लोकसहभाग, युवाशक्तीच्या जोरावर  हलगरा झाले पाणीदार

लोकसहभाग, युवाशक्तीच्या जोरावर  हलगरा झाले पाणीदार

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हलगरा तसं छोटसं गाव. सातत्याने दुष्काळात होरपळणारं गाव म्हणून त्याची ओळख. दोन वर्षांपूर्वीच्या दुष्काळात गावाच्या शिवारातील चारशे विंधन विहिरींपैकी केवळ चारच विहिरींना पाणी. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागे. अतिपाणी उपशाचे गाव म्हणूनही ओळख झालेली. त्यामुळे शासनाकडून विहिरीदेखील मंजूर केल्या जात नव्हत्या. गावाला नदी नव्हती. काही ओढे होते; पण तेही बुजलेल्या अवस्थेतीलच होते. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर गावात पाणी येईल, त्यामुळे गावची पाणीपातळी वाढेल, अशी काही परिस्थिती दिसत नव्हती. त्यामुळे गावाला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत होता. 

वास्तव्य अमेरिकेत; पण ओढ गावाची
गावाचा कायापालट करण्याचे श्रेय खरं तर या गावातील तरुण दत्ता व्यंकटराव पाटील यांना द्यायला हरकत नाही. अमेरिकेत माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील एका प्रसिद्ध कंपनीत ते उच्चपदस्थ आहेत. अमेरिकेतून आपल्या लहान गावाकडं पाहताना त्यांना ग्रामस्थांसाठी काही तरी करावं, असं सतत वाटत होतं. सन २०१६ च्या सुरवातीला पंधरा दिवस ते सुटीवर गावाकडं आले. गाव त्या वेळीही दुष्काळात होरपळतच होतं. जिल्ह्यात काही ठिकाणी जलयुक्त शिवार योजना सुरू होती; पण या गावाला डावललं गेलं होतं. शासनाच्या मदतीशिवाय आपण काम सुरू असे त्यांना वाटून गेले. गावातील मित्र गट्टू अग्रवाल यांच्याशी त्यांनी चर्चा केली. स्वतःचा काही निधी गुंतवला. गावातील नाला दुरुस्तीच्या कामाला सुरवात केली. गावात वेगवेगळ्या विचारांचे लोक राहत असल्याने सुरवातीला कमी प्रतिसाद मिळाला. नंतर मात्र ग्रामस्थांनीच हे काम चळवळ म्हणून हाती घेतले. त्याचे दृश्‍य परिणाम आता दिसू लागले आहेत. 

पाणलोटाची झाली कामे 
हलगरा हे सुमारे १४०० घरांचे गाव. गावची सात हजार लोकसंख्या. सन २०१६ पासून गावचे भूमिपुत्र दत्ता व्यंकटराव पाटील,  गट्टू शेट व गुणवंत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पाण्याची मोठी लोकचळवळ  उभी राहिली. अंदाजे दोन कोटी रुपये खर्च 
करून सुमारे दोनशे कोटी लिटर पाणीसाठा निर्मिती होईल एवढ्या क्षमतेची पाणलोट विकासकामे गावाने केली. यात प्रामुख्याने  २० किलोमीटर ओढा सरळीकरण, 
१२ हजार वृक्ष लागवड, तीन नवे गॅबियन बंधारे, आठ जुने सीएनबी बांध दुरुस्ती, ९५ टक्के कंपार्टमेंट बंडिंग आदी कामांचा समावेश राहिला.  

संस्थांना मिळाली कामाची प्रेरणा 
गावचे तरुण व ग्रामस्थ ज्या पद्धतीने काम करत आहेत, हे पाहून शासनानेही हलगरा गाव जलयुक्त शिवार अभियानात घेतले. ग्रामस्थ काम करतच होते. ग्रामस्थांची कामाची तळमळ पाहून अनेक संस्था पुढे आल्या. आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेने हात पुढे केला. दोन मोठ्या कंपन्यांनी आर्थिक पाठबळ दिले. त्यातूनच पाणलोटाची विविध कामे होऊ शकली. 

मुख्यमंत्री महोदयांनी गाव घेतलं दत्तक
हलगरा गावचं काम पाहून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी गावाचं कौतुक केले. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मे महिन्यात गावाला भेट देण्याची विनंती केली. मुख्यमंत्री महोदयांनी ग्रामस्थांसोबत या कामी अर्धा तास श्रमदान केलं. ग्रामस्थांसोबत न्याहारीही केली. त्यानंतर हे गाव आपण शासनातर्फे दत्तक घेत असल्याचे जाहीर केले. ग्रामस्थांच्या कामांचा हा सन्मानच होता. 

