊन स्वतःची जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे समीर म्हणतात. शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज करणे आवश्यक आहे. हे पीक, हा माल वाया गेला तर त्यासाठी लागलेले पाणी, त्यामागचे कष्ट सारेच वाया जाते. आपल्या पाेशिंद्याला आपणच मदत करणं आवश्यक आहे, असं ते सांगतात. 

आजचे यश हे कालच्या अडचणींतून आणि अडथळ्यांची शर्यत पार करून मिळाले आहे. आज `शॉप फॉर चेंज` दिमाखात उभे आहे, याचा अभिमान वाटतो, अशी समीर यांची भावना आहे.  

(लेखिका पर्यावरण अभ्यासक आहेत.)  : ९८८११२९२७९.