esakal | वाढत्या खपाचा टोमॅटोला आधार
sakal

बोलून बातमी शोधा

वाढत्या खपाचा टोमॅटोला आधार

वाढत्या खपाचा टोमॅटोला आधार

sakal_logo
By
दीपक चव्हाण

बाजारभावासंदर्भात कांद्यानंतर सर्वाधिक चर्चेत असलेलं पीक अशी टोमॅटोची ओळख निर्माण झाली आहे. जुलै २०१७ ते डिसेंबर २०१७ या सहामाहीत टोमॅटोचे बाजारभाव किफायती होते. फार्म कटिंग रेटमध्ये नवा उच्चांक पाहावयास मिळाला तर दिल्ली-मुंबईसारख्या शहरांमध्ये १०० रु. प्रतिकिलोपर्यंत किरकोळीतील दर पोचले होते. २०१८ च्या प्रारंभी टोमॅटो बाजारभावात नरमाई दिसत आहे. नाशिक मार्केटमधील परिस्थितीनुसार गेल्या सहा महिन्यांत उत्कृष्ट प्रतीच्या मालासाठी ९०० रु. कॅरेट (२० किलो) या सर्वोच्च पातळीवर गेलेला बाजार आता १५० रु. कॅरेटपर्यंत नरमला आहे. 

खरं तर २०१७ च्या पहिल्या सहामाहीतही बाजार मंदीत होता. नैसर्गिक अनुकूलतेमुळे झालेली उत्पादनवाढ, महाराष्ट्रातील आडतबंदीमुळे ठप्प झालेले व्यवहार, नोटाबंदीनंतर खपात झालेली लक्षणीय घट आणि पाकिस्तान व बांगलादेशातील बॉर्डरबंदी अशा अडथळ्यांच्या शर्यतीत टोमॅटोचा बाजार पार विस्कटून गेला. याखेरीज मे व जून महिन्यात तीव्र उन्हाळा, भुरी व रसशोषक किडींचा प्रादुर्भाव यामुळे ठिकठिकाणचे टोमॅटोचे प्लॉट खराब झाले. रोगाचा प्रादुर्भाव असताना बाजारात मंदी होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकसंरक्षणाकडे फारसे लक्ष दिले नाही. १ जुलै २०१७ पासून टोमॅटोचा बाजार तेजीत येण्यास वरील मूलभूत परिस्थिती कारणीभूत होती.

केंद्र सरकारच्या २०१७-१८ साठीच्या पहिल्या आगाप फलोत्पादन अनुमानात या वर्षी २२० लाख टन उत्पादन अपेक्षित आहे. २०१६-१७ मध्ये २०७ लाख टन टोमॅटो उत्पादन झाले होते. त्या तुलनेत या वर्षी १८ लाख टनांनी उत्पादन वाढण्याचे अनुमान वर्तवले आहे. २०१६-१७ मध्ये ७ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्र टोमॅटोखाली होते. चालू हंगामात ते ८ लाख १ हजार हेक्टर असेल.  सरकारी किंवा कुठलेही उत्पादनविषयक अनुमान तंतोतंत खरे उतरत नसले तरी एकूण कल (ट्रेंड) निश्चितीसाठी ते नक्कीच दिशादर्शक असते. मागील तीन वर्षांत देशांतर्गत टोमॅटोखालील क्षेत्र आणि उत्पादनात वाढ होत आहे. २-१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये टोमॅटोचे क्षेत्र प्रत्येकी ७.७ लाख हेक्टर होते. या दोन्ही वर्षात अनुक्रमे १८७ व १८९ लाख टन उत्पादन मिळाले. २०१६-१७ मध्ये परिस्थिती बदलली. एकंदर ७.९ लाख हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड झाली तर उत्पादन २०७ लाख टनांपर्यंत पोचले. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओदिशा, महाराष्ट्र, प. बंगाल, बिहार, गुजरात ही प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्ये आहेत. देशातील निम्म्याहून अधिक उत्पादन या राज्यांतून येते. यात महाराष्ट्र आणि गुजरात ही वर्षभर टोमॅटो पिकवणारी राज्ये आहेत. अन्य राज्यांत हंगामी पद्धतीने उत्पादन होते. 

विशेष नोंद अशी की कांद्याच्या तुलनेत टोमॅटो उत्पादन अल्पसे का होईना जास्त राहणार आहे. यंदा २१४ लाख टन कांदा उत्पादनाचे अनुमान आहे. त्या तुलनेत टोमॅटोचे उत्पादन ८ लाख टनांनी अधिक असेल. आज घडीला जितका कांदा खपतो, तितकाच टोमॅटोही खपतो, हे वरील आकड्यांवरून स्पष्ट होते. कांद्याच्या तुलनेत टोमॅटोची प्रतिहेक्टरी उत्पादकता जास्त आहे. त्यामुळे टोमॅटोस कांद्याच्या तुलनेत कमी क्षेत्र लागते. उदा. कांद्याखालील एकूण क्षेत्र चालू हंगामात १३ लाख हेक्टर तर टोमॅटोचे क्षेत्र ८ लाख हे. क्षेत्र अनुमानित आहे. बदलती आहार शैली, हॉटेल्स-केटरर्स आदींकडून वाढती मागणी, सार्क देशात निर्यातीच्या संधी आदींमुळे टोमॅटोच्या खपात चांगली वाढ दिसत आहे. 

मागील वर्षी टोमॅटोने उच्चांकी बाजारभाव गाठले, त्यामुळे या वर्षी महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यांत टोमॅटोखालील क्षेत्र वाढण्याचे संकेत मिळत आहेत. मागील सहा महिन्यांत बाजारभाव सर्वसाधारपण किफायती होता. २०१६ आणि २०१७ च्या पहिल्या सहामाहीत बाजारभाव मंदीत होते. त्यामुळे पुढे क्षेत्र कमी होऊन तेजीची चाल दिसली. महाराष्ट्रात यंदा खास करून एप्रिल-मे महिन्यादरम्यान टोमॅटोचे क्षेत्र वाढेल. गेल्या दोन वर्षांपासून या महिन्यात लागवड केलेल्या मालाला किफायती बाजारभाव मिळत आहे. उन्हाळ्यातील प्लॉट सुरवातीला चांगले दिसतात. पण, रोगराईचा प्रादुर्भाव सुरू झाला तर तो आटोक्यात येत नाही. शिवाय उष्णतेचे प्रमाण किती राहते यावरही बरेच अवलंबून असते. २०१६ व २०१७ चा उन्हाळा कडक गेला. त्यामुळे नैसर्गिकरीत्या उत्पादन नियंत्रणात येऊन चांगला बाजार मिळाला होता. १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यानाचे प्लॉट्स नैसर्गिक अनुकूलतेमुळे चांगले येतात. ते जून-जुलैपर्यंत चालतात. या दरम्यान जर बाजारभाव किफायती राहिले तर अनेक शेतकरी दुरीचे पीक घेतात. म्हणजे आहे तो प्लॉट न मोडता, त्याचे पीकपोषण वाढवून उत्पादन नियमित केले जाते. एकंदर नैसर्गिक अनुकूलता आणि बाजारभाव या दोन गोष्टी टोमॅटोचे उत्पादन संतुलित करतात, असे म्हणता येईल.

(लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)

loading image