मावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक स्थैर्य

मावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक स्थैर्य

जळगाव शहराच्या पिंप्राळा भागातील देवकाबाई बारी या पूर्वी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. दर बुधवारी पिंप्राळा येथील आठवडे बाजारात त्या भाजी विक्रीसाठी जायच्या. सुभाष व चेतन ही त्यांची मुले नोकरी करतात. चेतन यांचा शहरातील काही चॉकलेट निर्माते, मोठे वितरक यांच्याशी संपर्क आला होता. त्यातून त्यांना या व्यवसायातील बारकावे समजले. मावा मलई चॉकलेट निर्मितीबाबत चेतन यांनी घरच्यांशी चर्चा केली. यातून भाजी विक्रीपेक्षा मावा मलई चॉकलेट निर्मितीचा निर्णय ममता सुभाष बारी यांनी सासूबाई देवकाबाई यांच्या साथीने घेतला. यासाठी पहिल्यांदा ओळखीच्या प्रक्रिया उद्योगामध्ये मावा मलई चॉकलेट निर्मितीबाबत प्रशिक्षणही घेतले. त्यानंतर स्वतः निर्मिती व्यवसायात त्या उतरल्या. 

भाजीपाला विक्रीतून बारी यांना फारसा नफा सुटत नसे. शिवाय दिवसभर घराबाहेर रहावे लागत होते. फक्त आठवडे बाजारात नेहमीपेक्षा जास्तीचा भाजीपाला विकला जायचा. परंतु, मलई निर्मितीच्या व्यवसायामुळे घरगुती पूरक उद्योगाला सुरवात झाली. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी त्यांनी भाजीपाला विक्री व्यवसाय बंद केला. निवासस्थानावरील दोन खोल्यांध्ये बारी यांनी मावा मलई चॉकलेट निर्मितीला सुरवात केली. एका खोलीत मावा मलई निर्मितीसाठी मावा, साखर, ग्लुकोजवर प्रक्रिया केली जाते. तर दुसऱ्या खोलीत महिला रॅपरमध्ये मावा मलई चॉकलेट भरण्याचे काम करतात. या उद्योगात बारी यांनी नऊ महिला व तीन पुरुषांना रोजगार दिला आहे. निर्मिती सुरू झाल्यानंतर विक्रीसाठी सुभाष आणि चेतन मावा मलईचे नमुने घेऊन  दुकानदार, मोठे खरेदीदार यांना भेटायचे. मलईची चव अतिशय रूचकर असल्याने बाजारपेठेत चांगली मागणी मिळू लागली आहे. मागणी लक्षात घेऊन बारी यांनी साई गृह उद्योगाच्या माध्यमातून मावा मलईचे उत्पादनात वाढ केली.या उत्पादनासाठी त्यांनी फूड लायसन्स घेतले आहे.

मावा मलईची निर्मिती 
मावा मलई निर्मितीबाबत ममता बारी म्हणाल्या की, आम्हाला रोज ३० किलो खवा, ५० किलो साखर आणि काही प्रमाणात ग्लुकोजची आवश्‍यकता असते. बाजारपेठेच्या मागणीनुसार मावा मलई निर्मितीचे नियोजन केले जाते. या व्यवसायासाठी विजेची फारशी गरज नाही. फक्त स्वयंपाकाचा गॅस खवा, साखरेवर प्रक्रियेसाठी आवश्‍यक असतो. मावा मलई निर्मितीसाठी रोज नऊ महिला मदतीस येतात. सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ पर्यंत मावा मलई निर्मितीचे काम चालते. मागणी लक्षात घेता मलई निर्मितीसाठीची घटकांची पुरेशी उपलब्ध करून ठेवावी लागते. मावा मलई निर्मितीसाठी लागणारा खवा हा प्रामुख्याने बीड जिल्ह्यातील ओळखीच्या शेतकऱ्यांच्याकडूनच खरेदी केला जातो. त्यामुळे गुणवत्तेची खात्री रहाते. जर गरज वाटली तर जळगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून जास्तीचा खवा खरेदी केला जातो. सासत्यपूर्ण मागणीमुळे चांगल्या दर्जाचा खवा आम्हाला शेतकऱ्यांच्याकडून मिळतो. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकून आहे. मलई पॅकिंगसाठी लागणारे रॅपर मुंबई येथून २५० रुपये प्रति किलो या दराने आणि पॅकिंगसाठी लागणारी बरणी, कोरूगेटेड बॉक्‍स जळगाव शहरातून खरेदी केला जातो.

गुणवत्तेमुळे मागणीत वाढ 
बाजारपेठेत वेगळेपण जपण्यासाठी ममता बारी यांनी मावा मलईचा ‘कृष्णा मलई` हा ब्रॅंन्ड तयार केला आहे. याबाबत त्या म्हणाल्या की, ८०० ग्रॅम मावा मलई चॉकलेटची एक बरणी १२५ रुपयांना विकली जाते. विक्रीसाठी जळगाव शहर तसेच परिसरातील गावांमध्ये दुकानदारांशी संपर्क करण्यासाठी फिरावे लागते. मध्यंतरी जळगाव शहरातील एका मॉलने मावा मलई पुरवठ्यासाठी मागणी केली आहे. त्यासाठी बारकोडसंबंधीची मंजुरी आम्ही घेत आहोत. यासाठी ८० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील काळात चिक्की, लाडू, खाद्यपदार्थांच्या निर्मितीचे नियोजन आम्ही केले आहे.

सध्याच्या काळात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, जळगाव शहर, बोदवड, चोपडा या भागात मावा मलईची विक्री होते. औरंगाबाद, बऱ्हाणपूर येथून दर महिन्याला दोन ते तीन बॉक्‍स मावा मलईची मागणी असते. एका बॉक्‍समध्ये ८०० ग्रॅमच्या वीस बरण्या बसतात. जळगाव शहरातील मालवाहतूकदारांच्या माध्यमातून संबंधित ठिकाणी मावा मलई पोचविली जाते. 

मावा मलई निर्मितीच्या व्यवसायात बारमाही रोजगार तयार झाला आहे.  महिन्याला सरासरी १५ हजार रुपयांपर्यंत नफा शिल्लक रहातो.कुटुंबातील सर्व सदस्यांची चांगली मदत होते, याचबरोबरीने परिसरातील नऊ महिलांना रोजगार दिल्याचेही समाधान आहे.
                        
बचत गट, खाद्य महोत्सवातून विक्रीचे नियोजन 
घरबसल्या मावा मलई चॉकलेट निर्मितीतून रोजगार मिळाल्याने भाजीपाला विक्रीचा व्यवसाय देवकाबाई यांनी बंद केला आहे. जळगाव परिसरातील काही महिला बचत गट आणि खाद्यपदार्थ निर्मितीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांशी त्यांनी ओळख करून घेतली असून, त्यांच्याकडेही मावा मलई विक्रीसाठी पाठविली जाते. याचबरोबरीने परिसरात भरणाचे महिला बचत गट महोत्सव, खाद्यपदार्थ विक्री उपक्रमात मावा मलई विक्रीसाठी ठेवली जाते. त्यातूनही थेट ग्राहकांच्यापर्यंत मावा मलईचा प्रसार होत आहे.

ममता बारी, ८८८८५८७८०६ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com