मावळंगे बनले रोपवाटिकांचे गाव

mavlange-village
mavlange-village

साधारणपणे १९६५ मध्ये मावळंगे (जि.रत्नागिरी) गावात पहिली रोपवाटिका सुरु झाली. सध्या गावात फळझाडे, फुलझाडांची कलमे, रोपे पुरविणाऱ्या पंधराहून अधिक रोपवाटिका कार्यरत आहेत. यामुळे शेतीच्या बरोबरीने रोजगाराचे साधन तयार झाले आहे. राज्याच्या बरोबरीने परराज्यात देखील मावळंगे गावातून दरवर्षी सुमारे दोन लाखांच्यावर कलमे,रोपे  विक्रीस जातात. 

रत्नागिरी जिल्ह्यातील मावळंगे गावातील अनंत नारायण शिंदे यांनी १९६५ साली सर्वप्रथम रोपवाटिका व्यवसायाला सुरवात केली. जवळच असलेल्या मेर्वी गावातील अनंत बेहेरे यांना हापूसची कलमे बांधून हवी होती. त्यांच्यासाठी अनंत शिंदे यांनी कलमे बांधण्यास सुरवात केली. सुरवातीला त्यांनी १०० हापूसची कलमे बांधली. त्यावेळी भेट कलमे बांधली जायची. शिंदे यांनी ही कलमे विक्रीसाठी बेहेरे यांच्याकडे पाठवण्यास सुरवात केली. दोन ते तीन वर्षांनी त्यात वाढ झाली. हळूहळू यास व्यावसायिक रुप प्राप्त झाले. मावळंगेपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नागिरीमध्ये जाण्यासाठी त्याकाळी खाडी पार करून जावे लागे. तेव्हा भाट्ये येथे पूल नव्हता. त्यामुळे होडीतून कलमे रत्नागिरीमध्ये आणली जायची. तेथून ती अन्य जिल्ह्यात विक्रीसाठी पाठविली जायची. अशाप्रकारे मावळंगे गावात रोपवाटिका व्यवसाय सुरु झाला. अनंत शिंदे यांच्या रोपवाटिका आणि भातशेतीमधील प्रयोगशीलतेची कृषी विभागाने दखल घेत त्यांना १९८४ साली शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरविले. त्यांच्या प्रयत्नातूनच गावामध्ये रोपवाटिका व्यवसायाला गती मिळाली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रोपवाटिकांना मिळाली चालना 
अनंत शिंदे यांच्या रोपवाटिकेमध्ये गावातील दहा ते पंधरा ग्रामस्थांना रोजगार मिळाला.  पुढे शिंदे यांच्या सुहास, दत्तात्रय आणि संतोष या मुलांनी  रोपवाटिका व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढविला. पंचवीस हजार रुपयांची गुंतवणूक करून सुरु केलेल्या या व्यवसायाचा पसारा आता पन्नास लाखांपर्यंत पोचला आहे. शिंदे  यांनी कलमे बांधण्यासाठी गावातील लोकांनी प्रशिक्षित केले. रोपवाटिका व्यवसाय उत्पन्नाचे साधन बनू  शकतो, हे लक्षात आल्यानंतर मावळंगे गावातील लोकांनी लहान स्तरावर रोपवाटिका सुरु केल्या. आज १५०० लोकसंख्या असलेल्या या गावातील लोकांचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन म्हणून रोपवाटिकांच्याकडे पाहिले जाते. या गावातून आता हजारोंच्यावर हापूस, केसर, पायरीची कलमे राज्य, परराज्यात जातात. रोपवाटिकेमधील कामगारांनीही पडीक जमिनीत हापूस, पायरी आंबा लागवड केली आहे. रोजगाराबरोबरच आंबा विक्रीतून चांगले उत्पन्न गावकऱ्यांना मिळत आहे. आज गावातील रोपवाटिकांमध्ये ग्राहकांच्या मागणीनुसार एक वर्ष, दोन वर्ष आणि तीन वर्षांची कलमे उपलब्ध आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोकांना मिळाला वर्षभर रोजगार
सुरवातीला गावामध्ये पाच,सहा रोपवाटिका होत्या. परंतु हळूहळू स्पर्धा वाढली. यामुळे रोपवाटिकांची वाढ होत गेली. आज या गावातून सुमारे दोन लाखाहून अधिक आंबा,काजू कलमे, नारळ,सुपारीची रोपे राज्यासह कर्नाटकमध्ये विक्रीला जातात. गावातील प्रत्येक रोपवाटिकेमध्ये कामगार दिवसाला किमान ८०० कलमे बांधतात. हे सर्व जण कलमे बांधण्यामध्ये प्रशिक्षित आहेत. गावातील सुमारे पंधराहून अधिक रोपवाटिकांच्यामध्ये शंभरहून अधिक लोकांना वर्षभर रोजगार मिळाला आहे. १९९०-९१ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीला चालना मिळाली. यातून हापूस, पायरी आणि केसर आंबा कलमांना मागणी वाढली. त्यामुळे गावातील  आंबा,काजू,नारळ,सुपारी रोपवाटिकांना चालना मिळाली, असे सुहास शिंदे सांगतात.

