सोयाबीन नरमले; हरभरा, तूर गडगडले

सोयाबीन नरमले; हरभरा, तूर गडगडले

गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी मोठ्या तेजीची शक्यता नाही. सोयाबीनचे दर इथून पुढच्या काळात जास्तीत जास्त २०० रुपये प्रतिक्विंटल वाढतील. त्यापेक्षा मोठ्या दरवाढीची चिन्हे नाहीत. नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, दर हमीभावापेक्षा खालीच आहेत. गेली काही वर्षे चांगला परतावा दिलेल्या हरभऱ्याचेही दर यंदा ढासळले आहेत. 

सोयाबीन
सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केल्यानंतर त्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम जाणवला. सोयाबीनचे दर काही प्रमाणात सुधारले. तसेच अर्जेंटिनामध्ये यंदा पाऊस कमी झाल्यामुळे उत्पादनात घट होईल, अशी चर्चा सुरू झाल्याने दरवाढीला काहीसे बळ मिळाले. परंतु अमेरिकी कृषी विभागाच्या ताज्या अहवालानुसार जागतिक पातळीवर सोयाबीन पुरवठ्यावर विशेष परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच खाद्यतेलावरील आयात शुल्कवाढीनंतर वाढलेला खरेदीचा जोरही आता ओसरला आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरातील तेजीला लगाम बसला आहे. 

सध्या प्रतिक्विंटल २७०० ते २९०० रुपये दर चालू आहे. कमी अधिक प्रमाणात चालू हंगामात या पुढच्या काळात याच पातळीला दर राहतील. जास्तीत जास्त २०० रुपयांनी दर वाढण्यास वाव आहे. त्या पलीकडे सोयाबीनच्या दरात तेजी येण्याची शक्यता नाही. साधारण ३०५० ते ३२०० रुपये या दरपातळीवर शेतकऱ्यांनी नजर ठेवावी. त्यानुसार सोयाबीन साठवायचा की विकून टाकायचा याचा निर्णय घ्यावा. 

सध्या एकूण अर्थकारणालाच फटका बसलेला असल्यामुळे प्रक्रिया उद्योगांना खेळत्या भांडवलाची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे गरजेइतकाच माल खरेदी करण्याची या उद्योगांची मानसिकता आहे. त्यामुळे तुकड्या-तुकड्यांत खरेदी होत असून, मागणीत जोम नाही.   

हरभरा
गेल्या काही हंगामात हरभऱ्याने चांगली साथ दिल्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी हरभऱ्याचा पेरा वाढवला. हवामानही चांगले राहिल्यामुळे यंदा उत्पादनात मोठी वाढ अपेक्षित आहे. परंतु हरभऱ्याच्या दरातील तेजी संपुष्टात आली असून, सध्या दर हमीभावापेक्षा खाली घसरले आहेत. सध्या लातूर मार्केटला प्रतिक्विंटल ३६०० रुपये भाव चालू आहे. हमीभाव ४००० रुपये आहे. पुढच्या हंगामात जे पीक येईल त्यासाठी तर सरकारने ४४०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. त्या तुलनेत बाजारातील भाव कमी आहे. 
सरकारने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसेल. हरभऱ्याची हमीभावाने सरकारी खरेदीसाठी त्वरित पावले उचलली पाहिजेत. तसेच सरकारने इतर कडधान्यांच्या आयातीवर शुल्क लावले आहे, परंतु हरभऱ्याला त्यातून वगळले आहे. या निर्णयात बदल करून हरभऱ्यावरही आयात शुल्क लावले पाहिजे. पिवळ्या वाटाण्यावर ५० टक्के आयात शुल्क लावल्याचे चांगले परिणाम दिसून आले.

(पिवळ्या वाटाण्याचे पीठ हरभरा पिठात- बेसन- मिसळण्यासाठी वापरले जाते.) 

तूर 
तुरीच्या नवीन पिकाची आवक तुरळक प्रमाणात सुरू झाली आहे. २५-३० डिसेंबरपासून तुरीची आवक आणखी वाढेल. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही तुरीला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. लातूर मार्केटला सध्या ४००० ते ४१०० रुपये क्विंटल दर चालू आहे. हमीभाव ५४५० रुपये आहे. त्यामुळे सरकारने आतापासून तुरीच्या सरकारी खरेदीसाठी नियोजनबद्ध आणि संपूर्ण तयारीनिशी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी सॅटेलाइट मॅपिंगच्या माध्यमातून तुरीच्या उत्पादनाची खातरजमा करण्याचा विचार बोलून दाखवला होता. सध्या पीक शेतात उभे असल्यामुळे सॅटेलाइट मॅपिंगसाठी हीच योग्य वेळ आहे. एकदा पिकाची काढणी होऊन माल बाजारात आणल्यावर मॅपिंग करता येणार नाही. मूग, उदीड, सोयाबीनच्या सरकारी खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रासह जाहिराती प्रकाशित होत आहेत. त्यात माल विक्रीला आणताना कोणती काळजी घ्यावी, ऑनलाइन नोंदणी, इतर कागदपत्रे यांची माहिती आहे. तुरीसाठीही अशीच मोहीम राबविण्याची गरज आहे.   

(लेखक लातूर बाजार समितीतील  प्रमुख व्यापारी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com