मक्याच्या शेतीला दुग्धव्यवसायाची जोड

मक्याच्या शेतीला दुग्धव्यवसायाची जोड

खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील अरुण व दीपक या चौधरी पितापुत्रांची सुमारे चार एकर जमीन आहे. आपल्या गावालगत आव्हाणे, ममुराबाद (जि. जळगाव) शिवारात मुख्य रस्त्यांलगत कृत्रिम जलसाठे उपलब्ध असलेली काळी कसदार जमीन ते भाडेतत्त्वावर घेतात. यंदा ३० एकर शेती या प्रकारे ते कसताहेत. काका अमोल चौधरी यांचे मार्गदर्शनही दीपक त्यांना मिळते. पाण्यासाठी एक कूपनलिका आहे. भाडेतत्त्वावर घेतलेल्या शेतात तीन कूपनलिका आहेत. जलस्त्रोत काही ठिकाणी कमी असल्याने शंभर टक्के ठिबक आहे. शिवाय पाण्याच्या मर्यादित वापरासंबंधी ते कटाक्ष ठेवतात. मालकीच्या चार एकरांत कांदेबाग केळीची लागवड असते. भाडेतत्त्वावरील ३० एकरांपैकी चार एकरांत मका, प्रत्येकी पाच एकर दादर (ज्वारी), केळी व हरभरा असतो. चार एकर पपई असते. पाणी, हवामानानुसार पिकांचे क्षेत्र बदलते. 

मका पिकाचे व्यवस्थापन  
मक्याचे मागील पाच वर्षांपासून ठिबकवर उत्पादन घेण्यात येते. यंदाच्या हंगामात कारले असलेले क्षेत्र रिकामे झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये मक्याची लागवड कोणतीही मशागत न करता केली. कारले पिकासाठीची गादीवाफे, ठिबक ही यंत्रणा तयार होतीच. एकरी पाच किलो बियाण्याचा वापर केला. दोन गादीवाफ्यांमधील अंतर सुमारे चार फूट ठेवून एका वाफ्यावर दोन ओळी ठेवल्या. लागवडीनंतर ठिबकद्वारे सिंचन केले. सुरुवातीपासन तीन दिवसांआड दोन तास पाणी दिले.

प्रतिबंधात्मक फवारण्या 
राज्यात स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा या नव्या अळीचे आक्रमण मका, ऊस, ज्वारी आदी पिकात झाले आहे. चौधरी यांच्या परिसरातही या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. काही शेतकऱ्यांकडे पीक काढून टाकण्याची वेळ आली. पण, चौधरी यांनी वेळीच प्रतिबंधात्मक दक्षता घेतली. कृषी विभागाच्या सूचनेनुसार ठरावीक अंतराने कीटकनाशकाच्या साधारण तीन फवारण्या घेतल्या. त्यासाठी सुमारे नऊ हजार रुपये खर्च (मजुरी वगळता) आला. कारले पिकाचे बेवड व काळी कसदार जमीन असल्याने रासायनिक खते अधिक प्रमाणात देण्याची गरज भासली नाही. ऐंशीव्या दिवशी निसवण झाली. गरज लक्षात घेता एकरी ५० किलो पोटॅश व २५ किलो युरिया ड्रीपमधून दिले. पिकाची उंची सुमारे आठ फुटांपर्यंत झाली. पीक जोमात असल्याने एकरी २३ क्विंटल उत्पादन येण्याची अपेक्षा आहे. चौधरी दर वर्षी खरीप व रब्बी पिकात मका घेतात. खरिपात एकरी २० क्विंटलपर्यंत, तर रब्बीत २० ते २५ क्विंटल उत्पादन खात्रीशीर मिळते, असे ते सांगतात. 

यंदा दरांत वृद्धी 
 मागील वर्षी सरासरी १२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. यंदा खरिपात हे दर १६०० रुपयांपर्यंत मिळाले. अमेरिकन लष्करी अळी व दुष्काळ या दोन घटकांमुळे यंदा मका उत्पादनावर परिणाम झाला असून, दरही सध्या २१०० ते २२०० रुपयांपर्यंत असल्याचे चौधरी यांनी सांगितले. सोबत चाऱ्याचेही उत्पादन मिळणार असल्याने त्याचा वेगळा फायदा होणार आहे. मका पिकानंतर कापूस लागवडीचे नियोजन केले आहे.

दुग्धव्यवसायाचा आधार 
चौधरी यांच्याकडे मुऱ्हा व जाफराबादी अशा मिळून सुमारे नऊ म्हशी आहेत. एक बैलजोडी आहे. घरचे शेणखत उपलब्ध होते. दोन सालगडी असून, गोठ्याच्या निगराणीसाठी एक कर्मचारी नियुक्त केला आहे.  दररोज सुमारे ७० ते ७५ लिटर दूध संकलित होते. गावाच दूध खरेदी केले जाते. या व्यवसायातून महिन्याला २० ते २५ हजार रुपयांचे उत्पन्न हाती येते. शेतीला त्याचा मोठा आधार होत असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

यंदा कलिंगडाचे आंतरपीक
यंदा पपई व केळीमध्ये कलिंगडाच्या आंतरपिकाचा प्रयोग राबविला आहे. त्यात प्लॅस्टिक मल्चिंग व ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. उन्हाळ्यात कलिंगडाच्या वेलींचा उपयोग झाडांलगतचे तापमान नियंत्रित करण्यासाठी होईल. शिवाय बोनस उत्पादन मिळेल. दर वर्षी जूनमध्ये ठिबकवर बीटी कापसाची सुमारे १० ते १२ एकरांत लागवड असते.  

 दीपक चौधरी, ७८७५५५१३५६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com