सरकार अन् हवामान खातेही झाले बेभरवशाचे

सरकार अन् हवामान खातेही झाले बेभरवशाचे

हवामान खात्यासारखंच सरकारबी बेभरवशाचं झालं आहे जी. कवा सांगते कर्जमाफी, कवा म्हणते कर्जमुक्‍ती आणि देत काहीच नाही. कर्जमाफीचा अर्ज भराले गेलं त सर्व्हर डाउन, तवा असं वाटतं की ही कर्जमाफी म्हणजे लबाडाचं आवतनच होय, अशी शेतकऱ्यांप्रती सरकारची अनास्था बोर्डा गणेशी येथील मंगेश बालकुटे मांडत होते. या परिसरात धान उत्पादकांच्या रोवण्याच पाण्याअभावी होऊ शकल्या नाही. त्यातच सरकारकडून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून चालविलेली थट्टादेखील शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे.

संत्र्यामुळे नागपूरची ओळख ‘ऑरेंज सिटी’ असली तरी रामटेक, कन्हान, पारशिवणी या भागांत भात लागवडदेखील होते. या वर्षी पावसाने खंड दिल्याने प्रकल्प कोरडे पडण्यास सुरवात झाली. परिणामी गेल्या तीस वर्षांपासून पेंच व तोतलाडोह प्रकल्पांचे पाणी शेतीला मिळत असताना या वर्षी मात्र हे पाणी पिण्याकरिता आरक्षित केले. पारशिवणी येथील बबन डडुरे यांनी तर या कारणामुळे आमच्यासमोर मरणाशिवाय पर्यायच नसल्याचे सांगितले. पेंच आणि तोतलाडोह हे दोन्ही प्रकल्प या भागापासून ४० ते ४५ किलोमीटर अंतरावर आहेत. पाण्याअभावी धान उत्पादक पट्ट्यातील हजारो एकर क्षेत्र पडीक राहिल्याचे शेतकरी नेते संजय सत्येकार यांनी सांगितले. जिल्ह्यात भाताखाली ७३ हजार ७५० हेक्‍टर सरासरी क्षेत्र आहे. २०१६-१७ मध्ये ९३ हजार हेक्‍टरवर लागवड झाली. यंदा क्षेत्र ७२ हजारच्या मर्यादेत राहिले. रमेश नानवरे, मंगेश अमृते, ब्रह्मा डडुरे, गजानन कडू, विनोद तेरोळे, धर्मा नितनवरे, जगदीश डडुरे, दिनेश मोईने, केशव शर्मा, देवराव बालगोटे, हिरामण मेंगर, केशव रामप्रसाद रावपाटी, दिनेश मोईने, शिवा कोडुरी अशी शेती पडीक राहिलेल्या शेतकऱ्यांची भली मोठी यादीच त्यांच्याकडे होती. 

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच  शेतकरी त्रस्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर हा जिल्हा. या जिल्ह्यातच ५९ हजार ४२४ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. परंतु आजवर केवळ २६ हजार ८०० शेतकऱ्यांनाच ऑनलाइन अर्ज भरता आले. दहा हजार रुपयांच्या तत्काळ कर्जाची उचलदेखील ३९५ शेतकऱ्यांनाच मिळाली. बॅंकेकडून अनेकांना १० हजार रुपये देण्यास नकार देण्यात आला. 

बटाईवाल्यांना दुहेरी मार
शेती हा उत्पन्नाचा एकमेव स्रोत असल्याने या भागात शेतकरी उत्पन्नात भर पडावी म्हणून बटाईने (करारावर) शेती करतात. मंगेश बालकुटे यांनी १५ एकर क्षेत्रावर धान लागवडीचा निर्णय घेतला होता. १५ एकरपैकी काही क्षेत्र त्यांनी बटाई केले आहे.  १२ हजार रुपये एकराने बटाईची शेती केली. त्यासोबतच १५ हजार रुपये एकरी धान शेतीवर खर्च झाला. परंतु बांध्यात पाणीच नसल्याने रोवणी करणे शक्‍य झाले नाही.

कर्जवाटपातही बॅंकांची पीछेहाट
जिल्ह्यातील ४४ हजार ९९१ शेतकऱ्यांना केवळ ४६९ कोटी ८१ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. कर्जवाटपाची ही टक्‍केवारी अवघी ५७ आहे. जिल्हा सहकारी बॅंकेकडून ४ हजार ६८० शेतकऱ्यांना ३१ कोटी १० लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. 