सेंद्रिय पद्धतीने कलमांची निर्मिती : गावातील रोपवाटिकांमध्ये विविध कलमांची बांधणी होते. गावातील दिनेश महादेव थुळ हे प्रयोगशील शेतकरी पूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर करून हापूस, केसर आंबा आणि काजूची कलमे बांधतात. दिनेश हे  आज्जी पार्वती थुळ आणि आई सुनंदा थुळ यांच्या मार्गदर्शनामुळे गेली वीस वर्ष रोपवाटिका व्यवसायामध्ये आहेत. दिनेश यांनी एक हजार मातृवृक्ष स्वतःच्या जागेत लावले आहेत. त्याच्या काड्यांपासून कलमे बांधण्यास सुरवात केली. दरवर्षी दिनेश थूळ हे ७ हजार हापूस आंबा, ५ हजार केसर आंबा आणि २ हजार नारळ रोपांची निर्मिती करतात. कलमे,रोपांसाठी सेंद्रिय खत, गांडूळ खताचा वापर केला जातो.  दर पंधरा दिवसांनी कलमांना जीवामृत दिले जाते. कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गावामध्ये रोपवाटिकांमध्ये दर्जेदार आंबा, काजू  कलमे, नारळ, सुपारी रोपे तयार होतात. यातून पंचक्रोशीत पडीक जमिनीवर फळबाग लागवडीला चालना मिळाली. कलम निर्मिती, व्यवस्थापन आणि वाहतूक उद्योगातून गावातील लोकांना रोजगार मिळाला. गावातील प्रत्येक घरात उत्पन्नाचे साधन तयार झाले. त्यामुळे उत्पन्नात वाढ झाली. कातळ जमिनीवरही  रोपवाटिका उभ्या राहिल्या आहेत.  दर्जेदार कलमांच्यामुळे राज्य, परराज्यात मावळंगे गावाला प्रसिद्ध मिळाली आहे. 
— दत्तात्रय शिंदे, प्रयोगशील शेतकरी 

रोपवाटिका व्यवसायामुळे गावातील अर्थकारणावर चांगला परिणाम झाला आहे. गावात रोजगार निर्मिती होत असून माळीकाम, कलम निर्मितीतून पूरक उद्योग सुरू झाले आहेत. पुरुषांबरोबरच महिलांसाठी सुद्धा रोजगाराची गावांमध्येच उपलब्धता झाली. रोपवाटिकांमध्ये  राज्य,परराज्यातून चांगली मागणी असल्याने गावाच्या लौकिकात वाढ झाली आहे. लोकांचे राहणीमान सुधारले आहे.
— सौ. वेदिका विनायक गुळेकर, (सरपंच, मावळंगे)

रोपवाटिका व्यवसायातून गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. यंदा कोरोनामुळे कलमांचा उठाव कमी झाला. मात्र शेती उत्पन्नाबरोबरच रोजगारक्षम असा हा रोपवाटिका व्यवसाय आहे.
— सुहास शिंदे, रोपवाटिका व्यावसायिक

रोपवाटिकेमुळे पंचक्रोशीत फळबाग लागवडीला चालना मिळाली. पडीक जमिनीवर आंबा, काजूची लागवड झाली आहे. आंब्याच्या लागवडीतून उत्पन्नाचे साधनही तयार झाले आहे. आजही येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
— माधव बापट,९४२२४७०३४० ( मंडळ कृषी अधिकारी, पावस)

उत्पन्नाचा वाढला स्तर : गावामध्ये सुमारे पंधराहून अधिक रोपवाटिका कार्यरत आहेत. या उद्योगामुळे गावातील लोकांना रोजगार मिळाला. गावामध्येच दर्जेदार कलमे मिळत असल्याने पंचक्रोशीत आंब्याची लागवड वाढली. भातशेतीवर गुजराण करणाऱ्या कुटुंबांना आर्थिक उत्पन्नाचे चांगले साधन मिळाले. गावामध्ये कलमे वाहतुकीचा व्यवसाय वाढला. या गावातून दरवर्षी सुमारे वर्षाला दोन लाखांहून अधिक कलमे रायगड, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा यासह  कर्नाटक राज्यामध्ये विक्रीला जातात. 

शेतीला मिळाली रोपवाटिकांना साथ 
पूर्वी गाव शिवारात भातशेतीची कामे झाली की कलमे बांधण्याची तयारी सुरु होत होती. हळूहळू कलमे बांधण्याचे तंत्र बदलत चालले होते. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचे फायदे व्हावेत यासाठी तत्कालीन उपविभागीय अधिकारी आरिफ शहा यांनी पुढाकार  घेऊन  शासनाच्या योजनांमधून शेतकऱ्यांना रोपवाटिका उद्योगासाठी साहित्य उपलब्ध दिले. कोरडवाहू शाश्‍वत शेती विकास कार्यक्रमातून २०१५-१६ या आर्थिक वर्षात रोपवाटिका चालकांना बळ मिळाले. रोजगार निर्मितीच्या उद्देशाने शेडनेटमध्ये रोपनिर्मिती करण्यासाठी मावळंगे गावाची निवड केली. चार रोपवाटिकाचालकांना परवानेही देण्यात आले. यामुळे कलमांची योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे शक्य होऊ लागले. या अभियानातूनच पुढे मावळंगे गावाला रोपवाटिकांचे गाव म्हणून ओळख मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com