बंधाऱ्यांच्या नामकरणातून  सामाजिक बांधिलकी 
थोर नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ जयंतीचे औचित्य साधून ग्रामस्थांनी आंबेडकर गॅबियन बंधाऱ्याची निर्मिती केली. शिवजयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून जयभवानी गॅबियन बंधारा श्रमदानातून बांधला. बंधाऱ्यांच्या नामकरणाचा वेगळा पॅटर्न यानिमित्ताने ग्रामस्थांनी सर्वांसमोर ठेवला आहे. 

तरुणांचा पुढाकार गावासाठी वरदान
गावातील काही तरुण मंडळी वेळ वाया घालवत असतात, अशी काहींची ओरड नेहमीच असते;  मात्र हलगरा गावातील तरुण काही वेगळेच आहेत. दत्ता पाटील यांनी या तरुणांना प्रेरणा दिली. यात प्रामुख्याने योगेश गायकवाड, बलभीम गायकवाड, राजेंद्र गायकवाड, अजय शेळके, व्यंकट सगरे, शिवाजी वागदूरे, तानाजी जाधव, आकाश टोम्पे या तरुणांचा कामांमध्ये मोलाचा वाटा राहिला. या सर्वांना पाटील यांच्यासह गट्टू शेट, गुणवंत गायकवाड रमेश मदरसे यांनी मार्गदर्शन केले. 

कॅलिफोर्नियातून मिळालेली प्रेरणा
गावातील कामांच्या पार्श्वभूमीवर बोलताना दत्ता पाटील म्हणाले, की गेल्या काही वर्षांपासून मी अमेरिकेत वास्तव्यास आहे. एका जगप्रसिद्ध कंपनीत उच्चपदस्थ आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणे पाहण्याची संधी मिळाली. अमिरेकेतील कॅलिफोर्निया हे महत्त्वाचे ठिकाण. तेथे पाण्याचा कशा पद्धतीने वापर होतो ते जवळून पाहिले. तेथे ८० फुटांच्या खोल पाणीपातळी गेली की शासन दुष्काळ जाहीर करते; मात्र आपल्याकडे आठशे फुटांवरही पाणी लागले नाही तरी काहीच उपाय केले जात नाहीत. लहानपणापासून मी पाणलोट विकास हा शब्द ऐकत आलो आहे; पण अमेरिकेत त्याची प्रत्यक्ष प्रचीती आली. पाण्याचा थेंबनथेंब तेथे वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ठिकठिकाणी खड्डे खोदून ते पाणी मुरवण्याचा प्रयत्न तेथील लोक करतात. मी शेतकरी कुटुंबातीलच असल्याने असेच काही तरी गावासाठी करावे ही प्रेरणा मिळाली. ग्रामस्थांनी याला लोकचळवळीचे रूप दिल्यानेच विकासकामे यशस्वी पार पाडणे शक्य झाले. 

हलगरा गावात झालेली जलसंधारणाची कामे
वीस किलोमीटर नाला खोली-रुंदीकरण ( ४ लाख घनमीटर गाळाचा उपसा)
एक हजार हेक्टर कंपार्टमेंट बंडिंग 
बारा हजार नवीन फळ झाडे लागवड 
पाचशे शोष खड्डे 
पंधरा विहिरींचे पुनर्भरण 
दहा शेततळी 
तीन नवे गॅबियन बंधारे 
आठ जुन्या सिमेंट बंधाऱ्यांची दुरुस्ती
तीन पुरस्कारांनी सन्मान 
हलगरा गावाने गेली दोन वर्षे जलयुक्त शिवारात 
ज्या पद्धतीने काम केले आहे, ते पाहून दोन वर्षांत तीन पुरस्कार मिळवण्यात त्याने यश मिळवले आहे. 

हलगरा गाव प्रसिद्ध अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशन ‘‘वॉटर कप २’’ स्पर्धेत सहभागी झाले. त्यातून पाच लाखांचे बक्षीसही पटकावले. एका शासकीय संस्थेनेदेखील ५० हजार रुपयांचे बक्षीस देत गावाचा गौरव केला. जलयुक्त शिवारांतर्गतही शासनाने गावाला सन्मानित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com