सोयाबीन क्षेत्रही घटले
२९ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार नागपूर जिल्ह्यात ९५ हजार हेक्‍टरवर कापसाखालील सरासरी क्षेत्र आहे. गेल्या वर्षी २ लाख १० हजारावर लागवड होती. या वर्षी २ लाख २७ हजार हेक्‍टरपर्यंत ते वाढीस लागले. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ लाख ४७ हजार आहे. गेल्या वर्षी ९८ हजारांवर सोयाबीन होते. या वर्षी पावसाअभावी ८५ हजार हेक्‍टरवरच मर्यादित राहिले. तुरीचे सरासरी क्षेत्र ५९ हजार ८७० हेक्‍टर असून, या वर्षी ५८ हजार हेक्‍टर लागवड आहे. गेल्या वर्षी ५८ हजार २७२ हेक्‍टरवर तूर होती. भात लागवड क्षेत्र गेल्या वर्षी ९३ हजार हेक्‍टर होते. परंतु शासकीय आकडेवारीनुसार या वर्षी ७२ हजार हेक्‍टरवरच हे क्षेत्र मर्यादित राहिले. 

आत्महत्यांमध्ये पडली भर
गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती असल्याने नागपूर जिल्हा व विभागात आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. अवघ्या सहा महिन्यांत १२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जून २०१७ या महिन्यात १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांचा समावेश आहे. जानेवारी ते जून २०१७ या कालावधीत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२६ आत्महत्या झाल्या. त्यातील ४२ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, २९ अपात्र आणि ५५ प्रलंबित आहेत. 

पारशिवणी तालुक्‍यात १०० टक्‍के शेती पडीक राहिली. पऱ्हे ७० ते ८० दिवसांचे झाले आहे. २१ दिवसांत रोवणी करा लागते. पुढच्या महिन्यात उत्तरा नक्षत्रात धान काढणीला येते. त्यामुळे आतापर्यंत धान शेतीवर १५ हजार रुपये झालेल्या खर्चाची भरपाई बी होणार नाही. कालव्यातील पाण्यावर पीक जगवलं असतं; पण पेंच आणि तोतलाडोह प्रकल्पांचे पाणी मिळणार नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने दवंडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोचविली, पण आमाले बी जगायचा अधिकार हाये, मग आमच्याच हक्‍काचं पाणी काऊन घेतलं जातं. 
- उपसरपंच मंगेश बालकुटे,  शेतकरी व उपससरपंच, बोर्डी गणेश

आमच्या पारशिवणी व कन्हान तालुक्‍यात पाण्याअभावी केवळ १० टक्‍केच रोवणी होऊ शकली. ज्या क्षेत्रावर रोवणी झाली ते पीकदेखील पाण्याअभावी वाळत चालले आहे. माझ्याकडे चार एकर शेती. शेतालगत असलेल्या नाल्याच्या पाण्याचा आधार होता म्हणून मी पण रोवणी केली; पण उपशामुळे तो पर्यायदेखील संपुष्टात आला अन् पीक वाळत चालले आहे. एकरी १४ हजार रुपयांचा खर्च आला. 
- तुकाराम बंड,  बोर्डी गणेश, ता. पारशिवणी, नागपूर.

१४ एकर शेती आहे पण २०१२ पासून १ लाख १० हजार रुपयांच्या कर्जाची भरपाई करणे शक्‍य झाले नाही. धानाले कधीकाळी २६०० रुपये प्रतिक्‍विंटल भाव होता, तो वाढाले पायजे होता पण झाल उलटच धानाचे भाव आता १००० रुपयाने कमी झाले अन १६०० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले. 
- भगवानजी डडुरे,  पारशिवणी, नागपूर

माझ्याकडे दोन एकर शेती आहे. या शिवारातदेखील इतर शेतकऱ्यांप्रमाणेच धान (भात) घेतले जाते. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यातील पाण्याचा उपसा करीत कशीबशी लागवड केली. परंतु आता पाण्याअभावी हे पीकदेखील वाळत चालले आहे.  
- धनराज तरार,  पारशिवणी, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com